ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर

16 Oct 2024 11:45:40

vijay  
 
 
मुंबई : नाटक, मालिका आणि चित्रपटसृष्टीत विविधांगी भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. विजय गोखले यांनी आजवर मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टीतही महत्वपुर्ण भूमिका साकारल्या आहेत. दरम्यान, गंधार पुरस्कार सोहळा १४ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वा. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ अभिनेते उदय सबनीस आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रदीप ढवळ यांनी दिली. तसेच, २०२३पासून गंधार बालकलाकार पुरस्कार सुरू केला असून यंदाचा पुरस्कार स्पृहा दळी हिला देण्यात येणार आहे.
 
गंधार पुरस्कार जाहिर झाल्यानंतर 'दै. मुंबई तरुण भारत'शी आपल्या भावना व्यक्त करताना विजय गोखले म्हणाले की, “गंधार सारख्या नामांकित संस्थेच्यावतीने हा पुरस्कार मला जाहिर होणं ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. इतकी वर्ष मनोरंजनसृष्टीत काम केल्याची ही पोचपावती आहे. शिवाय एका छराविक नाटकाचा नाही तर एखाद्या व्यक्तिच्या कारकिर्दिची गंधार ही संस्था दखल घेते याबद्दल विशेष कौतुक आहे. आणि मला यंदाचा गंधार पुरस्कार जाहिर केल्याबद्दल मी संस्थेचा आभारी आहे”.
 
गंधार या बालनाट्य संस्थेच्यावतीने गंधार गौरव सोहळ्याचे दरवर्षी आयोजन केले जात असून यंदा या पुरस्काराचे हे नववे वर्षे आहे. ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी, विद्या पटवर्धन, दिलीप प्रभावळकर, अशोक समेळ, नरेंद्र आंगणे, अतुल परचुरे, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे यांना आतापर्यंत गंधार गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यंदाचे मानकरी विजय गोखले यांना ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रदीप ढवळ, ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे आणि ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या हस्ते गोखले यांना पुरस्कार देण्यात येणार आहे.
Powered By Sangraha 9.0