शुभम लोणकरविरोधात एलओसी जारी; नेपाळला पळून जाण्याची शक्यता

17 Oct 2024 17:19:04

shubham lonkar
 
मुंबई : (Baba Siddique Murder Case) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते व माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबर रोजी रोजी निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी याच्या निर्मल नगर येथील कार्यालयाबाहेर बाबा सिद्दीकीं वर गोळीबार करण्यात आला होता. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. मात्र दिवसागणिक या प्रकरणातील नवनवीन खुलासे उघडकीस येत आहेत. या हत्येसाठी मारेकऱ्यांकडून तीन पिस्तुलांचा वापर करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
 
हत्येसाठी 'या' विदेशी बनावटीच्या पिस्तुलांचा वापर
 
मुंबई पोलिसांनी बाबा सिद्दीकी यांच्या मारेकऱ्यांकडून तीन पिस्तुल जप्त केल्या आहेत. ज्यामध्ये एक ऑस्ट्रेलियन बनावटीचे ग्लॉक पिस्तूल, एक तुर्की बनावटीचे पिस्तूल आणि एक देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली.
 
पोलिसांचे तपासकार्य सुरूच
 
गोळीबार करणाऱ्यांपैकी धर्मराज कश्यप, गुरमेल सिंह या दोघांना घटनास्थळावरून अटक करण्यात आली होती. तसेच त्यांना मदत करणाऱ्या प्रवीण लोणकर याला गुन्हे शाखेने पुण्यातून अटक केली होती. याप्रकरणी गोळीबार करणारा शिव कुमार ऊर्फ शिवा गौतम याच्यासह आरोपींना मदत करणारे मोहम्मद झिशान अख्तर व शुभम लोणकर यांचा शोध सुरू असून त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी १५ पथके तैनात केली आहेत.
 
शुभम लोणकरविरोधात 'लुक आउट सर्क्युलर' जारी
 
यायप्रकरणातील मुख्य संशयित म्हणून ओळखला जाणारा शुभम लोणकर याच्याविरोधात मुंबई गुन्हे शाखेने लुक आउट सर्क्युलर (एलओसी) जारी केले आहे. सिद्दिकी यांच्या हत्येसाठी आर्थिक मदत व शस्त्रांचा पुरवठा शुभम लोणकरच्या माध्यमातून करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे. सिद्दिकींच्या हत्येनंतर शुभम लोणकर नेपाळला पळून जाण्याची शक्यता असल्यामुळे मुंबई पोलिसांनी त्याचा मागोवा घेण्यासाठी एलओसी जारी केले आहे, जेणेकरुन तो कोणत्याही आंतरराष्ट्रीय सीमारेषा ओलांडण्याचा प्रयत्न करण्याआधी त्याला अटक करता येईल.
 
 
 
Powered By Sangraha 9.0