स्वतःची राज्ये गमावलेल्यांवर काँग्रेसकडून महाराष्ट्र जिंकण्याची जबाबदारी

    16-Oct-2024
Total Views |

congress
 
 
मुंबई: (Congress) स्वतःच्या राज्यांमध्ये सपाटून मार खाल्लेल्या नेत्यांवर काँग्रेसने महाराष्ट्र जिंकण्याची जबाबदारी सोपवल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तीन माजी मुख्यमंत्री आणि तीन माजी उपमुख्यमंत्र्यांचा यात समावेश आहे.
 
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी विभागनिहाय वरिष्ठ निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार, मुंबई आणि कोकण विभागासाठी राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि डॉ. जी. परमेश्वर, विदर्भासाठी छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री भुपेश बघेल, पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी, उमंग सिंघर यांची नियुक्ती केली आहे. मराठवाड्यासाठी राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि तेलंगणचे मंत्री उत्तमकुमार रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 
पश्चिम महाराष्ट्रासाठी टी. एस. सिंगदेव आणि एम. बी. पाटील, तर उत्तर महाराष्ट्रासाठी डॉ. सय्यद नासीर हुसेन आणि डी. अनसुया सिथक्का यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ‘अखिल भारतीय काँग्रेस कमिटी’चे सरचिटणीस मुकूल वासनिक आणि अविनाश पांडे हे या निवडणुकीसाठी वरिष्ठ समन्वयक असतील, असे ‘अखिल भारतीय काँग्रेस कमिटी’ने जाहीर केले आहे.
 
लंगडे घोडे मैदानात
 
अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील परस्पर मतभेदांमुळे काँग्रेसला राजस्थान गमवावे लागले. भुपेश बघेल यांना छत्तीसगढ राखता आले नाही. भाजपने त्यांना अक्षरशः धुळ चारली. तर, ज्या पंजाबमध्ये आपने काँग्रेसला ‘झाडू’न पराभूत केले, तेथील माजी मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र जिंकण्यासाठी पाठवणे म्हणजे लंगडे घोडे मैदानात उतरवून स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.