90 हजार वर्षे काम करा!

    15-Oct-2024   
Total Views |
sharad pawar statement sabha


“84 वर्षांचा काय, 90 वर्षांचा झालो तरी काम करेन, जोपर्यंत महाराष्ट्राला वळणावर आणणार नाही, तोपर्यंत मी शांत बसणार नाही.” असे विधान नुकतेच शरद पवार यांनी केले आहे. शरद पवार यांच्या विधानाचा विचार केला तर वाटते की, महाराष्ट्र वळणावर आणायचे म्हणजे काय? महाराष्ट्र काय यांच्या हातातले खेळणे आहे की वस्तू? काय एकेकाचे स्वत:बद्दल गैरसमज असतात. शरद पवार यांनाही गैरसमज आहे की, सगळा महाराष्ट्र ते म्हणतील तसेच करेल. त्यांच्या मनात महाराष्ट्राबद्दल जे काही नियोजन आहे, त्यानुसारच महाराष्ट्राची जनता वागेल. 2014 सालानंतर महाराष्ट्रात आणि केंद्रातही भाजपची सत्ता आली. त्यानंतर महाराष्ट्राचा कायापालट झाला. महाराष्ट्राला भेडसावणारी मुख्य समस्या होती दळणवळणाची. चांदा ते बांदापर्यंतच्या महाराष्ट्राला वाहतूकीने जवळ आणायचे कसे? ते काम केंद्रातल्या आणि राज्यातल्या भाजप नेतृत्वाच्या महायुतीने केले. समृद्धी महामार्ग, अटल सेतू, मेट्रोसह अनेक महत्त्वकांक्षी योजना महाराष्ट्रात प्रत्यक्षात साकार झाल्या. ही प्रगती होत असतानाच,महाराष्ट्राच्या भगिनींना ‘लाडकी बहिण योजने’अंतर्गत भाजप नेतृत्वाच्या महायुती सरकारकडून चांगले सहकार्यही मिळते आहे. हे काय वाईट आहे का? शरद पवार यांना महाराष्ट्रात काय खटकते? कोरोना काळात शरद पवारांच्या हातामध्येच सत्ता होती. पण, त्यावेळी महाराष्ट्राने काय पाहिले? महाराष्ट्र म्हणतो नको आठवायला ते दिवस. दुसरीकडे शरद पवार यांनी केंदात म्हणू नका, राज्यात म्हणू नका अनेक महत्वाची पदे भूषवली आहेत. मग इतक्या वर्षाच्या काळात महाराष्ट्राची सामाजिक, धार्मिक, आर्थिक स्थिती बहुसंख्य हिंदू समाजासाठी कशी होती, हा विचार महाराष्ट्रातला हिंदू करत आहे. सत्तेत आल्यावर उपमुख्यमंत्री मुसलमान समाजाचा करणार असे म्हणणारे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले, तर जे काही करेल त्याबद्दल बोलतानाही भयंकर वाटते, असेही अनेक जण म्हणतात. असो महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्याअनुषंगाने काही लोक म्हणत आहेत की, पवार साहेब 90 काय 9 हजार वर्षे काम करा. पण जातीपातीचे राजकारण, 75 टक्के आरक्षणाची मागणी करत महाराष्ट्राला भडकवण्याचे उद्योग थांबले पाहिजेत. आमचा काही आक्षेप नाही. 90 हजार वर्ष पण काम करा..


काँग्रेसची गॅरंटी नकोच!


तेलंगणामध्ये काँग्रसने जाहीरपणे म्हटले होते की, सत्तेत आल्यावर 100 दिवसांत काँग्रेस महिलांना प्रति महिना 2 हजार, 500 रूपये दिले जातील, पण तिथे कुणालाही 2 हजार, 500 रूपये मिळाले नाही. तेंलगणाला काँग्रेसने फसवले, अशा आशयाची पत्र तेलंगणाच्या महिलांनी काँग्रेसच्या राजमाता सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना पाठवली आहेत. तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुकांपूर्वी जनसभेमध्ये काँगे्रसच्या नेत्यांनी सहा गॅरेंटी दिल्या होत्या. त्या सहा गॅरेंटीपैकी तेलंगणामधल्या महिलांना एका गॅरेंटीने खूप भूरळ घातली. ती गॅरेंटी होती तेलंगणाच्या लोकांनी जर काँग्रेसला निवडून दिले, तर काँग्रेस इथे ‘महालक्ष्मी योजना’ राबवणार. या ‘महालक्ष्मी योजने’अंतर्गत ते प्रत्येक महिलेला महिन्याला 2 हजार, 500 रूपये देणार होते. जिंकल्यानंतर काँग्रेस आपल्याला 2 हजार, 500 रूपये प्रती महिना देईल, असे मनाचे मांडे रचत तेलंगणातल्या भगिनींनी मताचे मापटे काँग्रेसच्या पदरात रिते केले.100 दिवसात सहा गॅरेंटी पूर्ण करू अशी खात्री देणार्‍या काँग्रेसने, 100 काय 300 दिवस झाले तरी त्यातील एकही गॅरेंटी पूर्ण केली नाही. त्यामुळे तेलंगणाच्या महिलांनी काँग्रेसच्या राजमाता सोनिया गांधी आणि राजकुमार राहुल गांधी यांना पत्र पाठवली आहेत. या पत्रात त्यांनी विचारणा केली आहे की, आम्हाला 2 हजार, 500 रूपये कधी मिळणार? तेलंगणाच्या महिलांनी हा प्रश्न विचारला त्यालाही कारण आहे. बाजूच्या राज्यात म्हणजे महाराष्ट्रात भाजप आणि सहयोगी पक्षांची सत्ता आहे. इथे महायुतीने कधीही म्हटले नाही की, आम्ही महिलांना पैसे देऊ. मात्र सत्तेत आल्यावर भाजपच्या महायुती सरकारने महिलांना ‘लाडकी बहिण योजने’अंतर्गत भरघोस सहकार्य केले. माताभगिनींच्या खात्यात पिळवणूक आणि फसवणूक न होता पैसे आले. त्यामुळे तेलंगणातल्या महिलांना जाणवले की, काँग्रसने सत्ता मिळवण्यासाठी खोटे वायदे करून फसवले. यावर महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचे म्हणणे आहे की, काँग्रेस पक्ष निवडणुकीपूर्वी सहा काय शेकडो गॅरेंटी देईल. पण काँग्रेसपक्ष उबाठा किंवा शरद पवार गटाच्या साथीने जिंकला, तर तेलंगणामधल्या बहिणींसारखेच महाराष्ट्रातल्या बहिणींनाही रडावेच लागेल. त्यामुळे काँग्रेस आणि त्यांच्या महाविकास आघाडीची कधीही न पूर्ण होणारी गॅरेंटी नकोच.

9594969638

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.