‘तुतारी’ची ‘पिपाणी’ वाजणार?

16 Oct 2024 12:27:15


tutari
 
मुंबई : (Tutari - Pipani Symbol Confusion) ‘राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी!’ म्हणत दारोदारी फिरणार्‍या शरद पवार गटाला ‘केंद्रीय निवडणूक आयोगा’ने झटका दिला आहे. ‘तुतारी’ चिन्हासारखे दिसणारे ‘पिपाणी’ हे चिन्ह यादीतून हटवण्याची त्यांची मागणी फेटाळून लावण्यात आली आहे. आता हे चिन्ह अपक्ष उमेदवारांना मिळणार असल्यामुळे ‘तुतारी’ची ‘पिपाणी’ वाजणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
 
लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे निवडणूक चिन्ह मिळाले होते. तर, या चिन्हाशी साधर्म्य साधणारे ‘पिपाणी’ चिन्ह अपक्ष उमेदवारांना दिले गेले. “चिन्हसाधर्म्यामुळे ‘पिपाणी’ला राज्यात दीड लाख मते पडली, तर सातारा मतदारसंघातील उमेदवार शशिकांत शिंदे पराभूत झाले,” असा दावा जयंत पाटील यांनी केला होता. “त्यामुळे विधानसभा निवडणुकीत हा गोंधळ टाळण्यासाठी निवडणूक आयोगाने ‘पिपाणी’ चिन्ह गोठवावे,” अशी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आली होती.
 
याविषयी माहिती देताना केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, “या प्रकरणात आमच्याकडे दोन विनंत्या आल्या होत्या. ‘तुतारी’ चिन्ह गोठवावे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे चिन्ह मतदानयंत्रावर छोटे दाखविले जाते, त्याचा आकार वाढवावा. त्यावर, ‘तुतारी वाजविणार्‍या माणसा’ला मतदान यंत्रावर कशा पद्धतीने दाखवले गेले पाहिजे, हे तुम्हीच आम्हाला सांगा, अशी सूचना आम्ही त्यांना केली. त्याप्रमाणे, त्यांच्याकडून ज्या पद्धतीचे चिन्ह दिले गेले आहे, ते आम्ही मान्य केले. यावेळी त्यांचे चिन्ह आकाराने मोठे दाखवले जाईल.”
 
दरम्यान, “दुसरे म्हणजे ‘पिपाणी’ चिन्ह आणि ‘तुतारी वाजविणारा माणूस’ यांचा एकमेकांशी काहीच संबंध नाही. त्यामुळे ‘पिपाणी’ चिन्ह हटवले जाणार नाही,” असेही राजीव कुमार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे हे चिन्ह अपक्ष उमेदवारांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून ‘तुतारी’ची ‘पिपाणी’ वाजणार, हे निश्चित मानले जात आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0