जम्मू आणि काश्मीर : संविधानिक लोकशाही प्रक्रियेचा विजय

    17-Oct-2024
Total Views |
jammu and kashmir constitutional democracy


सातत्याने दहशतवाद्याच्या सावटाखाली जगण्याची सवय लागलेले काश्मिरी नागरिक, आज स्वतंत्र भारताच्या लोकशाही व्यवस्थेत मोकळा श्वास घेत आहेत. याला मुख्य कारण म्हणजे, केंद्र सरकारने ‘कलम 370’ च्या विळख्यातून केलेली काश्मिरातील जनतेची सुटका. त्यानंतर दीर्घकाळ लोटल्यावर, काश्मिरामध्ये विधानसभेच्या निवडणुका शांततेत आणि जनतेच्या उत्स्फुर्त प्रतिसादामध्ये पार पडल्या आणि जनतेने कौलही दिला. काश्मिरमध्ये दहा वर्षांनी झालेल्या या लोकशाहीच्या उत्सवाचा हा आढावा घेणारा लेख...

जम्मू आणि काश्मीर विधानसभेची ही निवडणूक खर्‍या अर्थाने ऐतिहासिक ठरली. भारताचे संविधान पूर्णपणे लागू झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक होती. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूक निकालांनंतर, भाजप मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांच्या भाषणातील या वक्तव्याला अनेक पैलू आहेत. भाजपच्या पूर्वसुरी जनसंघ यांची ‘एक देश में दो विधान, दो निशान और दो प्रधान नहीं चलेंगे’ या सूत्रावर स्थापनेपासून अढळ निष्ठा आहे. आपल्या प्रत्येक निवडणूक जाहीरनाम्यात त्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. त्यानुसार वर्ष 2014 आणि 2019 साली भाजपला स्पष्ट जनादेश मिळाला आणि ’राष्ट्र प्रथम’, राष्ट्रीय एकता यावर अढळ निष्ठा ठेवणार्‍या, केंद्र सरकारने दृढ राजकीय इच्छाशक्तीचे दर्शन घडवले.

5 ऑगस्ट 2019 रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व राष्ट्रपतींनी, गॅझेटमध्ये प्रसिद्ध केल्याप्रमाणे ’कलम 370’ चे सर्व खंड भविष्यात लागू असणार नाहीत, तसेच 35अ कलम रद्द झाले असण्याचीही घोषणा केली. ’कलम 370’ च्या खंड-3 मध्येच राष्ट्रपती जम्मू आणि काश्मीर घटनासमितीच्या शिफारशीने, केवळ गॅझेटमध्ये सार्वजनिक प्रसिद्धी देऊन हे कलम रद्द करु शकतात अशी तरतूद होती. जम्मू आणि काश्मीरची घटनासमिती 1956 साली विसर्जित झाली होती. जम्मू आणि काश्मीर राज्याची विधानसभा हीच त्या घटनासमितीची घटनात्मक आणि कायदेशीर वारसदार झाली. विधानसभा विसर्जित असताना आणि ’कलम 356’ नुसार राष्ट्रपती शासन लागू असताना, वैधानिक आणि कार्यकारी अधिकार राज्यपालांकडे असतात. 2019 साली जम्मू आणि काश्मीरची विधानसभा विसर्जित होती. तत्कालीन राज्यपालांनी शिफारस केली, त्यानुसार राष्ट्रपतींनी गॅझेटमध्ये प्रसिद्ध केले व त्याची घोषणा गृहमंत्र्यांनी केली.

’कलम 370’ हे जम्मू आणि काश्मीरसाठी ’तात्पुरत्या तरतुदी’ असणारे कलम होते. त्यानुसार भारताच्या संसदेने पारित केलेले सर्व कायदे, जम्मू आणि काश्मीरच्या राज्य विधानसभेच्या मान्यतेशिवाय लागू होत नसत. यासोबतच त्या राज्याला वेगळे संविधान, वेगळा झेंडा असण्याचेही मान्य करत होते. कलम 35अ हे 1954 साली, संविधानाच्या ’कलम 368’ मध्ये असलेल्या घटनादुरुस्ती विषयक तरतुदींना पूर्णपणे फाटा देऊन, केवळ राष्ट्रपतींच्या आदेशाने घालण्यात आले. यानुसार जम्मू आणि काश्मीरचे ’कायमचे निवासी’ अशी श्रेणी तयार केली गेली. त्यांना राज्याच्या राज्यघटनेनुसार विशेषाधिकार मिळाले. त्या श्रेणीत नसलेल्या पण, राज्यात पाकिस्तानातून आलेले निर्वासित, वाल्मिकी, पहाडीसारखे काही समाजगट यांना ते नाकारण्यात आले होते.

’कलम 370’ आणि 35अ हे तेथील समाजमनात, त्यांचा विशेषाधिकार असल्याचे बिंबले आहे. किंबहुना राज्यातील फुटीरतावादी गट आणि नेत्यांनी हे बिंबवण्यास प्रचंड मोठा हातभार लावला आहे. जम्मू आणि काश्मीर राज्य फुटीरतावाद आणि दहशतवाद, यामुळे कायम धुमसत राहिले होते. भारतीय सशस्त्र दले, निमलष्करी दले, स्थानिक पोलीस त्याचा सातत्याने सामना करावा लागत होता. ‘कलम 370’ आणि 35अ रद्द करण्याच्या निर्णयाला कायदेशीर, सामाजिक आणि राजकीय पातळीवर विरोध झाला, तो होणारच होता. अनेक संस्था, संघटना सर्वोच्च न्यायालयात गेल्या. ‘कलम 370’ आणि 35अ मुळे, जम्मू आणि काश्मीर बाहेरील भारतीय नागरिकांच्या मूलभूत अधिकारांना बाधा पोचत होती, असे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी नमूद केले. सर्वोच्च न्यायालयाने 2023 साली स्पष्टपणे 5 ऑगस्ट 2019 सालचा निर्णय घटनात्मक असल्याचा निर्वाळा दिला.

