साधण्या विकास, हवा दुर्वृत्तींचा त्याग!

    16-Oct-2024
Total Views |
sadhnya vikas durvrutticha tyag
माहिर्भूर्मा पृदाकुर्नमस्त आतानानर्वा प्रेहि।
घृतस्य कुल्या उप ऋतस्य पथ्याः अनु॥
(यजुर्वेद - 6/12)
अन्वयार्थ -(आ तान) हे विस्तार करू इच्छिणार्‍या विकासप्रिय मानवा! तू (अहिः) साप (मा भूः) होऊ नकोस! तू (पृदाकुः) विंचू किंवा लांडगा (मा भूः) बनू नकोस! (ते नमः) तुझ्याकरिता सदैव नमस्कारपूर्वक नम्रतेचा व्यवहार आहे. (अन् अर्वा) निराभिमानी होऊन (प्र इहि) तू पुढे ये आणि आपला विकास कर! (घृतस्य कुल्या) स्नेहांच्या धारांच्या (उप) जवळ जा, आश्रय घे! (ऋतस्य पथ्याः) सत्याच्या मार्गांचे (अनु) अनुसरण कर!
विवेचन

प्रगती. मग ती व्यक्तिगत असो की, सामाजिक अथवा राष्ट्रीय असो किंवा वैश्विक, त्यांच्यासाठी विस्तार आणि विकास या दोन तत्त्वांची फार गरज असते. अगोदर अंतरंग व बहिरंग विस्तार साधला की, मगच विकासाच्या वाटा रुंद होत असतात. आपण आपल्या सर्व प्रकारच्या सद्गुणांचे शिखर गाठावे. मात्र, संकुचित राहून हा विकास शक्यच नाही. प्रतिकूल परिस्थितीत जन्मलेले मूल कठोर परिश्रमाने विद्या, ज्ञान, उत्तम आचार-विचार आणि सद्गुणांच्या माध्यमाने, आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विस्तार करते. त्यामुळेच मग त्याच्या सर्वांगीण प्रगती होते. परिपूर्णता प्राप्त झाली की, मग त्यांना ‘विकासपुरुष’ किंवा ‘विकासस्त्री’ म्हणून ओळखले जाते.
या मंत्रात आलेले आ+तान हे संबोधन व्यक्ती, समाज व राष्ट्राकरिता आलेले आहे. विस्तार किंवा विकास थांबला, तर सर्व काही ठप्प होणार. म्हणूनच स्वस्थ समाजाचे लक्षण म्हणजे निरंतर विस्तृत होणे आणि सदैव विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करणे होय. विस्तृतपणे विकसित होण्यासाठी, प्रथमतः आपल्यातील नानाविध अपप्रवृत्तींचा नायनाट करावा लागतो. म्हणूनच अगदी सुरुवातीलाच वेदमाऊली म्हणतेय -
मा अहि भूः!
अर्थात हे मानवा! तू अहि म्हणजेच साप बनू नकोस. सापाच्या अनिष्टवृत्तींना आपल्यामध्ये आणू नकोस. साप हा चालताना वेडावाकडा चालतो, तर त्याच्या मुखामध्ये भयंकर विष साठलेले असते. साप न होणे म्हणजेच, माणसाने व्यवहारात वाकडेपणा न बाळगणे. साप हा गती करताना वक्र चालतो, पण मानव हा तर पदोपदी वेडावाकडा व्यवहार करतो. त्याची ही वाकडी चाल केवळ त्याच्यासाठी विनाशकारी ठरते असे नव्हे, तर त्याच्यामुळे परिसरालादेखील त्रास सहन करावा लागतो; ही किती दुर्दैवाची गोष्ट! वक्रतेबरोबरच साप हा आपल्या दातात विष धारण करतो. सापाचे हे विष इतके भयंकर असते की, सर्पदंशी माणसाला थोड्याच वेळात आपले प्राण गमवावे लागतात. सापापेक्षा मानवाचे विष मात्र वेगळेच आहे. सापाच्या दातात विष आहे, पण मानवाने तर आपल्या सर्वांगामध्ये व सर्वइंद्रियांमध्येही विष साठवले आहे. पाहताना दृष्टीत कामवासनेचे विष आहे. कानात अपशब्द ऐकण्याची विषकारक वृत्ती आहे. वाणीतून खोटारडे बोलणे व शिव्याशापांची लाखोली वाहणे, हे अत्यंत विघातक विष नव्हे काय? इतकेच काय, तर विचार करतानासुद्धा, मनात इतरांचा नाश करण्याची विषारी प्रवृत्ती बाळगली आहे. मा अहिः भूः! म्हणजेच मानवाने सापाच्या वृत्तीला दूर करण्याचा प्रयत्न करणे होय.
