आदि शंकराचार्य विरचित अष्टादश शक्तिपीठ स्तोत्र

    16-Oct-2024
Total Views |
aadi shankaracharya shaktipith stotra


आचार्य आदि शंकराचार्य यांनी आई भगवतीचे जे स्वरुप जाणले, त्याचे यथोचित वर्णन त्यांनी त्यांच्या रचनांमध्ये केले आहे. सती आणि प्रजापती दक्ष यांचा झालेला वाद, त्यातून ओढावलेला प्रसंग, सतीचे यज्ञवेदीत आत्मार्पण हा सगळ्यांनाच परिचित कथा भाग. त्यानंतर सतीच्या शरीराचे भाग ज्या 108 ठिकाणी पडले,तिथे शक्तीपिठे झाली. त्यापैकी आचार्यांनी प्रत्यक्ष दर्शन घेतलेल्या अठरा शक्तीपिठांचे नित्य स्मरण करण्यासाठी आचार्य शंकराचार्यांनी अष्टादश शक्तीपीठ स्तोत्र रचले. या स्त्रोत्राचे आशयसौदंर्य आणि निरुपण ...

आदि शंकराचार्यांनी अद्वैत सिद्धांताचा आणि सनातन वैदिक धर्माचा प्रचार आणि प्रसार करताना, आसेतुहिमाचल दोनवेळा पायी परिक्रमा केली आहे. या प्रवासात आचार्यांनी अनेक श्लोक आणि स्तोत्रे रचली आहेत. त्यात काही ईश्वरी विग्राहाच्या विशिष्ट स्वरूपाचे वर्णन करणारी स्तोत्रे आहेत, तर काही स्तोत्रे त्यांना एखाद्या तीर्थक्षेत्राला भेट दिल्यावर, तिथल्या ईश्वरी विग्रहाला पाहून तत्क्षणी स्फुरलेली आहेत. आचार्यांची शीघ्रकाव्ये म्हणून प्रसिद्ध असणार्‍या स्तोत्रांमध्ये, पांडुरंगाष्टक आणि कालभैरवाष्टक ही दोन स्तोत्रे अत्यंत प्रसिद्ध आहेत.

आदि शंकराचार्यांनी रचलेल्या देवीस्तोत्रमालेचा प्रारंभ आपण एका वेगळ्या आणि अपरिचित स्तोत्राने करणार आहोत. स्तोत्राचे नाम आहे - अष्टादश शक्तिपीठ स्तोत्र.

या स्तोत्राची थोडी पार्श्वभूमी जाणून घेऊया. प्रजापती दक्ष हा ब्रह्माचा मानसपुत्र आणि राजा होता. दक्ष श्री ललिता देवीचा अनन्यसाधारण भक्त होता. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन देवीने त्याला वरदान दिले. या वरदानाचे फळ म्हणजे, प्रजापिता दक्षाची कन्या म्हणून सतीने जन्म घेतला. वयात आल्यावर दक्षाची इच्छा होती की, तिचा विवाह विष्णूशी व्हावा. परंतु, सतीने मात्र शिवाला वरले. यामुळे दक्ष संतप्त झाला. दक्ष आणि अनेक राजांची एक सूप्त मोहीम सुरु होती, ज्या अंतर्गत इंद्र, वरुण अशा पंचमहाभूतांच्या प्रतिनिधींना आणि विष्णूला यज्ञात हवी प्रदान करायचे आणि शिवाला मात्र हवी अर्पण करायचा नाही, अशी योजना आखली जात असते. शिवांना या सर्व घटनाक्रमाची कल्पना असते. परंतु, त्यांच्या मते यज्ञात हवी अर्पण होणे न होणे, यामुळे त्यांना फरक पडत नाही.

काही काळाने दक्ष एका यज्ञाचे आयोजन करतात. त्या यज्ञाला जाणीवपूर्वक शिव आणि सतीला आमंत्रण देणे टाळतात. सती तिथे जाण्याचा हट्ट करते. शिव तिची समजूत काढतात की, तुझा ते लोक अपमान करतील. परंतु, तिला ते मान्य होत नाही.

