मानव संबंध व्यवस्थापनातील शिखरपुरुष : रतन टाटा

    17-Oct-2024
Total Views |
industrialist ratan tata timeless management


मृत्यूनंतर झालेली गर्दी हीच माणसाने कमावलेली खरी संपत्ती असते. रतन टाटांच्या अमाप ‘संपत्ती’चे दर्शनच त्यांच्या मृत्यूनंतर जगाला झाले. व्यवसाय व्यवस्थापनात जपलेल्या मानवी मूल्यांचा परिपाक म्हणजेच, अंत्यदर्शनासाठी झालेली टाटा समूहाच्या कर्मचार्‍यांची गर्दी होती. व्यवसाय करताना माणुसकी जपण्याचा वस्तुपाठच रतन टाटांनी घालून दिला त्याविषयी...

"माझा निर्णय स्पष्ट आहे, या देशाला वाहनपुरवठा करण्याचा करार या क्षणी रद्द झाला आहे. व्यवसाय-व्यवस्थापन क्षेत्रात मानवी पैलूंना व मूल्यांना मोठे स्थान आहे. शेकडो निरपराधांचे बळी घेत, संपूर्ण मुंबईवर जीवघेणे बॉम्बहल्ले करणार्‍या पाकिस्तानला, यापुढे टाटा समूहाकडून वाहन पुरवठा होणार नाही.” रतन टाटांनी ‘टाटा उद्योग’ उद्योग समूहाचे अध्यक्ष म्हणून वरील रोखठोक निर्णय घेण्यामागे पार्श्वभूमी होती, 26/11 रोजी मुंबईवर पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून झालेल्या भीषण हल्ल्याची.

काही तज्ज्ञ-सहकार्‍यांकडून वरील कथित निर्यात व्यवसायाचा करार असा रद्द केल्यास व्यावसायिक नुकसान तर होईलच, शिवाय मोठी नुकसान भरपाई पण द्यावी लागेल असे सांगण्यात देखील आले. मात्र, रतन टाटा आपल्या निर्णयावर ठाम राहिले. त्यांच्या मते, “माझ्या देशाचे नागरिक आणि देशहित यापेक्षा माझा व्यवसाय मोठा थोडाच आहे? मला माझ्या देशवासीयांचा बळी घेणार्‍यांबरोबर व्यवसाय करायचा नाही हे निश्चित.”

26/11च्या दहशतवाद्यांच्या बॉम्ब हल्ल्यांंमध्ये मुंबईच्या टाटा उद्योग समूहांतर्गत असणार्‍या ’ताज’ या पंचतारांकित हॉटेलवर, दहशतवाद्यांनी धाबा बोलल्यावर, ’ताज’च्या तीन कर्मचार्‍यांनी आपल्या प्राणाची आहुती देत, मोठ्या संख्येत भारतीय व विदेशी पाहुण्यांचे प्राण वाचविले होते. ’ताज’वरील त्या हल्ल्यानंतरच्या आपल्या पहिल्याच मुंबई भेटीत, रतन टाटांनी आपले कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडलेल्या कर्मचार्‍यांच्या घरी जाऊन, त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणात विध्वंस व जाळपोळ झालेल्या ’ताज’ हॉटेलला भेट दिली. पूर्ण हॉटेलची पाहणी केल्यावर त्यांनी सुरूवातीला नमूद केलेला निर्णय घोषित केला व त्यावर ते शेवटपर्यंत ठाम राहिले.

केवळ व्यवसायातच नव्हे, तर रतन टाटांनी सेवा व सामाजिक क्षेत्रातही त्यांनी अग्रणी स्वरुपाचे काम केले. विविध प्रकारे सामाजिक, शैक्षणिक व सेवा क्षेत्रात केलेल्या सातत्यपूर्ण व उल्लेखनीय कामगिरीशिवाय रतन टाटा यांनी, भारतीय विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी, कॉर्नेल विद्यापीठाला एकूण 28 दशलक्ष डॉलर्सची देणगी दिली. यामुळे गरीब व मध्यमवर्गीय भारतीय विद्यार्थ्यांना मदत होत आहे. याशिवाय त्यांनी मुंबईच्या ‘आयआयटी’ला, 2014 साली खास अद्ययावत तंत्रज्ञान व संशोधनाला चालना देण्यासाठी 95 कोटींची देणगी दिली. दरवर्षी आपल्या कमाईतील विशिष्ट हिस्सा रतन टाटा धर्मादाय कामासाठी खर्च करीत असत, व या सार्‍यामागे जनसामान्यांच्या हित आणि कल्याणाचीच भावना असे.
 