पुढील मत्रांश म्हणतो - मा पृदाकुः भूः! प्रदाकु शब्दाचे विंचू, लांडगा, वाघ, चित्ता इत्यादी अनेक अर्थ होतात. मानवाने या सर्व प्राण्यांतील वृत्ती आपल्यामध्ये येऊ देऊ नयेत. म्हणजेच विंचू बनू नये, लांडगा होऊ नये, वाघ किंवा चित्तादेखील बनू नये. विविध भाष्यकारांनी प्रदाकु शब्दाचे लांडगा व विंचू हेच अर्थ घेतले आहेत. लांडगा हा अतिशय क्रोधी व हिंस्त्र असतो. मानवाने आपल्यातील क्रोधाचा त्याग करावा व अहिंसा धर्माचे पालन करावे. क्रोध हा अग्नीसमान आहे. बाहेरचा अग्नी विझवणे सोपे असते, पण अंतरंगामध्ये निर्माण झालेला क्रोधाग्नीला शांत करणे खूप कठीण. म्हणूनच माणसाने लांडग्यासारखी क्रोध व हिंसेची दुर्भावना सोडावी.
अहि शब्दाचा अर्थ विंचूदेखील होतो. सर्पाच्या विषामुळे माणसाचा मृत्यू होतो, पण विंचवाच्या विषाने मात्र माणूस, वेदनेने अतिशय व्याकुळ होतो. विंचवाचे उदाहरण देण्याचे कारण हेच की, त्याच्या नांगीत थोडेसेच विष असते, पण त्याच्यामुळे माणसाला त्रास मात्र खूप होतो. म्हणजेच विंचवाला आपल्या विषाचा गर्व असतो. वाईट प्रवृत्तीच्या माणसांमध्ये विषधारी प्रवृत्ती थोडी जरी असली, तरी त्याला त्याचा गर्व व अभिमान अत्यधिक असतो. त्याच्याच बळावर तो इतरांकरिता त्रासदायक ठरतो. विंचवाची हीच वृत्ती माणसाने प्रयत्नपूर्वक सोडावयास हवी.
माणसाच्या वाईट प्रवृत्ती नष्ट होतात, तेव्हा निश्चितच तो नम्र होतो. त्याच्या या नम्र सत्प्रवृत्तीमुळेच, सामान्य लोक अशा सज्जन माणसाला वंदन करण्यास तत्पर होत असतात. मंत्रात म्हटले आहे - नमस्त (ते नमः)! सद्गुणांनी परिपूर्ण अशा हे मानवा! तुला सर्वांचा नमस्कार असो! पुढे म्हटले आहे - अनर्वा प्र इहि! कोणत्याही प्रकारचा अभिमान किंवा गर्व न बाळगता हे माणसा! तू प्रगतीसाठी पुढे ये! एका सुभाषितकाराने म्हटले आहे - अभिमानं श्रियं हन्ति! अभिमान व गर्वामुळे सर्व प्रकारचे ऐश्वर्य व लक्ष्मी नाश पावते. गर्व किंवा अभिमान बाळगणे म्हणजे संकटांना आमंत्रणच!
आपल्या या पवित्र व उत्तम आचरणामुळे मानवी जीवन प्रेमस्नेहाचे आगर बनते. मंत्राचा उत्तरार्ध हाचआशय व्यक्त करताना उपदेश करतो,
घृतस्य कुल्या उप, ऋतस्य पथ्या अनु!
लौकिक भाषेत घृत म्हणजे तूप होय. तुपामध्ये स्निग्धता व रूचिप्रियता असते. घृत म्हणजेच आरोग्यासाठी अमृततुल्य सर्वोत्तम औषधी! स्निग्धतेचे दुसरे नाव स्नेहशीलता! आपल्या जीवनातून स्नेहाच्या धारा प्रवाहित कराव्यात. सर्वांशी स्नेह व वात्सल्यपूर्ण व्यवहार हा खर्‍या अर्थाने त्याला विकासाच्या उच्च शिखरावर पोहोचवितो. स्नेहलतेसोबत सत्यप्रियता हवी. म्हणूनच जे सृष्टीतील ऋत म्हणजेच अपरिवर्तनीय सत्य आहे, त्याचा अंगीकार करावयास हवा.आपल्या आत्म्याला आवडणारी प्रत्येक सत्य बाब म्हणजेच ऋत होय. ज्या ऋषी-मुनी व सद्पुरुषांनी ऋततत्त्वाचे अनुगमन केले, त्याच महानतम ऋत मार्गावर चालण्याचा प्रयत्न करणे, आवश्यक आहे. मन व इंद्रियांच्या पलीकडे जाऊन आत्मतत्त्वाचा साक्षात्कार करणे म्हणजेच, ऋताचारी बनणे होय. याच मार्गांनी वाटचाला करणारा माणूसच, खर्‍या अर्थाने आपल्या जीवनाचा विस्तार करतो व विकासाच्या दिशेने वाटचाल करतो.
प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य