International sawfish day | दुर्मीळ करवत मासा महाराष्ट्रातून नामशेष ?; २०१७ साली शेवटची नोंद

17 Oct 2024 10:40:10


sawfish maharashtra 
 


मुंबई (अक्षय मांडवकर) -
करवतीसारखा लांब तोंड असणारा करवत मासा म्हणजेच 'साॅ फिश' हा महाराष्ट्रातून नामशेष झाला आहे का? असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. कारण, राज्याच्या सागरी परिक्षेत्रामध्ये हा मासा दिसल्याची शेवटची नोंद २०१७ साली झाली असून त्यानंतर हा मासा आढळलेला नाही. 'इंटरनॅशनल युनियन फाॅर काॅझन्झर्वेशन आॅफ नेचर'ने (आययूसीएन) देखील या माशाला 'नष्टप्राय' श्रेणीत स्थान दिले असून राज्यातील परिक्षेत्रात हा मासा सापडण्याची शक्यता धूसरच आहे. (sawfish in maharashtra)
 
 
शार्क, स्टींग रे, गिटारफीश म्हणजेच पाकट आणि मुशी यांचा समावेश हा 'इस्लामोब्रान्च' कुळामध्ये होतो. करवत मासा म्हणजेच 'साॅ फिश'चा समावेश देखील याच कुळात होतो. महाराष्ट्राच्या सागरी परिक्षेत्रामधून करवत माशाच्या 'ग्रीन साॅ फिश', 'लार्ज थूट साॅ फिश' आणि 'नॅरो साॅ फिश' या तीन प्रजातींच्या नोंदी आहेत. या तिन्ही प्रजाती 'भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्या'अंतर्गत प्रथम श्रेणीत संरक्षित आहेत. 'आययूसीएन'ने या तिन्ही प्रजातींना 'नष्टप्राय' श्रेणीत स्थान दिले आहे. यामधील 'ग्रीन साॅ फिश' ही भारताच्या सागरी परिक्षेत्रामधून आणि 'नॅरो साॅ फिश' ही प्रजात कर्नाटक ते ओडिशापर्यंतच्या सागरी परिक्षेत्रामधून नामशेष झाल्याची शक्यता 'आययूसीएन'ने वर्तवली आहे. महाराष्ट्रामधून करवत माशाची पहिली नोंद मुंबईतून १९२८ सालची आहे. त्यानंतर १९३८ साली मुंबईतच सापडलेला ६ मीटर लांब करवत मासा हा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयामध्ये संवर्धित करुन ठेवण्यात आला आहे.

 
 
महाराष्ट्राच्या सागरी परिक्षेत्रात हा मासा आजवर सापडण्याच्या केवळ २८ नोंदी आहेत. राज्यात हा मासा २०१७ साली शेवटचा पाहण्यात आला होता. विजयदुर्ग येथील एका मच्छिमाराने या मासा पकडून बंदरावर आणून त्याचा लिलाव केला होता. लिलाव केलेल्या या माशाचे शरीर वन विभागाने ताब्यात घेतले होते. त्यानंतर गेल्या सात वर्षांमध्ये हा मासा राज्याच्या किनारपट्टीवर आढलेला नाही. अतिमासेमारी, परांसाठी तस्करी आणि अनावधानाने जाळ्यात अडकणे, अशा काही कारणांमुळे हा मासा संकटात सापडलेला आहे.
 
 
 
 
करवत माशाविषयी
लांबी साधारण तीन ते सहा मीटर
मुस्कट पुष्कळ लांब आणि पात्याप्रमाणे चापट
दोन्ही कडांवर खूप मोठ्या दातांची एकेक ओळ
मुस्कटाची संरचना दुधारी करवतीसारखी असल्यामुळे त्यावरुन करवत मासा हे नाव
हा मासा प्रामुख्याने १० मीटर खोलीपर्यंत आढळतो.
प्रजननासाठी कांदळवनांमधील उथळ पाण्यात येतो



कोळी बांधवांची धार्मिक आस्था
महाराष्ट्रातील कोळी बांधव या माशाला सोंडाला किंवा नाल या नावाने ओळखतात. सोंडेसारखे तोंड असणारा म्हणून सोंडाला, असा या नावाचा अर्थ आहे. पूर्वी कोकणातातील दशावतरांच्या सादरीकरण्यामध्ये करवत माशाची सोंड अस्त्र म्हणून वापरत असत.अरबी समुद्रातील खांदेरी बेटावरील वेताळ देवाला ही सोंड वाहण्याची प्रथा आहे. मच्छीमारांना हा मासा सापडल्यास त्याची सोंड कापून त्यावर आपलं नाव लिहून ती देवाला अप्रण करण्याची प्रथा आहे. त्यामुळे वेताळ देवाच्या मंदिरात आजही करवत माशाच्या कित्येक सोंड या अडकवलेल्या दिसतात.

भागधारकांचा सहभाग महत्त्वाचा
अनावधानाने होणारी मासेमारी म्हणजेच 'बायकॅच' हा करवत माशाला असणारा एक मुख्य धोका आहे. प्रामुख्याने ट्राॅल आणि गीलनेट जाळीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या जाळ्यात हे मासे अडकले जातात. पकडल्यानंतरही हा मास जिवंत असतो. त्यामुळे त्याला पुन्हा पाण्यात सोडल्यानंतर तो जगण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच मच्छीमारांसारख्या भागधारकांना एकत्रित करुन भरपाई योजना राबवून आपण या माशाचे संवर्धन करु शकतो. या माशाविषयी काही माहिती असल्यास ९०९६७००९१६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केंद्रीय समुद्री मात्स्यिकी संशोधन संस्थेने (सीएमएफआरआय) केले आहे. - डाॅ. अजय नाखवा, शास्त्रज्ञ, आयसीएआर-सीएमएफआरआय, मुंबई
 
 

प्रजनन संथ
करवत माशांचे प्रजनन फार संथ असून त्यांचा प्रजननाचा दर कमी असतो. त्यामुळे त्यांची संख्या वेगाने वाढत नाही. अशा परिस्थितीमुळे या प्रजातीला नामशेष होण्याच्या धोका अधिक आहे. - स्वप्निल तांडेल, सागरी जीवशास्त्रज्ञ
Powered By Sangraha 9.0