“माझ्या डोळ्यांमुळे चित्रपटात माझं कास्टिंग होतं...”; असं का म्हणाला अमेय वाघ?

Total Views |
 
amey wagh
 
 
रसिका शिंदे-पॉल
 
मुंबई : अभिषेक मेरुरकर दिग्दर्शित लाईक आणि सबस्क्राईब हा चित्रपट १८ ऑक्टोबर २०२४ रोजी महाराष्ट्रभरात प्रदर्शित होणार आहे. एका व्लॉगरची यात कथा सांगितली असून एका घटनेमुळे ती अडचणीत सापडते आणि मग पुढे जी मर्डर मिस्र्टी घडते ती पाहण्यासारखी आहे असं ट्रेलरवरुन तरी दिसून येत आहे. या चित्रपटात अमृता खानविलकर, अमेय वाघ, जुई भागवत आणि शुभंकर तावडे प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपटात अमेयची भूमिका रहस्यमयी वाटत असून ‘महाएमटीबी’शी बोलताना अमेय म्हणाला की, “माझ्या डोळ्यांमुळेच मला विशेष भूमिका आणि चित्रपट मिळत आहेत”.
 
अमेय वाघ म्हणाला की, “लाईक आणि सबस्क्राईब हा नवा थ्रिलर मर्डरमिस्ट्री चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आणि महत्वाचं म्हणजे यात मी जी भूमिका साकारली आहे त्या पात्रासाठी माझे डोळे फार महत्वाचे आहेत. बरं, असुर या वेब सीरीजमध्येही माझ्या डोळ्यांनी अधिक अभिनय केला आहे असंच मी म्हणेन. त्यामुळे माझ्या डोळ्यांमुळे मला भूमिका किंवा चित्रपट मिळत आहे असं म्हटलं तर खरंच चुकीचं ठरणार नाही”.
 
दरम्यान, लाईक आणि सबस्क्राईब'चा वर्ल्ड प्रिमीयर नुकताच सिंगापूरमध्ये पार पडला. चित्रपटामधील कलाकार अमेय वाघ, जुई भागवत, राजसी भावे आणि दिग्दर्शक अभिषेक मेरूकर यांनी प्रीमियरला उपस्थिती दर्शवली होती. या खास शोला सिंगापूरमधील मराठमोळ्या प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला असून प्रेक्षकांनी चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, अभिनय, लेखनाचे भरभरून कौतुक केले.
 
'लाईक आणि सबस्क्राईब' हा आताच्या काळाचा चित्रपट आहे. उत्कंठावर्धक कथानकामुळे हा चित्रपट खिळवून ठेवतो, काहीतरी वेगळे पाहाण्याचा अनुभव आला, मराठीत असा प्रयत्न कौतुकास्पद आहे, अशा अनेक प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून सध्या येत आहेत. सिंगापूरमधील प्रेक्षकांकडून आलेल्या या प्रतिक्रिया चित्रपटाच्या टीमला भारावणाऱ्या होत्या.
 
 
 

रसिका शिंदे - पॉल

रुईया महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण. चार वर्ष पत्रकारिता क्षेत्रात विविध वृत्तपत्र आणि डिजीटल माध्यमांत कार्यरत. सध्या 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मनोरंजन प्रतिनिधी' म्हणून कार्यरत.