बेगडी ‘निर्भय’ नव्हे, ‘सजग राष्ट्रवादी’

17 Oct 2024 22:44:39
bjp nationalism election agenda


काँग्रेसच्या फुटीतरवादी प्रचाराला प्रखर राष्ट्रवादाने उत्तर देण्याचे भाजपने निश्चित केले आहे. या भूमिकेची मागणी देशातील अनेक राज्यांमधून आली आहे. पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड राज्यांमध्ये वाढत असलेल्या बांगलादेशींच्या घुसखोरीमुळे तेथील आदिवासी संख्या देखील रोडावली आहे. त्यामुळे यासगळ्या पार्श्वभूमीवर सजग राष्ट्रवाद महत्वाचा आहे...

हिंदूंच्या एका जातीला दुसर्‍या जातीशी लढवायचे हेच काँग्रेसचे धोरण आहे. हिंदूंमध्ये जितकी फूट पडेल, तितका काँग्रेसला फायदा होईल हे काँग्रेसला माहीत आहे. काँग्रेसला हिंदू समाज कोणत्याही प्रकारे पेटवत ठेवायचा आहे, जेणेकरून त्यावर राजकीय भाकरी भाजत राहता येईल. भारतात जिथे जिथे निवडणुका होतात, तिथे काँग्रेस हाच फॉर्म्युला लागू करून, हिंदू समाजाला फोडून विजयाचा फॉर्म्युला बनवते. अशा अतिशय स्पष्ट शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. 9 ऑक्टोबर रोजी, म्हणजेच हरियाणातील विक्रमी विजयानंतरच्या एका कार्यक्रमात वक्तव्य केले होते. हा कार्यक्रम होता महाराष्ट्रातील विविध विकासकामांच्या ऑनलाईन उद्घाटनाचा. मात्र, या विधानाद्वारे पंतप्रधान मोदी यांनी, महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासह, यापुढे भाजपचा प्रचाराचा सूर काय राहणार आहे, हेच स्पष्ट केले.
 
महाराष्ट्र विधानसभेची घोषणा आता झाली आहे. येत्या तीन ते चार दिवसात महायुती आणि महाआघाडीचे जागावाटप आणि उमेदवारांचीही घोषणा होईल. महाराष्ट्रातही हिंदुत्व अर्थात राष्ट्रवाद हाच मुद्दा केंद्रस्थानी ठेवण्याची रणनिती, भाजपने आखल्याचे दिसते. अर्थात, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीसोबत त्यांची ‘निर्भय बनो’ असे सांगणारी नाटकशाळादेखील, महायुतीविरोधात प्रचार करणार आहे. या नाटकशाळेमध्ये वकील, पर्यावरणवादी, सामाजिक कार्यकर्ते, डाव्या विचारांच्या संघटना आणि समाजमाध्यमांवरील ब्रिगेडी पोरंटोरं, अर्थात पुरोगामीत्वाच्या नावाखाली जातीय द्वेष आणि हिंदूद्वेष पसरविणार्‍यांची जत्रा यामध्ये आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात या नाटकशाळेने, बर्‍यापैकी धुमाकूळ घालण्याचा प्रयत्न केला होता. तसाच प्रयत्न विधानसभा निवडणुकीतही करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. अर्थात, लोकसभेवेळी या नाटकशाळेला समोरून निमंत्रण देण्यात आले होते. यावेळी मात्र ते आपणहूनच प्रयोग करण्यास तयार झाले आहेत. अर्थात, या नाटकशाळेच्या विखारी प्रचारापासून, मविआ नेते स्वत:ला दूर ठेवण्याची शक्यता जास्त आहे. कारण, महाराव नामक इसमाने, हिंदूविरोधी वक्तव्य केल्यानंतर हिंदूंनी त्यास माफी मागण्यास भाग पाडले. त्यानंतर नाटकशाळेसह ब्रिगेडी पोराटोरांना, त्याविरोधात मविआ नेते काहीतरी बोलतील अशी आशा होती. मात्र, पवारांसह सर्वच नेत्यांनी महारावपासून दूर राहणेच पसंत केले. त्याचे कारण होते, ते हरियाणाचा निकाल आणि त्याचे महाराष्ट्रात उमटणारे पडसाद.

हरियाणात पूर्णपणे फसलेला अजेंडा, महाराष्ट्रात चालविण्याची हिंमत आता राहुल गांधी, शरद पवार ते उध्दव ठाकरे हे दाखविणार नाही. काँग्रेसने त्यांच्या कथित संविधान बचाव अजेंड्यावर, पुढील कित्येक निवडणुका लढविण्याचा मनसुबा केला होता. मात्र, हरियाणाने तो धुळीस मिळवला आहे. अर्थात, महाराष्ट्रामध्ये वेगळाच जातीयवादी खेळ करण्यात मविआ व्यस्त आहे. त्याद्वारे कोणत्याही एका समाजाचे हित साधायचे नसून, केवळ एका विशिष्ट जातीच्या नेत्यास त्यांना बदनामी करायचे आहे. मात्र, त्यामुळे राज्यातील सामाजिक समीकरणे अतिशय विकृत पातळीस पोहोचली आहेत. महाराष्ट्रात अशा विकृतांची सत्ता आल्यास, भयानक स्थिती निर्माण होणार यात शंका नाही. त्यामुळेच अतिशय ‘सजगपणे राष्ट्रवादी’ भूमिका मांडण्याचे काम समाजातील सज्जन विचारवंत करत आहेतच.

