नवी दिल्ली : भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर एससीओ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानला रवाना झाले आहेत. १५ आणि १६ ऑक्टोबर या दोन दिवसांमध्ये ही परिषद पार पडणार आहे. पाकिस्तानसोबत संबंध सुधारणा करण्याबाबत अद्याप कोणतीही भूमिका घेण्यात आलेली नाही. मागच्या ९ वर्षात, पहिल्यांदाच देशाचे परराष्ट्रमंत्री पाकिस्तानला भेट देत आहेत.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी द्विपक्षीय बैठकीची शक्यता नाकारली आहे. माध्यमांशी संवाद साधताना एस जयशंकर म्हणाले, "भारत हा एससीओचा सदस्य असल्याने, आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी ह्या बैठकीला मी हजर राहणार आहे. इस्लामाबादला भेट देण्यामागचा उद्देश पाकिस्तान सोबत चर्चा करणे, हा नसून एससीओ शिखर परिषदेत सहभागी होणे हा आहे." एससीओ म्हणजेच, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन या संघटनेची स्थापना २००१ साली रशिया आणि चीनने केली. या संघटनेत युरेशिया या भौगोलिक भागातील तब्बल १० देश आहेत. या शिखर परिषदेतील सदस्य परस्पर राष्ट्रांमधील सुरक्षा, अर्थव्यवस्था आणि संस्कृती यासारख्या विविध क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर भर देतात. २०१७ साली भारत एससीओचा पूर्णवेळ सदस्य झाला. आताच्या घडीला या संघटनेत एकूण १० देश सहभागी आहेत. या वर्षी पाकिस्तान मध्ये दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत, सदस्य देशांचे नेते महत्त्वाच्या प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा करतील आणि समन्वय साधतील अशी आशा आहे.
...ती जबाबदारी पाकिस्तानचीच.
२०१५ साली तत्कालीन परराषट्रमंत्री सुशमा स्वराज यांनी एससीओ शिखर परिषदेच्याच निमित्ताने पाकिस्तानला भेट दिली होती. पाकिस्तानसोबत सलोख्याची चर्चा करण्यासंदर्भात भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या चर्चेसाठी भारत तयार असून, चर्चेला सुरुवात करण्याची जबाबदारी पाकिस्तानची आहे. पाकिस्तानसोबत भारताने चर्चा सुरु करण्याआधी पाकिस्तानने दहशतवादावर आपली भूमिका स्पष्ट करावी. त्याच सोबत, काश्मीरच्या मुद्दयावर भारताची भूमिका पाकिस्तानला मान्य करावी लागेल. आंतरराष्ट्रीय स्तरावर मात्र पाकिस्तानने वारंवार काश्मीरच्या मुद्याला हात घालत चर्चेची दिशा भरकटवली आहे.