Rusty spotted cat - माणगावांत रस्ते अपघातात दुर्मीळ 'वाघाटी'चा मृत्यू

    15-Oct-2024
Total Views |
rusty spotted cat



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
माणगांव निजामपूर मार्गे रायगड किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर सोमवारी दुर्मीळ वाघाटी (rusty spotted cat) मृतावस्थेत आढळून आली. जगात जंगलामध्ये आढळणाऱ्या सर्वात लहान मांजरीची प्रजात म्हणून वाघाटीला (rusty spotted cat) ओळखले जाते. दुर्मीळ आणि प्रामुख्याने निशाचर जीवन जगणाऱ्या या प्राण्याचा रस्ते अपघातात मृत्यू होणे दुदैवी असून रात्रीच्या वेळी वाहन चालवताना वाहन चालकांनी काळजी घेण्याचे आवाहन वन्यजीवांप्रेमींनी केले आहे. (rusty spotted cat)


 
सोमवार दि.१४ ऑक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास रायगडच्या दिशेने जात असताना माणगांवचे वन्यजीव अभ्यासक शंतनु कुवेसकर यांना माणगांव निजामपूर मार्गावर वाघाटी मृतावस्थेत दिसली. सह्याद्रीची जंगलात आढळणारी वाघाटी ही दुर्मीळ प्रजात आहे. या जंगली मांजराला दाट ते घनदाट प्रकारची जंगले पसंत असून मानवी वस्तीच्या जवळ देखील याचा वावर काहीवेळा आढळतो. या घटनेतून रायगड किल्ल्याचा परिसर जैवविविधतासंपन्न असून येथील परिसर वन्यजीवांच्या दृष्टीकोनातून देखील संवेदनशील असल्याचे अधोरेखित झाले आहे, असे शंतनु कुवेसकर यांनी सांगितले. रायगड किल्ला परिसर आणि माणगांव तालुक्यात देखील अनेक परिसरांमधून या वाघाटीचे दुर्मिळ दर्शन घडत असून यापूर्वी रायगड किल्ल्याजवळ वाघाटीपेक्षा देखील अधिक दुर्मीळ असलेल्या 'लेपर्ड कॅट' चे दर्शन झाल्याचे शंतनु यांनी सांगितले. जंगल परिसरांमधील रस्त्यांवरून जात असताना आपली वाहने सावकाश चालवत कोणत्याही वन्यप्राण्याला धडकून अपघात होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
 
 
जगातील सर्वात लहान जंगली मांजर प्रजात, 'रस्टी स्पॉटटेड कॅट' म्हणजेच वाघाटी अतिशय लाजाळू आहे. रात्रीच्या वेळेत छोटे सस्तन प्राणी, सरपटणारे जीव व कीटक खाते. पावसाळी दिवसांमध्ये त्यांना झाडी झुडुपे आणि गवतामध्ये मोठ्या प्रमाणात अन्न उपलब्ध होते. त्यामुळे या दिवसांमध्ये हा जीव फार क्वचित नजरेस पडतो. लपून राहण्याच्या आपल्या कलेमुळे व छोट्या आकारामुळे ह्या वाघाटीचे दर्शन होणे तसे फारच दुर्मिळ असते.