रतन टाटांच्या वैयक्तिक कारकिर्दीच्या संदर्भात सांगायचे म्हणजे, त्यांनी 1961 साली टाटा समूहाची प्रसिद्ध कंपनी टाटा स्टीलमधून, आपल्या करिअरची सुरूवात केली. सुरूवातीच्या काळात त्यांनी प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रियेत व स्वतःच्या हाताने काम केले. भारतीय उद्योग विश्वातील असे हे एकमेवाद्वितीय उदाहरण म्हणावे लागेल.
 
त्यानंतर रतन टाटा 1975 साली ‘हॉर्वर्ड बिझनेस स्कूल’मध्ये व्यवसाय व्यवस्थापन शिकण्यासाठी गेले. त्यांनी कॉर्नेल युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मधून पदवीही मिळविली. आर्थिकदृष्ट्या व जागतिक अर्थव्यवस्थेच्या संदर्भात, 1991 सालचे हे वर्ष खूप महत्त्वाचे ठरते. त्याच दरम्यान देशात उदारीकरण व खाजगीकरणाचे धोरण स्वीकारण्याच्या पार्श्वभूमीवर, रतन टाटा हे टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली या उद्योग समूहाने केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात आपली छाप सोडली. 1990 ते 2012 सालापर्यंत रतन टाटा, टाटा समूहाचे अध्यक्ष होते. ऑक्टोबर 2016 ते फ्रेबुवारी 2016 सालापर्यंत त्यांनी समूहाचे अध्यक्षपद भूषविले. त्याशिवाय रतन टाटांनी ‘एअर इंडिया’चा आपल्या उद्योग साम्राज्यात समावेश करून, आपला औद्योगिक वारसा जागतिक पातळीवर सुद्धा एका नव्या उंचीवर नेला.
 
रतन टाटा यांच्या कार्यकाळातील परमोच्च टप्पा वा घटना म्हणून, त्यांच्या निवृत्तीचा उल्लेख करावा लागेल. उच्च पदस्थांची नियुक्त कुणाची पण गाजते. मात्र, यासंदर्भात पण रतन टाटांचे व्यवस्थापन वैशिष्ट्य म्हणजे, त्यांची सर्वाधिक गाजलेली निवृत्ती. 2002 साली वयाच्या 65व्या वर्षी रतन टाटा निवृत्त होणार होते. मात्र, कंपनीने त्यांना निवृत्त होण्याची परवानगी नाकारली. एवढेच नव्हे, तर त्यानंतरही तीन वर्षांनी कंपनी बोर्डाने रतन टाटांच्या निवृत्तीच वय 65 वर्षे राहील, असे जाहीर केले. ही त्यांच्या कामाची मोठीच पोचपावती म्हणायला हवी.

टाटा वाहन उद्योग क्षेत्रातील मोठ्या व महत्त्वाच्या निर्णयांवर, रतन टाटांच्या मानवी मूल्यांच्या महात्म्याची छाप स्पष्टपणे दिसून येते. ’टाटा-सुमो’ या टाटा वाहन उद्योगाच्या अत्यंत उपयुक्त व लोकप्रिय वाहनाला त्यांनी जोडलेले ’सुमो’ हे नाव म्हणजे, त्यांचे अत्यंत जवळचे सहकारी व सुमो प्रकल्पावर आघाडीने काम करणार्‍या सुमंत मुळगावकर यांच्या कामाची स्मृती चिरंतनपणे जपण्याचा तो प्रयत्न होता.

त्याचप्रमाणे ‘टाटा इंडिका’ म्हणजे संपूर्णपणे स्वदेशी बनावटीची गाडी, तर लाखभर रुपयात गरिबांचेही चारचाकीचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी वाहन उद्योगात नवे व्यावसायिक अर्थशास्त्र टाटांनीच रुजविले. प्रसंगी घाट्याचा सौदा केला पण, ‘गरिबांची गाडी’ देण्याचे आपले ब्रीदवाक्य त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केले. त्यामागे सर्वसामान्यांचा विचारच प्रामुख्याने त्यांनी केला.
 
