‘वक्फ’चे कवच भेदणे आवश्यक

    17-Oct-2024
Total Views |
parliament-building-to-airport-made-on-waqf-board-land-claims
 

भारताने उभारलेले नवीन संसद भवन असो किंवा दिल्ली विमानतळ असो, हे सारे काही वक्फच्या जमिनीवरच उभे राहिले असल्याचा दावा ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रन्टचे नेते बदरुद्दीन अजमल यांनी केला आहे. भारतीय रेल्वे, भारतीय सैन्य यानंतर सर्वात जास्त जमीन या देशात कोणाच्या नावावर असेल, तर ती ‘वक्फ बोर्ड’च्या नावावर आहे. संसदेत सध्या ‘वक्फ बोर्ड’ सुधारणा कायद्याची चर्चा सुरू असून, संयुक्त संसदीय समितीचा या विषयासंबंधित अहवाल येत्या काही दिवसातच अधिवेशनात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘वक्फ’ बाबतच्या उथळ विधानांना चेव चढला आहे. मुळातच हे सारेच तथ्यहीन असून, या विषयी दावे ठोकणार्‍यांकडे काहीही पुरावे नाहीत, हे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. मुळातच ब्रिटीश काळात त्यांनी नाकारलेला ‘वक्फ’ पुन्हा भारतात पेरण्याचे काम जर कोणी केले असेल, तर ते काँग्रेसनेच! त्यानंतर या कायद्यात वेळोवेळी बदल देखील करण्यात आले. मात्र, मनमोहन सिंग सरकारच्या काळातच ‘वक्फ’ला ‘न भुतो न भविष्यती’ अशी शक्तीचे दान देण्यात आले. त्याचाच परिपाक म्हणजे आजची अवस्था आहे? आजमितीला ‘वक्फ’ हे काही फक्त बोर्ड राहिले नसून, ती जमिनी बळकवण्याची ‘राष्ट्रव्यापी चळवळ’ झाली आहे. मुस्लीम धर्माचा कोणताही नेता उभा राहतो आणि देशातील कोणत्याही जमिनीवर हक्क सांगू लागतो. मध्ये तर एका प्रसिद्ध उद्योगपतीच्या निवासस्थानावरच कोण्या मुस्लीम नेत्याने हक्क सांगत, ही जागाच ‘वक्फ’ची असल्याचे वादग्रस्त विधान केले होते. पुराव्यानिशी कोणी दुसर्‍याच्या संपत्तीवर दावा करत असल्यास, न्यायालयाच्या माध्यमातून प्रश्न सोडवता येणे सहज शक्य होते. मात्र, निव्वळ इस्लामची ताकद, जिहाद अशा कुत्सित मानसिकतेतून असे प्रकार घडणार असतील, तर या दावे करणार्‍यांच्या शक्तीला मर्यादित करण्यास काहीच गैर नाही. ‘वक्फ’च्या नावाखाली आज देशभरात बोकाळलेला हा ’लॅन्ड जिहाद’ भविष्यात, या देशाच्या अखंडतेसमोरचा सर्वात मोठा धोका असेल, याबाबत कोणासही शंका नाही. त्यामुळे संविधानिक सुरक्षाकवचाला शक्ती समजून जर कोणीही देशाच्या अखंडतेच्या विरोधात त्याचा वापर करणार असेल, तर संसदेच्या शक्तीनेच ते सुरक्षकवच भेदले जाऊ शकते, हा संदेश समाजात जाणे आज महत्त्वाचे झाले आहे.
 
कौशल्य विकासावर भर


देशात बेरोेजगारीच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून कायमच मगरीचे अश्रु ढाळले जात असतात. मात्र, त्याचे समाधान करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न योग्य त्या दिशेने करणे आवश्यक असते. बेरोजगारी हा मुद्दा निवडणुकीच्या भाषणाबाजीतून सुटणारा नसून, सरकार आणि खासगी उद्योकांच्या भागीदारीतूनच सोडवला जाऊ शकतो. हाच विचार करून, केंद्र सरकारने तरुणांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव बहुराष्ट्रीय आणि बहुउद्योगीय समूहात मिळावा यासाठी ‘पंतप्रधान इंर्टनशीप’ची सुरूवात केली आहे. मासिक पाच हजार विद्यावेतनासह ही योजना देशभर कार्यान्वित झाली असून, पहिल्या काही दिवसताच तब्बल दीड लाखांच्यावर तरुणांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे, ही बाब नक्कीच वाखाणण्याजोगी आहे. रोजगाराच्या बाबत असलेली शोकांतिका ही काही काल आजची नाही, तर तिला फार मोठा इतिहास आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. घोडा का अडला? भाकरी का करपली? पाने का खराब झाली? तर फिरवली नाही म्हणून. परिवर्तन हा काळाचा स्वभाव आहे. मात्र, या देशात काँग्रेस कृपेने शिक्षण व्यवस्थेत दीर्घळाळ बदलच न झाल्याने, ती शिक्षण व्यवस्था ही पदवीधरांचे उत्पादन करणारी एक फॅक्टरी झाली. त्यामुळे देशात पदवीधर जरी बहु झाले, तरी कौशल्याची वानवा स्पष्ट दिसू लागली होती.  याकाळात कौशल्य महत्वाचे असून, कौशल्य आत्मसात करण्याचा राजमार्ग म्हणजे प्रत्यक्ष कार्यानुभव! त्यामुळेच नंतरच्या काळात अनेक व्यवसायिक क्षेत्रात कार्यानुभव बंधनकारक करण्यात आला. आता नवीन शिक्षण पद्धतीचा स्वीकार देशाने केला आहे. तिची अंमलबजावणी नजीकच्या भविष्यात होईलही. मात्र, जुन्याच शिक्षण व्यवस्थेचे उत्पादन असणार्‍या देशाच्या महत्वकांक्षी तरुण ऊर्जेचा योग्य वापर करणेही आवश्यक होते. यासाठीच देशपातळीवर या सगळ्याची गरज ओळखून, तरुणांना अनुभव आणि कौशल्य विकासाची शिदोरी एकत्र घेऊनच ‘पंतप्रधान इंर्टनशीप’ची सुरूवात झाली आहे. या योजनेमुळे अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव एक वर्ष मिळाल्याने, निवडलेल्या क्षेत्रातील गरजेची जाणीव होऊन, कौशल्यप्राप्त तरुणांची फौजच या देशात उभी राहील. त्याचा फायदा देशातील उद्योग क्षेत्राच्या वाढीबरोबरच, न कळत अर्थव्यवस्थेलाही होईल!

कौस्तुभ वीरकर