मविआची मुख्यमंत्रीपदासाठी संगीतखुर्ची सुरूच! आता पवारांनी दिले 'या' नेत्याबद्दल संकेत! राऊतांची धुसफूस

17 Oct 2024 18:26:22
 
Pawar & Raut
 
सांगली : विधानसभा निवडणूका जवळ आल्या असूनही महाविकास आघाडीतील मुख्यमंत्रीपदाचा वाद काही संपताना दिसत नाही. उबाठा गट आणि काँग्रेसनंतर आता शरद पवारांनीसुद्धा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्याचे वक्तव्य केले. त्यामुळे जयंत पाटील मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणार का? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
 
सांगलीतील इस्लामपूरमध्ये शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेची सांगता सभा पार पडली. यावेळी जयंत पाटलांच्या भाषणाच्या वेळी त्यांच्या समर्थकांनी महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री अशी घोषणाबाजी केली. त्यानंतर अशी घोषणा देऊन कोणी मुख्यमंत्री होत नाही. त्यासाठी उठाबशा काढाव्या लागतात, असं वक्तव्य जयंत पाटलांनी केलं.
 
हे वाचलंत का? -  वांद्रे पूर्व मतदारसंघात उबाठा गटाचा उमेदवार ठरला!
 
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, "आज जयंतराव ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हिंडत काम करत आहेत, कष्ट करत आहेत, लोकांना विश्वास देताहेत, दिलासा देताहेत, त्यांच्या या प्रयत्नांच्या पाठीशी महाराष्ट्राची तरुण पिढी सामुदायिकपणाने एका विचाराने निश्चित उभी राहील आणि जे स्वप्न आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणात महाराष्ट्राबद्दलचे आहे त्याची पूर्तता या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. हे काम एक ऐतिहासिक काम आहे आणि ज्या भागातील नेतृत्वाने स्वातंत्र्यासाठी एक इतिहास निर्माण केला. मला आनंद आहे की, आजच्या पिढीच्या जयंतरावसारख्या नेतृत्वाला उद्याचा महाराष्ट्र घडवण्याची आणि सावरण्याची भूमिका आपल्या खांद्यावर घ्यावी ही तुमची, माझी आणि संपूर्ण महाराष्ट्राची अपेक्षा आहे. त्या अपेक्षेच्या पूर्ततेला तुम्हा सगळ्यांची शक्ती असली पाहिजे," असे ते म्हणाले. शरद पवारांच्या या विधानाने त्यांनी जयंत पाटलांच्या मुख्यमंत्रीपदाचे संकेत दिले का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे.
 
आम्ही चर्चा करू : संजय राऊत
 
शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर संजय राऊतांची मात्र धुसफूस बघायला मिळाली. ते म्हणाले की, "पवार साहेबांचे तसे संकेत असतील तर आम्ही त्यावर चर्चा करू. पण ते कधी असे संकेत देत नाहीत. त्यांनी मधल्या काळात रोहित पवारांवरसुद्धा मोठी जबाबदारी टाकण्याची घोषणा केली होती. पण एका पक्षात दोन मुख्यमंत्री होत नाही," असे ते म्हणाले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0