विधानसभा निवडणूक महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी मतदान, २३ नोव्हेंबरला मतमोजणी

झारखंडमध्ये दोन टप्प्यात मतदान

    15-Oct-2024
Total Views |

vidhansabha
 
 
नवी दिल्ली, दि. १५ : (Vidhansabha 2024) महाराष्ट्र विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून २० नोव्हेंबर रोजी मतदान तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्याचवेळी झारखंडमध्ये १३ आणि २० नोव्हेंबर अशा दोन टप्प्यात मतदान होईल, अशी घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी केली आहे. त्याचप्रमाणे दोन्ही राज्यांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.
 
केंद्रीय निवडणूक आयोगाने विज्ञान भवन येथे पत्रकारपरिषद घेऊन केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि डॉ. सुखबीरसिंग संधू यांनी महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केली.
महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघांमध्ये २० नोव्हेंबर रोजी मतदान, तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीसाठीची अधिसूचना २२ ऑक्टोबर रोजी जाहिर होणार असून २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना आपली उमेदवारी दाखल करता येणार आहे. उमेदवारी अर्जांची छाननी ३० ऑक्टोबर रोजी होईल तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ४ नोव्हेंबर पर्यंत आहे.
 
महाराष्ट्रातील एकूण ३६ जिल्ह्यांमध्ये २८८ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी २३४ मतदारसंघ हे सर्वसाधारण, २५ मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी तर २९ मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत. राज्यात एकूण ९ कोटी ६३ लाख ६९ हजार ४१० मतदार आहेत. त्यापैकी ४.९७ कोटी पुरुष, ४.६६ कोटी महिला, १.८५ कोटी तरुण तर २०.९३ लाख नवमतदार आहेत. त्याचप्रमाणे ६.३६ लाख दिव्यांग, १०० पार असलेले ४७ हजार ७७६, ८५ वर्षांहून अधिक वय असलेले १२.४३ लाख तर ६ हजार ३१ तृतीयपंथी मतदार आहेत.
 
राज्यात ५२ हजार ७८९ ठिकाणी एकूण १ लाख १८६ मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. शहरी भागात ४२ हजार ६०४, ग्रामीण भागात ५७ हजार ५८२ मतदान केंद्रे असतील. प्रत्येक मतदान केंद्रावर सरासरी ९६० मतदार आपला मताधिकार बजावणार आहेत.
 
झारखंडमध्ये दोन टप्प्यात मतदान
 
झारखंडमधील २४ जिल्ह्यांमधील एकूण ८१ मतदारसंघांमध्ये १३ नोव्हेंबर आणि २० नोव्हेंबर रोजी दोन टप्यात मतदान होईल.
झारखंडमधील पहिल्या टप्प्यासाठीची अधिसूचना १८ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. तर २५ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. २८ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. ३० ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्यात येणार आहेत. तर १३ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीची अधिसूचना २२ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. २९ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. ३० ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया १ नोव्हेंबरला होणार आहे. तर मतदान २० नोव्हेंबर रोजी होणार असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.
 
पोटनिवडणुकीचीही घोषणा
 
केंद्रीय निवडणूक आयोगाने १५ राज्यांतील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. आसाममधील ५ विधानसभा मतदारसंघ, बिहारमधील चार विधानसभा मतदारसंघ, मध्य प्रदेशातील २ विधानसभा मतदारसंघ, केरळमधील २ विधानसभा मतदारसंघ, पंजाबमधील ४ विधानसभा, राजस्थानमधील ७ विधानसभा, सिक्कीममधील २ विधानसभा मतदारसंघ, उत्तर प्रदेशातील ९ आणि पश्चिम बंगालमधील ६ विधानसभा मतदारसंघ तर छत्तीसगढ, गुजरात, कर्नाटक, मेघालय आणि उत्तराखंडमधील प्रत्येकी १ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होईल. त्याचप्रमाणे केरळ आणि महाराष्ट्रातील प्रत्येक १ लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे.