ओमर अब्दुल्ला यांनी घेतली जम्मू – काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

16 Oct 2024 16:51:12

omar abdullah
 
नवी दिल्ली : ( Omar Abdullah )नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी बुधवारी जम्मू-काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. दरम्यान, काँग्रेसने सध्या तरी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला नाही.
 
जम्मू – काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी श्रीनगरमधील शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर येथे अब्दुल्ला आणि त्यांच्या मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. मेंढर येथील नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार जावेद अहमद राणा, रफियााबादमधील जावेद अहमद दार, डीएच पोरा येथील सकीना इट्टू आणि नौशेरा येथील सुरिंदर कुमार चौधरी यांनाही एलजी सिन्हा यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ दिली. सुरिंदर चौधरी उपमुख्यमंत्री बनले आहेत. सुरिंदर चौधरी यांनी नौशेरामधून भाजपच्या रविंदर रैना यांचा पराभव केला आहे. छंब विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार सतीश शर्मा यांना ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.
 
शपथविधी सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी - वाड्रा उपस्थित होते. नॅशनल कॉन्फरन्सप्रमुख फारुख अब्दुल्ला, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती, आप नेते संजय सिंह, सीपीआय नेते डी. राजा उपस्थित होते.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0