मृत्यूचे रहस्य

    16-Oct-2024
Total Views |
mrutyuche rahasya



शवासन साधना

शवासन साधना सिद्ध करणार्‍या साधकाला प्रथम प्रत्येक अवयवावर ध्यान करुन, तेथून हटविताना बराच त्रास होतो. परंतु, सततच्या अभ्यासाने आपल्या शरीरातून प्राणशक्ती काढताना, अद्वितीय आनंद वाटत असतो.पायाच्या बोटांपासून गुडघ्यापर्यंत येताना, मध्येच कोठेतरी प्राणशक्तीसह साधक जीवात्मा संपूर्ण शरीराबाहेर पडून, एक अद्वितीय आनंद सागरात सुखेनैव विहार करतो. शवासन करताना साधारणतः गुडघ्याच्या वर आल्यावर साधकाला, आपल्या नाड्यांतून प्राण ओढल्यासारखे वाटेल. रुधीराभिसरण बंद पडून, हृदयही बंद पडलेले वाटेल. नंतर श्वासोच्छवास बंद पडून साधक तरंगायला लागेल. आपले शरीर अतिशय हलके पडून, जड शरीराच्या कोंदणातून सुटून कोठेतरी अंतराळात सरकत आहोत, असा साधकाला अनुभव येईल. काही साधकांना आपल्या भोवताल घनदाट काळे किंवा धूम्र वर्णाचे अवकाश पसरल्यासारखे वाटेल. काही साधकांना आपण एखाद्या घनदाट काळ्याकुट्ट गडद अंधकारनलिकेतून वा विवरातून जात आहोत, असा अनुभव येईल. काही हिंदू संस्कारांच्या साधकांना, आपल्यासमोर काळ्याकुट्ट रेड्यावर बसून काळीकुट्ट व्यक्ती म्हणजे यमराज आपल्या गळ्यात फास अडकवून, आपल्याला शरीराबाहेर ओढण्याचा प्रयत्न करीत आहे, असे वाटेल. हे अनुभव ज्याच्या त्याच्या पूर्व संस्कारांना धरुन येत असतात. मुळात तसे काहीच नसते. मनावर होणार्‍या सततच्या खोल संस्कारांना धरुन प्रत्येक साधकाला वरीलप्रमाणे विभिन्न अनुभव येत असतात. पूर्वसंस्कार मनाद्वारे साकारतात.
 
यावेळी रुधीराभिसरण आणि श्वास बंद असल्यामुळे काही हिंदू साधकांना त्यांच्या गळ्याला फास टाकून, त्यांना त्यांच्या शरीरातून वेगाने ओढण्याचा अनुभव येऊ शकेल. पूर्वी सांगितल्याप्रमाणे हे मनाचे खेळ आहेत. पूर्व संस्कारांना धरुन मन त्या त्या घटना साकारण्याचा प्रयत्न करते. मनाचे व्यवहार विलक्षण सूक्ष्म व अनाकलनीय असतात. एखाद्या अमेरिकन साधकाला या घटनेचा अनुभव असा येऊ शकेल की, त्याचा गळा एक काळाकुट्ट निग्रो दाबत असून तो काळ्या फटफटीवरुन प्रवास करत आहे. हिंदू मनाला फटफटीऐवजी काळ्या रेड्यावर यम स्वार झालेला दिसेल. मुळात काळी घनदाट अवस्था ही तत्व आहे, यमही नाही किंवा निग्रोही नाही. काही साधकांना शरीराबाहेर निघताना, सायरनसारखा सर्व आवाजांचा कल्लोळ असलेला एक विचित्र नाद ऐकू येईल. असा आवाज आल्यावर साधकाने समजावे की, तो आता जड शरीराचा त्याग करुन अवकाशात गमन करण्यास जात आहे. यावेळेस साधकाच्या जड शरीरातील श्वास, रक्ताभिसरण, हृदय स्पंदन, पेशीवृद्धी वा पेशीसंचालन सर्व बंद असते.

