मुंबईत घडतंय 'ग्रेट इन्सेक्ट मायग्रेशन'; लाखो चतुर शहरात दाखल

15 Oct 2024 12:32:02
dragonfly migration in mumbai


मुंबई (विशेष प्रतिनिधी):
'वाँडरिंग ग्लायडर' नावाचे लाखो चतुर मुंबईत दाखल असून या चतुरांचे थवे गेल्या काही दिवसांपासून आकाशात भिरभिरताना दिसत आहेत (dragonfly migration in mumbai). भारताच्या पुर्वोत्तर भागातून शहरात दाखल झालेले हे इवलेसे चतुर अरबी समुद्रामार्गे आफ्रिकेच्या दिशेने आगेकूच करणार आहेत (dragonfly migration in mumbai). त्यामुळे काही दिवसांसाठीच मुक्कामी असणाऱ्या या चतुरांना पाहण्याची संधी मुंबईकरांना मिळाली आहे. (dragonfly migration in mumbai)
 
 
 
'वाँडरिंग ग्लायडर' नावाच्या चतुरांना भटके चतुर म्हटले जाते. हे कीटक दरवर्षी भारताच्या पुर्वोत्तर भागापासून आपला प्रवास सुरू करतात आणि मजल दरमजल करत भारताच्या पश्चिम किनाऱ्यापर्यत येतात. चतुरांच्या या स्थलांतराचा काळाला संशोधक ‘ग्रेट मायग्रेशन’ संबोधतात. या स्थलांतराच्या काळात चतुर एका ठिकाणी साधारणतः आठवडाभर वास्तव्य करतात. सध्या मुंबईच्या आकाशात हे चतुर मोठ्या संख्यने विहार करताना दिसून येत आहेत. या चतुरांची लांबी दोन इंच असून त्यांच्या पंखाचा विस्तार चार इंचापर्यंत आहे. यामधील नराचा रंग हा पिवळा आणि त्यावर कुंकू लावल्यासारखा लालसर रंगाचा आहे, तर मादीच्या पिवळ्या रंगाच्या शरीरावर काळ्या रंगाचा पट्टा आहे.
वयोमानानुसार हे रंग बदलतात.
 
 
या चतुरांच्या आगमनानंतर परतीचा पाऊस सुरू होतो, असे आजवरचे संशोधन दर्शवितो. चतुरांचे हे स्थलांतर बऱ्याचकाळापासून सुरू असले तरी त्यावर फारसे संशोधन झालेले नव्हते. आता या स्थलांतराचा अभ्यास भारत, चीन, मालदीव आणि आफ्रिकेतील काही देश यांनी एकत्रितपणे केला आहे. चतुरांच्या स्थलांतरामागची नेमकी कारणे अजूनही स्पष्ट झालेली नाहीत. यावर आणखी संशोधनाची गरज आहे. पूर्वोत्तर भारत ते पूर्व आफ्रिका आणि पुन्हा पुढच्या पावसाळ्यात नवीन पिढीचा परतीचा प्रवास हे चक्र गेली अनेक वर्षे अव्याहतपणे सुरू आहे.
 
 
 
मुंबईतील प्रत्येक कानाकोपऱ्यात सध्या भटके चतुर विहार करताना दिसून येत आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील झऱ्यांपासून ते अगदी रेल्वे रुळांच्या शेजारुन वाहणारी गटारं आणि रस्त्यावरील खड्यांमध्ये साठलेल्या पाण्यात देखील हे चतुर अंडी घालताना दिसतात. - डाॅ. दत्तप्रसाद सावंत, चतुर अभ्यासक
 
 
 
Powered By Sangraha 9.0