त्या ऐतिहासिक निर्णयानंतर, जम्मू आणि काश्मीरला भारताचे संविधान खर्‍या अर्थाने पूर्णपणे लागू करण्याची प्रक्रिया सुरु झाली. त्यात राज्याचे विभाजन करुन, जम्मू आणि काश्मीर व लडाख हे केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले. त्यात जम्मू आणि काश्मीरसाठी विधानसभेची तरतूद करण्यात आली.

केंद्र सरकारने 2020 साली जम्मू आणि काश्मीरसाठी रहिवासी दाखल्याची (डोमिसाईल क्लॉज)तरतूद केली. त्यानुसार, भारतातील इतर कोणत्याही राज्यांप्रमाणेच कोणत्याही व्यक्तीने, 15 वर्षे वास्तव्य केले, सात वर्षे शिक्षण घेतले, तसेच दहावी, बारावीच्या परीक्षा दिल्या असतील तर, केंद्रशासित प्रदेशात रहिवासी दाखला मिळवू शकतो.

केंद्र सरकारने राज्यातील 14 भूमीविषयक कायदे बदलले किंवा रद्द केले. ’जम्मू अ‍ॅण्ड काश्मीर एलिअनेशन ऑफ लॅण्ड अ‍ॅक्ट, 1938’ आणि ’बिग लॅण्डेड इस्टेट्स अबोलीशन अ‍ॅक्ट, 1950’ या दोन कायद्यांनुसार कायम रहिवासी नसलेल्या नागरिकांना, राज्यात जमीन खरेदी करता येत नव्हती तेही रद्द केले.

संसदेने पारित केलेली भारतीय न्याय संहिता आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष अधिनियम हे कायदेही जम्मू आणि काश्मीरमध्ये लागू झाले. न्याय संहितेने राज्याच्या राज्यघटनेनुसार लागू असणारे ’रणबीर पिनल कोड’ रद्दबातल ठरवले. यामुळे खर्‍या अर्थाने जम्मू आणि काश्मीरचा विशेषाधिकार संपला आणि तो भारताच्या इतर सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसारखाच एक झाला.

सात दशकांनंतर प्रदेशात वास्तव्य करणार्‍या वाल्मिकी, पहाडी, गड्डा ब्राह्मण, कोळी अशांसारख्या समाजगटांना जमीन खरेदी करण्याचा, सरकारी नोकरी मिळवण्याचा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मतदानाचा अधिकार मिळाला.
 
संविधानाच्या भाग नऊ मध्ये त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची तरतूद आहे. ‘कलम 370’ रद्द झाल्यानंतर, सात दशकात पहिल्यांदाच जम्मू आणि काश्मीरमध्ये ग्रामपंचायत, पंचायत डेव्हलपमेंट कौन्सिल (पंचायत समिती समकक्ष) आणि डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट कौन्सिल (जिल्हा परिषद समकक्ष) साठीही निवडणुका झाल्या. या निवडणुकांना उमेदवारी, निवडणूक प्रक्रिया सहभाग, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या मतदान प्रक्रियेत लोकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेत, स्थानिक प्रशासन लोकशाही पद्धतीने होत आहे.

2022 साली दोन्ही केंद्रशासित प्रदेशांसाठी, ‘परिसीमन आयोगा’ची स्थापना झाली. त्यानुसार लडाखसाठी एक, जम्मू-काश्मीरसाठी पाच लोकसभा मतदारसंघांचे परिसीमन करण्यात आले. तसेच, जम्मू आणि काश्मीर मध्ये 90 विधानसभा मतदारसंघांचे परिसीमन करण्यात आले.

एप्रिल-मे 2024 रोजी लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. निवडणूक राजकीय सभांपासून ते प्रत्यक्ष मतदान याला लोकांचा प्रचंड सकारात्मक प्रतिसाद लाभला. या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभा निवडणुका झाल्या, निकाल जे काय लागायचे ते लागले.

विधानसभा निवडणुकांचे निकाल पाहता, भाजप बहुमताच्या जवळपास देखील नाही. किंबहुना भाजप आणि नॅशनल कॉन्फरन्स यांनी जिंकलेल्या जागांमध्ये, जम्मू आणि काश्मीर खोरे, हिंदूबहुल जम्मू आणि मुस्लीमबहुल काश्मीर खोरे, अशी स्पष्ट विभागणी दिसून येते. तो गहन, चिंतनीय विषय आहेच. अनेक देशांच्या निवडणूक प्रतिनिधींनी, निरीक्षकांनी जम्मू आणि काश्मिरातील सुरक्षित वातावरणातील, मुक्त आणि निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेचा अनुभव घेतला. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य अतिशय महत्त्वपूर्ण आहे. हा भारताच्या भारताच्या संविधानिक लोकशाही प्रक्रियेचा, सुरक्षा दलांचा हा एका अर्थी विजयच आहे. हा भारताच्या लोकांचा विजय आहे. हा भारताचा विजय आहे.
 

शौनक कुलकर्णी 
9404670590