शिवाच्या अनुमतीने ती काही शिवगणांच्या सह यज्ञस्थळी दाखल होते. हवी देण्याच्या वेळी तिचा आणि दक्षाचा वाद होतो. सतीचे मत असते की , संपूर्ण जगतात उत्पत्ती अर्थात सृजन, स्थिती अर्थात पालन आणि लय अर्थात संहार या क्रिया आवर्तनस्वरूप आहेत. सृजनकर्ते म्हणून पंचमहाभूतांना हवी अर्पण होतो, इंद्राला देवांचा राजा म्हणून हवी अर्पण होतो, विष्णूला पालनकर्ता म्हणून हवी अर्पण होतो, त्याचप्रमाणे संहार अर्थात लय ही क्रियासुद्धा सृष्टी सुचालित राहण्यासाठी आवश्यकच आहे. त्यामुळे शिवालासुद्धा हवी अर्पण केला पाहिजे, मात्र दक्ष याला नकार देतो.

त्यामुळे सती संतप्त होते, वैफल्यग्रस्त होते. कारण तिचे पती शिवाला अर्थात संहार तत्त्वाच्या स्वामीला तिचे म्हणणे पटत असले, तरी त्याला त्याचे महत्त्व नसते. तिच्या वडिलांना प्रजापती असूनही, हा सिद्धांत पटत नसतो. या शोकसंतप्त अवस्थेत सती अग्निकाष्ठे भक्षण करते, म्हणजेच यज्ञवेदीत आत्मार्पण करते.


aadi shankaracharya shaktipith stotra


या प्रसंगामुळे शिवगण संतप्त होऊन दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस करतात. शिवाला ही वार्ता कळताच ते त्या स्थानी पोहोचतात. दक्षाला दंडित केले जाते. त्याचे मस्तक उडवून त्याच्या जागी बोकडाचे मस्तक जोडले जाते. पत्नीच्या प्राणार्पणाने विद्ध झालेले शिव, सतीचे कलेवर आपल्या खांद्यावर घेऊन तिथून निघून जातात.

विमनस्क अवस्थेत शिव विचरण करत कैलासात जातात. जाताना वाटेत सतीच्या देहाचे अंश ठिकठिकाणी पडतात. ज्या ज्या ठिकाणी हे अंश पडतात, त्या त्या ठिकाणी एक शक्तिपीठ तयार होते. आपल्याकडे 51 शक्तिपीठे मानली जातात. परंतु, तंत्र शास्त्रानुसार यांची संख्या 108 आहे.

शक्तिपीठ आणि अन्य देवीचे मंदिर यांच्यात फरक असतो. श्री विद्या उपासना मार्गात देवीची तीन प्रकारांनी उपासना केली जाते. कौल मार्ग, मिश्र मार्ग आणि समयाचार मार्ग. कौल मार्गामध्ये तांत्रिक उपासना, बलीप्रदान, अघोर उपासना, पंच मकार उपासना अंतर्भूत आहेत. कौल मार्गात देवीची कर्मकांडस्वरुपाची उपासना केली जाते. मिश्र मार्गात काही प्रमाणात तांत्रिक आणि कर्मकांड उपासना असते, तर काही प्रमाणात भक्तीमार्गी उपासना असते. समयाचार हा उपासना मार्ग पूर्ण भिन्न असून, या मार्गात देवीची मानसपूजा आणि देवीच्या चेतनास्वरूपाचा स्वदेहात शोध घेणे अंतर्भूत आहे.

देवीच्या सामान्य मंदिरात देवीची मिश्रमार्गाने उपासना होते. परंतु, शक्तिपीठावर तिन्ही प्रकारांनी देवीची उपासना केली जाते, तिन्ही प्रकारचे साधक, उपासक या ठिकाणी वर्षानुवर्षे निवास करून,सिद्धी प्राप्त करून घेतात. या अष्टादश शक्तिपीठांपैकी आसामातील गौहत्ती येथील, कामाख्या शक्तिपीठ हे तंत्र उपासकांचे मुख्य केंद्र मानले जाते.

या 108 पीठांपैकी 18 शक्तिपीठांना आदि शंकराचार्यांनी स्वतः भेट दिली आहे. त्या 18 पीठाचा उल्लेख करणारे हे अष्टादश शक्तिपीठ स्तोत्र आहे.

सतीचे हे बलिदान आणि त्यानंतर शिवांचे विमनस्क विचरण आणि अंतिमतः कैलासावर जाऊन समाधीस्थ होणे, हे पती-पत्नींच्या दृढ नात्याचे, परस्पर प्रेमाचे आणि समर्पणाचे अत्युत्कृष्ट उदाहरण आहे.

अष्टादश शक्तिपीठांतील प्रथम आणि सामान्यतः आपल्या सर्वांना अज्ञात असणारे पीठ म्हणजे - लंकायाम शांकरी देवी. रावणाच्या लंकेची ग्रामदेवता. या स्थानी देवी सतीच्या मांडीच्या अस्थी कोसळल्या होत्या. या देवीचे मंदिर श्रीलंकेत त्रिंकोमाली शहरात आहे. इथेसुद्धा मुळ स्थान पोर्तुगीजांनी उद्ध्वस्त केले असून, त्याचा आता जीर्णोद्धार केला आहे.

