‘अ पोर्टेट ऑफ मॉर्डन ब्रिटन’

    16-Oct-2024
Total Views |
a potrait of modern britain


हे युग भारताचे आहे असे आपण सर्वत्र ऐकता, वचतो. या युगाचा नायक होण्यासाठी सर्व भारतीयांच्या अपार मेहनतीचेच हे फळ आहे. जसे भारतातील नागरिकांचे यामध्ये योगदान आहे, तसेच योगदान विदेशात राहणार्‍या भारतीयांचे देखील त्यात भरीव योगदान आहे. एक दिवसाआड स्वतंत्र झालेल्या दोन देशांमध्ये हाही फरक आता जगाला जाणवत आहे.

पाकिस्तानचे नागरिक त्यांच्या देशाचे नाव जगात धुळीस मिळवत असताना, भारतीय नागरिक मात्र त्यांच्या सुशील, विवेकसंपन्न चारित्र्याने भारतमातेच्या गौरव वृद्धींगत करत आहेत. ब्रिटन मधील पॉलिसी एक्सजेंचच्या अहवालामध्ये ब्रिटनमध्ये राहणारे भारतीय व्यवसाय, घरे, वेतन, सामाजिक एकात्मता जपणार्‍यांचा सर्वात मोठा गट असल्याचे म्हटले आहे. ही भारताच्या दृष्टीने नक्कीच गौरवास्पद बाब आहे. एकेकाळी कुत्र्यालाही भारतीयांपेक्षा जास्त किंमत देणारे ब्रिटीश, आज भारतीयांची स्तुतीस्तोत्रे गाताना थकत नाही आहेत.

ब्रिटनमध्ये भारतीय नागरिकांचा मोठा समूह असून, निश्चितच त्यांचे एक स्वत:चे उपद्रवमुल्य आहे. मात्र, ब्रिटनच्या संस्कृतीला धोका लागेल असे कोणतेही आचरण ब्रिटनमधील भारतीयांकडून आजवर करण्यात आलेले नाही. तसेच, ब्रिटनमध्ये राहणारे भारतीय हे शिक्षणाच्या बाबतीतही दुसर्‍या क्रमांकावर असून, अधिकाधिक उच्च शिक्षण घेण्याचा प्रयत्न ते कायम करत असल्याचे देखील या अहवालाने म्हटले आहे. असे असले तरी ब्रिटनमध्ये उच्च शिक्षण घेण्याच्याबाबतील चीनचा पहिला क्रमांक टिकून आहे.

मात्र, उच्च शिक्षण घेण्याचा थेट लाभ ब्रिटनमधील भारतीयांना नोकरी व्यवसायात होत असून, त्यामुळे उत्पन्नही सुधारेले आहे. याचा सकारात्मक लाभ बिटनमधील भारतीयांचे जीवनमान सुधारण्यात झाला असून, ब्रिटनमध्ये जवळपास 71 टक्के भारतीयांची स्वमालकीची घरे आहेत.

’अ पोर्टेट ऑफ मॉर्डन ब्रिटन’ नावाने प्रसिद्ध झालेल्या या अहवालामध्ये, पाकिस्तानी नागरिकांचा समावेश व्यवसायामध्ये सर्वात कमी कार्यरत असलेल्या गटात केला असून, त्यांचे प्रतितास वेतन देखील कमी असल्याचे अहवालामध्ये म्हटले आहे. तर बांगलादेशी नागरिकांची अवस्था यापेक्षा खराब असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकात त्यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच या अहवालामध्ये एका महत्वपूर्ण बाबीवर भाष्य केले आहे. ब्रिटनमधील सुशिक्षित नवयुवक हे डाव्या विचारसरणीकडे झुकत असून, भारतीय तरुण मात्र, उजव्या विचारांशी ठाम असल्याचे देखील अहवालात म्हटले आहे. मात्र, विचारसरणी कोणतीही असली तरी ब्रिटनमधील भारतीयांना ब्रिटनचा अभिमान असून, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी यांपेक्षा ब्रिटनमध्ये राहणे पसंद करत असल्याचेही अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.

तसेच, सध्याच्या काळातील प्रवासाची सहजसुलभ उपलब्धता आणि इंटरनेटमुळे जवळ आलेले जग, यामुळे ब्रिटनमधील अनेक पाहुण्या नागरिकांचा त्यांच्या मूळ देशाशी पुन्हा भावनिक बंध जुळत असल्याने, त्यांच्या देशात घडणार्‍या घटनांचे पडसाद सहजपणे ब्रिटनमध्ये उमटतात याकडे या अहवालाने लक्ष वेधले आहे.

ब्रिटनमध्ये भारतीयांची संख्या जास्त असून, त्यांनी कायमच त्या देशाचे नियमांचे काटेकोर पालन केले आहे. त्यामुळे साहाजिकच ब्रिटनच्या नागरिकांनाही भारतीय नागरिकांविषयी ममत्वाची भावना असून, अनेक ब्रिटन नागरिकांच्या मित्र अथवा स्नेही संख्येत बहुसंख्य भारतीय असल्याचे या अहवलाने अधोरेखित केले आहे. असे असले तरीही, खलिस्तानी दहशतवादी मधूनच भारतीयांच्या या लौकिकास बट्टा लावण्याचा प्रयत्न करत असतात. धार्मिक अस्मितेच्या नावाखाली खलिस्तान्यांनी ब्रिटनमधील गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत घातलेल्या गोंधळाकडेही या अहवालाने लक्ष वेधले आहे.

त्यामुळे ब्रिटनमध्ये खलिस्तान्यांना संरक्षण देणे ब्रिटनला परवडणारे नसल्याचेच एक प्रकारे या अहवालाने स्पष्ट केले आहे. त्यावर काम होऊन, त्यातून काय निष्पन्न होणार आहे? हे भविष्यावरच सोडावे लागेल. कारण असे कितीही अहवाल आले, तरी त्याचा राजकीय भूमिका निश्चित करताना काही फायदा कितपत होतो, हे उघड गुपीत आहे. तरीही आलेला अहवाल हा परदेशातील भारतीय नागरिकांचा आत्मविश्वास आणि पत उचंवण्यास साहाय्यकारी ठरेल यात शंका नाही.

कौस्तुभ वीरकर