राहुल बाबाची शाळा

    16-Oct-2024
Total Views |
congress rahul gandhi statements


'इच्छिलेले जर घडते, तर भिक्षूकही राजे होते’, असे म्हणतात. देशात आणि राज्यात काँग्रेसची स्थिती याहून वेगळी नाही. लोकसभेत सत्तेची स्वप्ने पाहिली, पण गाडी 100 वरच अडकली. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये स्वबळावर विजय मिळेल, असे आडाखे बांधले गेले. मात्र, वास्तवात सपाटून मार खावा लागला. हरियाणामध्ये तर हुड्डापुत्र खुर्चीवर बसण्यापासून एक पाऊल दूर आहेत असे वाटत असताना, भाजप स्वबळावर सत्तेत आली. 2029 सालामध्ये पंतप्रधान बनण्याची तयारी करणार्‍या राहुल गांधी यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. हरियाणातील पराभव त्यांच्या जिव्हारी लागला. या निकालाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटतील, हे जवळपास सर्वच सर्वेक्षणांमधून पुढे आल्याने, ते अतिव चिंतेत आहेत. त्यामुळेच त्यांनी महाराष्ट्रातील वरिष्ठ नेत्यांना दिल्लीत बोलावले आणि त्यांची शाळा घेतली. नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड या बैठकीला उपस्थित होते. राहुल गांधींनी सुरूवातीलाच बडबोल्यांचे कान टोचले. हरियाणात स्थानिक नेत्यांमध्ये तीन गट पडले. हुड्डा, सुरजेवाला आणि कुमारी शैलजा. जाट मतांची 100 टक्के हमी देत, हुड्डा पिता-पुत्रांनी 90 पैकी 72 तिकिटे स्वतःच्या समर्थकांना दिली. प्रबळ दावेदारांना डावलून तिकिट वाटप झाल्याने, बंडखोरीला उत आला. बंडखोरांना बळ देत भाजपने विजयाचे गणित साधले. त्यामुळे हरियाणाच्या निकालातून शिका आणि महाराष्ट्रात पाय जमिनीवर ठेवा, अशा शब्दांत राहुल बाबांनी सर्वांची कानउघडणी केली. पण, दुसर्‍याचे ऐकतील, ते काँग्रेसी कसले? राहुल गांधींच्या शाळेत माना डोलावून महाराष्ट्रात परतल्यानंतर पहिले पाढे पंचावन्न. अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यापासून, प्रदेश काँग्रेसच्या पहिल्या फळीत एकही प्रभावी नेता उरलेला नाही. त्याचा फायदा घेत, दुसर्‍या फळीतील प्रत्येकानेच आपापल्या समर्थकांच्या उमेदवारीसाठी लॉबिंग सुरू केल्याचे कळते. उद्या चुकून जर का सत्ता आलीच, तर समर्थकांच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री पदावर दावा सांगता येईल, अशी त्यामागची गणिते. त्यामुळे राहुल गांधी कितीही ताक फुंकून प्यायले, तरी महाराष्ट्रातील नेते स्वतःहून महायुतीला सत्तेची दारे उघडून देतील, हे नक्की!

वडाची साल पिंपळाला

'वडाची साल पिंपळाला लाव’, म्हटल्यावर होय महाराजा म्हणणारे, अलीकडे महाविकास आघाडीत वाढलेले दिसतात. खर्‍याचे खोटे आणि खोट्याचे खरे करून सांगणार्‍या प्रवृत्तीला उद्देशून वापरली जाणारी ही म्हण ’मविआ’ इतकी चपखल, अन्य कुणालाच लागू पडणार नाही. संविधान बदलाचे ’नॅरेटीव्ह’ विधानसभेला चालणार नसल्यामुळे, त्यांनी आता नव्या ’नॅरेटीव्ह’चा शोध सुरू केलाय. महायुतीच्या सत्ताकाळात महाराष्ट्रातील उद्योग गुजरातच्या घशात घातल्याचा मुद्दा, हा त्याचाच एक भाग. उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात त्याची सुरूवात केली. महायुतीच्या काळात महाराष्ट्र मागे पडल्याचा दावा त्यांनी केला. पण, त्यांच्या भाषणाला येणारा ’फेक नॅरेटीव्ह’चा वास सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी ओळखला नसेल का? महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार, महाविकास आघाडी सत्तेत असताना राज्यातील गुंतवणुकीचा आलेख खालावला होता. त्यांच्या कार्यकाळात 2021-22 सालच्या या आर्थिक वर्षात राज्यात 1 कोटी, 14 लाख, 964 कोटींची थेट परकीय गुंतवणूक आली असली, तरी कर्नाटकने महाराष्ट्राला मागे टाकत पहिल्या स्थानावर झेप घेतली. त्यावर्षी तेथे 1 लाख, 63 हजार, 795 कोटींची गुंतवणूक झाली. मात्र, महायुतीचे सरकार सत्तेवर येताच, राज्याच्या गुंतवणूक आलेखात पुन्हा सुधारणा झाली. 2022-23 सालामध्ये 1 लाख, 18 हजार, 422 कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आली. तर, कर्नाटकला केवळ 83 हजार, 628 कोटींची परकीय गुंतवणूक आणता आली. मविआची सत्ता आल्यास, ’नोकरी, नोकरी आणि नोकरी’ला प्राधान्य देणार असल्याचे आदित्य ठाकरे ठासून म्हणाले. पण, त्यांच्या मागील सत्ताकाळात केवळ 36 हजार तरुणांना रोजगार मिळाला. तर, महायुतीने 1 लाख, 51 हजार युवकांच्या हाताला काम दिले. लघुउद्योगांना बळ देण्याची गरज आदित्य यांनी एका भाषणात व्यक्त केली. परंतु, सरकारी पैशावर दाओसला मजा मारणार्‍या आदित्यने ’एमएसएमई’साठी किती पुढाकार घेतला? त्यांच्या काळात केवळ 8 लाख सुक्ष्म उद्योगांची नोंद झाली. याऊलट महायुतीच्या अडीच वर्षांच्या काळात त्यात 77 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे वडाची साल पिंपळाला लावणारे धंदे मविआने बंद करावेत. अन्यथा हरियाणापेक्षा वाईट स्थिती ओढवेल!

सुहास शेलार