मुंबई अखेर टोलमुक्त

15 Oct 2024 12:32:40

Toll free mumbai
 
मुंबई, दि. १४ : ( Mumbai Toll Exemption )एकापेक्षा एक महत्त्वाकांक्षी निर्णयांचा धडाका लावलेल्या महायुती सरकारने सोमवार, दि. १४ ऑक्टोबर रोजी मुंबईकरांना अनोखी भेट दिली. मुंबईतील पाच प्रवेशमार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सोमवारी मध्यरात्री १२ वाजेपासून याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली.
 
मुंबईच्या वेशीवर सध्या हलक्या वाहनांसाठी एकेरी वाहतुकीसाठी ४५ रुपये टोल आकारला जात होता. हा टोलचा भुर्दंड हटवावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून वाहनचालक आणि राजकीय नेत्यांकडून केली जात होती. त्यांच्या मागणीची पूर्तता अखेर झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुंबईतील पाच प्रवेशमार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
 
हलकी वाहने, शाळेच्या बसेस आणि एसटी बसेस यांना पथ करातून सूट राहील. शीव-पनवेल महामार्गावर वाशी येथे, लालबहादूर शास्त्री रस्त्यावर मुलुंड येथे, पूर्व द्रुतगती मार्गावर मुलुंड येथे ऐरोली पुलाजवळ, पश्चिम द्रुतगती मार्गावर दहिसर येथील पथकर नाक्यावर याची अंमलबजावणी होईल. पथकरातून सूट दिल्यामुळे ‘राज्य रस्ते विकास महामंडळा’ला द्याव्या लागणार्‍या भरपाईसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
 
‘या’ टोलनाक्यांवर सवलत
 
  • दहिसर टोलनाका
  • मुलुंड टोल नाका (एलबीएस मार्ग)
  • मुलुंड टोल नाका (पूर्व द्रुतगती मार्ग)
  • ऐरोली टोल नाका
  • वाशी टोल नाका
भाजपकडून मुंबईच्या वेशीवरील टोलनाक्यांवर जल्लोष
 
महायुती सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर भाजपकडून मुंबईच्या वेशीवरील टोलनाक्यांवर जल्लोष करण्यात आला. मुलुंडच्या आनंद नगर टोलनाक्यावरील जल्लोषोत्सवात आ. मिहीर कोटेचा सहभागी झाले. त्यांनी वाहनचालकांना पेढे वाटून आनंद व्यक्त केला. यावेळी ते म्हणाले, “या निर्णयामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूककोंडीचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. प्रवाशांचा वेळ आणि इंधन वाचणार आहे. नागरिकांना मिळालेला हा दिलासा खरोखरच महत्त्वाचा आहे. महायुती सरकार हे जनतेचे सरकार आहे. त्यामुळे आमच्या सरकारने दिलेली वचने पाळली.”
 
दहिसर टोलनाक्यावर भाजपच्या उत्तर मुंबईतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष गणेश खणकर म्हणाले, “महायुती सरकारच्या या निर्णयामुळे लाखो वाहनधारकांना फायदा होणार आहे. महायुती सरकारचे मनपूर्वक धन्यवाद.”
 
महाराष्ट्र सैनिकांनो, ‘मुंबई टोलमुक्त’ हे अभिमानाने सांगा : राज ठाकरे
 
“मुंबईत प्रवेश करणार्‍या पाचही टोलनाक्यांवर आज मध्यरात्रीपासून हलक्या वाहनांना टोलमुक्ती मिळणार आहे. याबद्दल ‘एमएमआर’ परिसरात राहणार्‍या सर्व नागरिकांचे अभिनंदन आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांचे खूप खूप अभिनंदन. महाराष्ट्र सैनिकांनो, यापुढे ’टोलच्या आंदोलनाचं काय झालं?’ असं कोणी विचारलं, तर त्यांना मुंबई टोलमुक्तीचं उदाहरण अभिमानाने सांगा आणि तुम्ही एकदा ठरवलंत की गोष्ट तडीस नेता, हे पुन्हा एकदा दिसलं हे विसरू नका,” असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांचे अभिनंदन करत राज्य सरकाराच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0