शेखरच्या संघर्षाची सुवर्ण ‘रेखा’

    16-Oct-2024
Total Views |
shekhar rankhambe


लोककलावंतांच्या भूमीत जन्मलेल्या आणि लघुपटांच्या दिग्दर्शनातून ‘राष्ट्रीय पुरस्कारा’ला गवसणी घालणार्‍या शेखर रणखांबे यांच्या संघर्षमय प्रवासाची कथा...

शेखर बापू रणखांबे याचा जन्म सांगली जिल्ह्यातील, तासगाव तालुक्यातील पेड या गावात झाला. पेड या गावाला लोककलावंतांचा वारसा आहे. बाबाजी साठे आणि उमाजी सावळसकर या लोककलावंतांनी, ‘मोहना बटाव’ नावाचे पहिले वगनाट्य केले होते. याच गावात शेखर रणखांबे या तरुणाच्या आयुष्यालाही, तमाशामुळे कलाटणी मिळाली. शेखरचा प्रवास खडतर असून, रणखांबे कुटुंबात खायची तोंडे पाच. शेखरचे वडील हे मंडप बांधण्याचे काम करतात, तर आई शेतात मजूरी करते. लहानपणापासून तमाशा पाहत असताना घरात वगनाट्य, बतावणी करणार्‍या शेखरला, आपण कलाक्षेत्रातच करिअर घडवायचे असे वाटत होते. गावात यात्रेनिमित्त राज कपूर आणि दादा कोंडके यांच्या चित्रपटांच्या थिएटर प्रिंट आल्या की, चित्रपट पडद्यावर दाखवले जायचे. दादा कोंडके यांचे शिक्षण कमी होते, मग आपणही या क्षेत्रात का जाऊ शकत नाही? असा सवाल त्याला सतावत होता. त्यानंतर शेखरने दादा कोंडके यांचे अनेक सिनेमे पाहिले. त्यामध्ये दादा कोंडकेंची भाषा, चित्रपटातील ब्लॅक ह्यूमर कळू लागल्याने, शेखरला चित्रपटाचे वेड लागले. शेखरने मागे वळून न पाहता मुक, धोंडा, पॅम्प्लेट आणि रेखा असे लघुपट करत, मातीशी नाळ जोडलेल्या कलाकारांना त्याने संधी दिली.

सांगली जिल्हा हा तसा दुष्काळी पट्टा. २००१ साली सांगली जिल्ह्यात दुष्काळाचे संकट ओढावले होते. त्यावेळी वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी ओठांवर मिसरूड न फुटलेल्या शेखरने, अहिल्यानगरची वाट धरली. पोटापाण्यासाठी त्याने कॅन्टीनमध्ये वेटर म्हणून काम केले. त्याठिकाणी शेखरच्या वयाचे अनेक विद्यार्थी येत असत, तेव्हा शेखरच्या मनात आपल्या कामाविषयी न्यूनगंड निर्माण झाला. त्यावेळी शेखरच्या आई रोजंदारीवर डोंगर फोडण्याचे काम करत होत्या. शेखरनेही काही दिवस डोंगर फोडण्याचे काम केले. गावी राहून डोंगर फोडून हाताला जखमा झाल्या. हे असेच सुरू राहिले, तर चित्रपटाचे स्वप्न अपूरे राहील असे त्याला वाटू लागले. त्यानंतर शेखरने रोजच्या पैशातून मुंबई मायानगरी गाठली, पण आता पोटाच्या खळगीचे काय? डोक्यावरील छताचे काय? त्यावेळी शेखरचे चुलते हे नवी मुंबईतील घणसोलीतील एका लहान खोलीत राहत होते. त्यावेळी शेखर प्लबिंगचे काम शिकला आणि शेखरने आपल्या पोटापाण्यासाठी प्लबिंगचे काम करत वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी, कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यांवर पेलली.

प्लबिंगच्या कामातून येणार्‍या काही शिल्लक पैशातून आणि आपल्या बहिणीचे दागिने गहाण ठेऊन शेखरने, ‘मुक लघुपट’ दिग्दर्शित केला होता. मात्र ऐनवेळी ‘मुक’ या लघुपटाचा डेटा करप्ट झाला. त्यावेळी शेखर मुंबईतील हार्बर लाईनच्या स्टेशनवर रडत बसला. शेखरने हार न मानता उरलेल्या पैशातून तजवीज करून, ‘मुक’ हा लघुपट पुन्हा चित्रित केला. ठाणे येथील एका लघुपट महोत्सवात शेखरचा ‘मुक’ नावाच्या लघुपटाचे स्क्रिनिंग करण्यात आले होते. तेव्हा योगायोग असा की, मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक रवी जाधव यांनी ‘मुक’ हा लघुपट पाहून, शेखरसोबत काम करण्यास रस दाखवला. त्यानंतर शेखरने ‘पॅम्प्लेट’ नावाचा लघुपट केला. ज्यांना अभिनयाचा ’अ’ ठाऊक नाही, अशांना शेखरने आपल्या लघुपटात संधी दिली. हा लघुपट ‘आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ गोवा येथे निवडण्यात आला. ‘पॅम्प्लेट’चे कामही रवी जाधव यांनी पाहिल्यानंतर, शेखरसाठी रवी जाधव धावून आले. त्यांनी ‘रेखा’ नावाच्या लघुपटाच्या निर्मितीची जबाबदारी घेतली.

’रेखा’साठी शेखरने सांगलीतील तमाशात काम करणार्‍या, माया पवारची निवड केली. तिला लिहिता वाचता येत नाही, चूल-मूल संकल्पनेत गुरफटलेल्या मायाला, शेखरने संवाद कसा करायचा, याचे मार्गदर्शन केले. ‘रेखा’ लघुचित्रपटात पारधी समाजाच्या माया पवारला, अनेक ठिकाणी पुरस्कार मिळाले. या लघुपटाला ‘उत्कृष्ट लघुपट’ म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने नावाजले गेले. या लघुपटात स्वच्छ भारतासोबतच, रस्त्यावर बसणार्‍या भिक्षा मागणार्‍या महिलांचे आयुष्य या लघुपटाच्या माध्यमातून मांडण्याचे काम शेखरने केले.

शेखरमुळे जागरण-गोंधळात नाचकाम करणार्‍या माया पवारची, सांगलीतील अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण झाली. ‘रेखा’ हा लघुपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोवा येथे दाखवण्यात आला. यावेळी माया पवारला अभिनेत्री म्हणून गौरवण्यात आले. दारोदारी भटकून, लहानसहान वस्तू विकून उदरनिर्वाह करणार्‍या आणि शारीरिक स्वच्छता या संकल्पनेपासून दूर असणार्‍या, महिलांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न त्यात केला. रवी जाधव यांनी शेखरला दिलेल्या संधीचे शेखरने सोने केले.

लघुपटातील अभिनेत्री मायाची दखल प्रसारमाध्यमांनी घेतली. तिच्या आवतीभोवती असणार्‍यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी, शेखरचा समाजाप्रती मोलाचा वाटा आहे. शेखरचा आगामी सिनेमा दिवाळीनंतर प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. मात्र चित्रपटाचे नाव गुलदस्त्यात आहे. शेखरच्या दैदिप्यमान भविष्यासाठी दै. ‘मुंबई तरूण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा!

सुशांत काळे