केवळ हरियाणा अथवा महाराष्ट्रच नव्हे, तर बिहारमध्येही हिंदूहिताचे विषय केंद्रस्थानी येण्यास प्रारंभ झाला आहे. बिहारसाठी तसे पाहिले तर हा नवा प्रयोग ठरू शकतो. सध्या बिहारच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. एकीकडे भाजप-जदयु सरकारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आहेत, दुसरीकडे आपली शक्ती वाढवणारा भाजप, स्वत:चे मजबूत अस्तित्व निर्माण करणारे राजदचे तेजस्वी यादव आणि नवा पक्ष स्थापन करून रिंगणात उतरलेले प्रशांत किशोर.
 
मात्र, बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने आपला मास्टरस्ट्रोक खेळला आहे. भाजपने आपले फायरब्रॅन्ड नेते केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना हिंदू स्वाभिमान यात्रेच्या माध्यमातून पुढे केले आहे. त्याचवेळी भाजप आ. हरिभूषण ठाकूर बच्चौल यांनी, सीमांचलला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्याची मागणी करून, हिंदुत्वाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. मात्र, ही मागणी नवीन नाही. याआधीही सीमांचलला केंद्रशासित प्रदेश बनवण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र सध्याच्या संदर्भात भाजप आ. हरिभूषण ठाकूर बच्चौल यांनी पुन्हा एकदा चर्चा करून, बिहारच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.
 
भाजप आ. हरिभूषण ठाकूर बच्चौल यांनी सीमांचल भागात हिंदू अल्पसंख्याक झाल्याचा मुद्दा उपस्थित करत, किशनगंज, अररिया, कटिहार आणि पूर्णियासह, बंगालमधील काही जिल्ह्यांचा समावेश करून केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्याची मागणी, केंद्र सरकारकडे केली आहे. त्याचे कारण सांगताना बच्चौल म्हणाले की, बांगलादेशी घुसखोरांमुळे बिहारमधील चार जिल्ह्यांमध्ये हिंदू अल्पसंख्याक झाले आहेत. सीमावर्ती राज्यांतील असे जिल्हे विलीन करून, केंद्रशासित प्रदेश बनवावेत. बिहारमधील किशनगंज, अररिया, कटिहार आणि पूर्णिया या चार जिल्ह्यांमध्ये, दिवसेंदिवस बांगलादेशी घुसखोरांची ये-जा सुरूच आहे. या चार जिल्ह्यांत हिंदू अल्पसंख्य झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्येही हीच परिस्थिती आहे. केंद्रशासित प्रदेश निर्माण करूनच घुसखोरीवर नियंत्रण मिळवता येईल. बिहारमधील अररिया, किशनगंज, कटिहार आणि पूर्णिया आणि झारखंडच्या दुमका, पाकूर, साहेबगंज आणि राजमहलमध्ये, आदिवासींची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे धार्मिक आणि सामाजिक असंतुलन बिघडले असून, लोकसंख्येच्या समतोलावरही परिणाम होत आहे.

जेथे जेथे हिंदूंची संख्या कमी झाली, तेथे फाळणीची मागणी जोर धरू लागली, मग तो भाग देशापासून वेगळा झाला या इतिहासाची आठवण भाजप नेत्याने करून दिली आहे. मात्र, हरिभूषण बच्चौल यांच्यापूर्वी, भाजपचे खा. निशिकांत दुबे यांनी ही मागणी केली होती. बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमधील काही भाग एकत्र करून केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्याची त्यांची मागणी होती. लोकसभेत हा मुद्दा उपस्थित करताना ते म्हणाले होते की, झारखंडमधील संथाल परगणा भागातील आदिवासींची लोकसंख्या, बांगलादेशी घुसखोरांमुळे कमी होत आहे. या समस्येवर उपाय म्हणजे, पश्चिम बंगालचे मालदा आणि मुर्शिदाबाद, बिहारचे अररिया, किशनगंज आणि कटिहार आणि झारखंडच्या संथाल परगणा भागातील सहा जिल्हे - गोड्डा, देवघर, दुमका, जामतारा, साहिबगंज आणि पाकूर यांचा समावेश करून, केंद्रशासित प्रदेश तयार करणे. तसे झाले नाही तर, हिंदू एक दिवस अल्पसंख्याक होतील. मग इथून फुटीरतावादी घटक सक्रिय होतील, आणि भारतापासून वेगळे होण्याची मागणी करू लागतील. निशिकांत दुबे यांनी सभागृहाला माहिती देताना सांगितले की, 2000 साली झारखंड बिहारपासून वेगळे झाले तेव्हा, संथाल परगणा भागातील 36 टक्के लोकसंख्या आदिवासींची होती. आता ती 26 टक्क्यांवर आली आहे. राज्यात 25 विधानसभेच्या जागा आहेत. जिथे मुस्लीम मतदारांची संख्या 110 टक्क्यांवरून, 125 टक्के झाली असल्याचा दावाही त्यांनी केला. त्यामुळे झारखंड निवडणुकीसह बिहारमध्येही आता ‘सजग राष्ट्रवाद’ हा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे.



Powered By Sangraha 9.0