कंपनी, कंपनीचे कामकाज व कर्मचारी या सार्‍यांमध्ये सामंजस्यच नव्हे, तर एकजिनसीपणा कसा असायला हवा, याचे उदाहरणच रतन टाटा यांनी घालून दिले. त्यामुळे जमशेदपूर पासून, पिंपरी-चिंचवडपर्यंतच्या कर्मचारी कुटुंबीय व त्यांच्या पिढ्या यांच्या जीवनात, ‘टाटा’ संकल्पना-संस्कृतीला एक महत्त्वाचे व मानाचे स्थान कायमचे लाभले. आम्ही टाटा उद्योगात काम केले. आम्ही टाटा कॉलनीत राहिलो, एवढेच नव्हे, तर माझे शिक्षण टाटांच्या शाळेत झाले, असे सांगणार्‍या पिढ्या सदोदित दिसतात. अशा पद्धतीने टाटांनी जपणूक केलेला मानवीय पैलू त्यांच्याच नव्हे, तर भारतीय उद्योग क्षेत्रासाठीही मार्गदर्शक ठरला.
 
रतन टाटांचे पुण्यावर विशेष प्रेम कायमस्वरुपी राहिले. याच कारणाने दि. 28 डिसेंबर 2012 रोजी आपल्या कार्यालयीन कामातून निवृत्त होण्याच्या अखेरच्या दिवशी, रतन टाटा यांनी पुणे येथील कर्मचार्‍यांसह घालविला. याचे कारण म्हणजे, ‘टाटा मोटर्स एम्लॉईज युनियन’चे तत्कालीन अध्यक्ष विष्णू नवले यांनी टाटांना त्यांचा वाढदिवस, कंपनी कर्मचार्‍यांसह साजरा करण्याची विनंती केली. टाटांनी ती मान्य केली त्यामुळे तो दिवस सर्वांच्याच कायमस्वरुपी स्मरणात राहिला.

कर्मचारी संघटनेच्या संदर्भात पण, रतन टाटा यांची अशीच मानवीय स्वरुपाची भूमिका होती. टाटा उद्योगांतर्गत ‘टेल्को कामगार संघटने’चे लढाऊ नेते राजन नायर नमूद करतात की, टेल्कोमधील संघर्षानंतर 1989 साली 20 हजार कामगारांचे प्रतिनिधित्व करणार्‍या टाटा उद्योग संघटनेचे कार्याध्यक्ष म्हणून कर्मचार्‍यांच्या मागण्यांची पूर्तता व्हावी, यासाठी त्यांनी शनिवारवाड्यावर 11 दिवसांचे उपोषण केले. त्यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातील उद्योग तीन दिवस सलग बंद होते. यावर तोडगा काढण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी पुढाकार घेऊन, रतन टाटा व राजन नायर यांच्यात चर्चा-बैठक घडवून आणली. त्यावेळी रतन टाटांनी समूह अध्यक्ष म्हणूनच नव्यानेच सूत्र स्वीकारली होती, तरी त्यांनी राजन नायर आणि कर्मचार्‍यांच्या मागण्या ऐकल्या व समजून घेतल्या. त्यांच्या बोलण्यात आम्हाला प्रामाणिकपणा दिसला, मुख्य म्हणजे त्यांनी चर्चेदरम्यान आमच्याशी आदरपूर्वक बोलणी केली याचा उल्लेख राजन नायर आजही करतात.

या सार्‍या टप्प्यात राजन नायर यांच्याशी टाटा उद्योगाचे प्रसंगी तीव्र मदभेद होऊनही, आजही राजन नायर यांच्या कार्यालयात रतन टाटांच्या छायाचित्राला स्थान आहे ते कायम स्वरुपी. ‘व्यवस्थापन-कामगार संघटना’ संबंध यासंदर्भात पण वस्तुनिष्ठ भूमिका घेत, रतन टाटांनी मानवीय मूल्यांची जपणूक केली. त्यामुळेच त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पिंपरीतील सुमारे एक हजार कामगार रात्रपाळी संपवूनही आवर्जून गेले. रतन टाटांनी जपलेल्या मानवीय संबंधांचा परिचय त्याच्या मरणानंतर पण अशाप्रकारे आला.

दत्तात्रय आंबुलकर 
9822847886