वसा आरोग्यसेवेचा

    15-Oct-2024
Total Views |




अंधाराच्या छायेतून प्रकाशाकडे जाण्याचा प्रवास जितका अवघड, तितकाच त्याचा मार्ग लढाऊ असतो. कर्करोग नावाच्या या जीवघेण्या आजाराशी लढताना त्याच्या छायेत अडकलेल्या समाजाला बाहेर काढण्याचे धाडस दाखवले, ते ‘देव देश प्रतिष्ठान’ आणि ‘छबी सहयोग फाऊंडेशन’ने. ‘ईशान्य मुंबई ते ईशान्य भारत’ या प्रवासाची गोष्ट म्हणजे, एका ध्येयाने समाजसेवेचा घेतलेला वसा, जो कर्करोगपीडित प्रत्येक घरासाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी आशेचा किरण ठरला आहे. त्यानिमित्ताने या उपक्रमाचा आढावा घेणारा हा लेख...

'देव देश प्रतिष्ठान’ ही ईशान्य मुंबई जन्मभूमी असलेली संस्था 2010 पासून आरोग्यमयी राष्ट्रासाठी समर्पित या ध्येयाने प्रेरित लोकांची संघटना. नवी मुंबईतील ‘छबी सहयोग फाऊंडेशन’च्या परिसस्पर्शाने नवीन झळाळी ‘देव देश प्रतिष्ठान’ला प्राप्त झाली आणि सुरु झाला कर्करोगाशी लढण्याचा थक्क करणारा प्रवास. मुंबई, जेथे या प्रवासाचा पहिला टप्पा सुरू झाला, त्या महानगरात विविध लोकसमूह, जगण्याच्या गतीने पुढे जाणारे जीवन आणि त्यात असलेल्या चढ-उतारांनी व्यापलेले समाज आहे. या गोंधळात, कर्करोगासारख्या गंभीर आजाराची झळ अनेकांना पोहोचत असते. परंतु, जागरूकतेच्या अभावामुळे वेळेवर उपचार मिळणे दुर्लक्षित राहते. ‘देव देश प्रतिष्ठान’ आणि ‘छबी सहयोग फाऊंडेशन’ने हीच दुर्लक्षित समस्या लक्षात घेतली आणि मुंबईतील लोकांपर्यंत कर्करोगाविषयीची माहिती पोहोचवण्याचा निर्णय घेतला. शाळांपासून तरुणांपर्यंत, ज्येष्ठांपासून कर्मचार्‍यांपर्यंत, प्रत्येकाला कर्करोगाविषयी जागरूक करणे आणि त्याच्या प्राथमिक निदानाचे महत्त्व पटवून देणे हे या लढाईचे पहिले पाऊल ठरले.


आशेच्या प्रवासाची दिशा : ईशान्य भारत
 
मुंबईतून सुरू झालेला हा प्रवास ईशान्य भारतापर्यंत पोहोचला, जिथे आरोग्यसेवेची परिस्थिती अधिकच आव्हानात्मक होती. नागालँड, मणिपूर, आसाम, अरुणाचल प्रदेश अशा दुर्गम भागांत कर्करोगाविषयी जागरूकता आणि उपचार यांची अत्यंत आवश्यकता आहे. या भागांतील लोकांना माहितीचा अभाव आणि सुविधांची अनुपलब्धता यामुळे कर्करोगाला लवकर ओळखता येत नाही आणि तेव्हा उपचार करण्याची स्थिती हातातून सुटून जाते. या आव्हानात्मक प्रवासात, ‘देव देश प्रतिष्ठान’ आणि ‘छबी सहयोग फाऊंडेशन’ने कर्करोगाच्या प्राथमिक निदानाची सुविधा उपलब्ध करून दिली. या प्रवासात त्यांनी जेव्हा दुर्गम गावांत तपासणी शिबिरे आयोजित केली, तेव्हा तिथल्या लोकांच्या चेहर्‍यांवर उमटणारा आशेचा प्रकाश हा त्यांच्या कष्टांचा खरा मोबदला ठरला.


वाटेतील आव्हाने आणि ध्येयवादाचा झरा
 
हा लढा केवळ एक आजाराविरुद्धचा लढा नव्हता, तर समाजाच्या गैरसमजातून बाहेर येण्यासाठीचा एक संघर्ष होता. ‘कर्करोग’ हा अजूनही अनेकांच्या मनात भीती निर्माण करणारा शब्द आहे. या आजाराला ’अवश्य मृत्यू’ म्हणून पाहिले जाते. परंतु, ‘देव देश प्रतिष्ठान’ आणि ‘छबी सहयोग फाऊंडेशन’ने या भीतीला आव्हान दिले आणि ‘We Provide Fearlessness’ हे आपले ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न केला.
 
सहज रस्ता नाही, सहज साधने नाहीत, परंतु एक जिद्द आहे. या जिद्दीनेच त्यांनी एकामागोमाग एक गाव, शहर, आणि समुदाय गाठत कर्करोगारच्या जागरूकतेची मशाल पेटवली. त्यांची ‘कॅन्सर स्क्रिनिंग मोहीम’ म्हणजे आशेचा एक किरण, जो कर्करोगाविषयीच्या चुकीच्या समजुतींना दूर करण्याचे कार्य करत आहे. या मोहिमेत त्यांनी केवळ डॉक्टरच नाही, तर स्थानिक नेते, स्वयंसेवक आणि आरोग्य सेवक यांनाही सामील करून घेतले आहे.
 
डॉ. रविंद्र कांबळे
(लेखक देव देश वैद्यकीय शैक्षणिक
सामाजिक प्रतिष्ठानचे प्रोजेक्ट हेड आहेत.)
9821727092