ही देवी म्हणजे अन्य कोणी नसून, अष्टभुजा भवानीमाता आहे. तिथे तिला मथुमाई अम्मम म्हणतात. तिचे स्वरूप श्री ललिता सहस्त्रनामाच्या दृष्टीने मनोन्मयी देवीचे आहे. या नामाचे विस्तृत विवेचन, माझ्या श्री ललिता सहस्त्रनाम भावार्थ निरुपण या ग्रंथात केले आहे.

ज्या शांकरी देवीची उपासना रावणाने आणि आदि शंकराचार्यांनी केली, ते देवीचे रूप आणि हे रूप यात भिन्नत्व आहे. कारण या मंदिरातील विग्रहसुद्धा उद्ध्वस्त केला होता. परंतु, शांकरी देवीचाच अंश म्हणून, आज या देवीची उपासना केली जाते.
देवीच्या अष्टभुजा रुपात तिच्या हातात चक्र, दंड, गदा, खड्ग, अक्षमाला, धनुष्य, त्रिशूल आणि अभय मुद्रा ही शस्त्रे आहेत. शांकरी देवीचा ध्यानाचा श्लोक खूप सुलभ आणि अर्थपूर्ण आहे. शांकरी देवी ध्यान श्लोक

रावणस्तुतिसंतुष्टा कृतलंकाधिवासिनी।
सीताहरणदोषेण त्यक्तलंकामहेश्वरी॥
सज्जनस्तुतिसंतुष्टा कदंबवनवासिनी।
लंकायाम् शांकरी देवी रक्षेत्धर्मपरायणा॥
अर्थ : रावणाच्या स्तुतीने संतुष्ट झालेली लंकेची ग्रामदेवता, जिच्या उपासनेने रावणाच्या सीताहरण दोषाचे निराकरण झाले. जी सज्जनांच्या स्तुतीने प्रसन्न होते. जी कदंबवनात निवास करते. अशा लंकेच्या शांकरी देवीला मी नमन करतो. तिने मला धर्मरक्षणाची प्रेरणा प्रदान करावी आणि मला धर्मपरायण वृत्तीला अंगी धारण करण्याचे सामर्थ्य प्रदान करावे.

आदि शंकराचार्य विरचित अष्टादश शक्तिपीठ स्तोत्र पुढीलप्रमाणे


लङ्कायां शङ्करीदेवी कामाक्षी काञ्चिकापुरे।
प्रद्युम्ने शृङ्खलादेवी चामुण्डी क्रौञ्चपट्टणे॥1॥
अलम्पुरे जोगुलाम्बा श्रीशैले भ्रमराम्बिका।
कोल्हापुरे महालक्ष्मी मुहुर्ये एकवीरिका॥2॥
उज्जयिन्यां महाकाली पीठिकायां पुरुहूतिका।
ओढ्यायां गिरिजादेवी माणिक्या दक्षवाटिके॥3॥
हरिक्षेत्रे कामरूपी प्रयागे माधवेश्वरी।
ज्वालायां वैष्णवीदेवी गया माङ्गल्यगौरिका॥4॥
वारणाश्यां विशालाक्षी काश्मीरेतु सरस्वती।
अष्टादश सुपीठानि योगिनामपि दुर्लभम्॥5॥
सायङ्काले पठेन्नित्यं सर्वशत्रुविनाशनम्। सर्वरोगहरं दिव्यं सर्वसम्पत्करं शुभम्॥6॥

या स्तोत्रातील अन्य देवी आणि त्यांची स्थाने यांची माहिती देणारा तक्ता लेखासोबत देत असून, यांपैकी कोल्हापूर आणि माहूर ही दोनच स्थाने महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात आपण रेणुकामाता म्हणून जिचे पूजन करतो, तिचे मूलस्वरूप एकविरा आहे हे या तक्त्यातून आपल्या लक्षात येईलच. या मंदिरांपैकी पश्चिम बंगालमधील मंदिर आणि शारदापीठ, हे मुस्लीम आक्रमणात उद्ध्वस्त झाले होते. शारदापीठाचे पुनर्निर्माण कार्य सुरु आहे. पश्चिम बंगालमधील शृंखला देवी मंदिराचा जीर्णोद्धारसुद्धा आवश्यक आहे.
 
 
सुजीत भोगले