काही भाग्यवान साधकांना त्यांच्या दिव्य डोळ्यांसमोर एक विलक्षण तेजस्वी चक्र गरगर फिरताना दिसेल. ते चक्र शरीराबाहेर जाताना उलट गतीने म्हणजे अपसव्य (रपींळलश्रेलज्ञुळीश) गतीने फिरताना दिसेल. त्या चक्राचा नाद सायरनसारखाच असतो. इतके दिसल्यावर साधक आपले जड शरीर सोडून, हळूहळू अंतराळात आपल्या जड शरीराच्या वर साधारणतः दोन तीन फुटांवर विमानाप्रमाणे तरंगत असतो. हा अनुभव साधकाच्या जीवनात विलक्षण असल्यामुळे, त्याच्या मनात भययुक्त आनंद असतो. या अवस्थेत सभोवताली काळा, धुम्र किंवा फिका हिरवा रंग दिसू शकतो. जड शरीराचा त्याग झाल्यावर मग मन, बुद्धी, पंच ज्ञानेंद्रियांचा अनुभव कसा येईल, असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. पण मरणोत्तर अवस्थेत साधक जीवात्मा, त्याच्यासोबत आपले संस्काररुप मन, बुद्धी व पंचज्ञानेंद्रिये घेऊन जातो. त्यामुळे उद्गमन करणार्‍या जीवात्म्याला म्हणजे प्रेताला सर्व दिसते, ऐकू येते, कळते, उमगते; पण बोलता येत नाही, स्पर्श करता येत नाही आणि भोगता येत नाही. कारण ही सर्व कर्मे करण्याचे उपकरण असलेले शरीर खाली निष्प्राण होऊन पडलेले असते. काही वेळाने जीवात्म्याला सर्व परिस्थितीचे ज्ञान होऊन, तो आपले मृतवत शरीर म्हणजेच शव खाली पडलेले पाहू शकेल. मृत शरीराच्या भोवताली कोण बसले आहे, काय चालले आहे यांचे सर्व ज्ञान त्या जीवात्म्याला होत असते. पण कर्म करणारे उपकरण जड शरीर तेच खाली मृतवत् पडल्यामुळे आणि तो जीवात्मा बाहेर असल्याने, जड जगतातील घडणार्‍या घटनांना तो उर्ध्वगच्छन् जीवात्मा प्रतिसाद देऊ शकत नाही. जडशरीर आहे तसेच दिसते. काही उच्च साधकांना खाली पडलेल्या जड शरीराविरहित,त्यावर तरंगत असलेले ध्रुम वर्णाचे सूक्ष्म शरीर दिसू शकेल. या सूक्ष्म वा लिंगदेहाला मन, बुद्धी, अहंकार व पंच ज्ञानेंद्रिये असतात. त्यांचा बाह्य आकार खाली पडलेल्या जड शरीरासारखाच असतो. साधक त्या सूक्ष्म शरीराची हालचालसुद्धा करु शकतो.

मागील अध्यायात वर्णन केल्यानुसार, साधक आपल्या चार देहांपैकी दोन देहावस्थांचा अनुभव घेऊ शकतो. खाली पडलेले जड शरीर व वर तरंगणारे सूक्ष्म लिंगशरीर हा प्रत्यक्ष अनुभव आहे, आभास किंवा स्वप्न नव्हे. हा अनुभव योग्य साधना करणार्‍यांना येऊ शकतो. केवळ साधना करण्याचे कष्ट घेण्याची तयारी हवी. हे दिव्य अनुभव पुस्तके वाचल्याने किंवा प्रवचने ऐकण्याने येणार नाहीत. खाली पडलेले शव मृतवत वाटले तरी, त्या जड शरीरात जीवात्मा पुन्हा प्रवेश करेपर्यंत ते शरीर तसेच कल्प अवस्थेत असते. त्या शरीराची तशी अवस्था कल्पापर्यंतही असू शकते. ते जड शरीर मृत असले, तरी एखाद्या वाळल्या बीजाप्रमाणे योग्य परिस्थिती प्राप्त झाल्यावर पुनः जीवंत होऊन कार्य करु शकते. पण बाहेर गमन केलेला जीवात्मा त्यात पुन्हा प्रवेश करणे आवश्यक आहे. असल्या शरीरात जीवंत शरीरातील सर्व व्यवहार (metabolism) बंद असतात. ते शव देशकाल वर्तमानाचे वर असते. असे कल्पशरीर आळंदीला योगेश्वर ज्ञानेश्वर महाराजांनी आजपासून 700 वर्षांपूर्वी समाधीत ठेवले आहे. कार्य करण्याकरिता त्या कल्पशरीराचा उपयोग ज्ञानेश्वर माऊली केव्हाही करु शकतात.

परकायाप्रवेश: स्वतःच्या शरीराबाहेर स्वेच्छेने उद्गमन करणे म्हणजे शवासन साधना होय, हे आपण पाहिलेच आहे. या उद्गमनाकरिता कळत वा नकळत साधक आपल्या प्राणवहा नाडीद्वारे उद्गमन किंवा पुन्हा शरीरप्रवेश करीत असतो. पण ही साधना लक्ष ठेवून केल्यास, साधकाला स्वतःच्या शरीरातील प्राणवहा नाडीचे ज्ञान होते. तसेच अभ्यास वाढविल्यास दुसर्‍यांच्या शरीरातील प्राणवहा नाडीचेही ज्ञान होते. या ज्ञानामुळे साधक योगी स्वतःचे जड शरीरातून निघून, दुसर्‍या नुकत्याच मृत झालेल्या जड शरीरात प्रवेश करुन, काही कालापर्यंत इच्छानुरुप व्यवहार करु शकतो, यालाच परकायाप्रवेशसिद्धी म्हणतात. ही सिद्धी अतिशय कठीण आणि फसवीसुद्धा आहे. अशा तर्‍हेने परकायाप्रवेश करणारा योगी मायेत सापडल्यामुळे, त्या शरीरात बंदिस्त होऊ शकतो. (क्रमशः)

योगिराज हरकरे
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
9702937357