'असंभव' चित्रपटाच्या निमित्ताने सई-सतीश-सचित-मुक्ता पहिल्यांदाच एकत्र येणार!

15 Oct 2024 17:42:32
 
marathi movie
 
 
 
मुंबई : मराठी चित्रपटांमध्ये सध्या वैविध्यपूर्ण विषयांबरोबरच कलाकारांच्या बाबतीतही अभिनव प्रयोग अनुभवायला मिळत आहेत. एखादी कलाकारांची जोडी लोकप्रिय झाली की त्यांनाच घेऊन चित्रपट करण्याचा ट्रेण्ड मागे पडला आहे. उलट भिन्न अभिनयशैली असलेल्या कलाकारांना एकत्र घेऊन त्यांच्या आजवरच्या परिचित भूमिकांपेक्षा काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न होताना दिसतो आहे. असाच एक अभिनयसंपन्न प्रयोग लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मराठीतील नामंवत कलाकार सचित पाटील, मुक्ता बर्वे, सई ताम्हणकर आणि सतीश राजवाडे पहिल्यांदाच एकत्र आले असून त्यांच्या अभिनयाची जुगलबंदी अनुभवण्याची संधी देणाऱ्या ‘असंभव’ या आगामी चित्रपटाची दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर झाली आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.
 
‘असंभव’ या चित्रपटाच्या निमित्ताने प्रसिध्द अभिनेता, दिग्दर्शक सचित पाटील आणि प्रथितयश निर्माते नितीन प्रकाश वैद्य पहिल्यांदाच चित्रपट निर्मितीसाठी एकत्र आले आहेत. त्यांनी ‘मुंबई पुणे फिल्म्स एन्टरटेन्मेट’ या निर्मितीसंस्थेची स्थापना केली आहे. ‘क्षणभर विश्रांती’ आणि ‘साडे माडे तीन’ या यशस्वी चित्रपटांच्या दिग्दर्शनानंतर सचित पाटील निर्मितीक्षेत्रात पदार्पण करत आहेत. तर वळू ‘नाळ’, ‘गच्ची’, ‘मन फकिरा’, ‘एकदा काय झालं , ‘अलिबाबा आणि चाळीशीतले चोर’ ते आगामी ‘लाईक आणि सबस्क्राईब’ अशा वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांच्या निर्मितीचा अनुभव गाठीशी असलेल्या नितीन प्रकाश वैद्य यांची भक्कम साथ त्यांना चित्रपट निर्मितीत लाभणार आहे.
 
या दोघांच्या ‘मुंबई पुणे फिल्म्स एन्टरटेन्मेट’ या निर्मिती संस्थेच्या पहिल्यावहिल्या ‘असंभव’ या चित्रपटाला सध्या दूरचित्रवाहिनीवर गाजणाऱ्या ‘तुला शिकविन चांगलाच धडा’ आणि ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिका, तसेच ‘नाच गं घुमा’ या यशस्वी चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या ‘एरिकॉन टेलीफिल्म्स’चे शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई यांची हि निर्माते म्हणून साथ लाभली आहे
आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे ‘हाय काय नाय काय’ आणि २०१७ साली प्रदर्शित झालेल्या ‘उबंटु’ या चित्रपटांचे दिग्दर्शक, अभिनेते पुष्कर श्रोत्री ‘असंभव’ चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. साडे माडे तीन ,क्षणभर विश्रांती , ‘झेंडा’, ‘अर्जून’, फ्रेंड्स ,वन वे तिकीट आणि ,‘क्लासमेट्स’ सारखे नावाजलेले चित्रपट आणि गेली तीन वर्ष दूरचित्रवाहिनीवर गाजणाऱ्या ‘अबोली’ मालिकेतील मध्यवर्ती भूमिकेत लोकप्रिय ठरलेले अभिनेते सचित पाटील ‘असंभव’ या नव्या कोऱ्या चित्रपटाच्या निर्मितीबरोबरच त्यात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत.
 
त्याचबरोबर चारचौघी , ‘नाच गं घुमा’ म्हणत यंदा सगळ्यांनाच आपल्या अभिनयाच्या तालावर नाचवणारी अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि ‘दुनियादारी’ ते ‘मिमी’ अशा मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील यशस्वी वाटचालीबरोबरच ओटीटी या नवमाध्यमावरही ‘भक्षक’, ‘मानवत मर्डर्स’सारख्या कलाकृतीतून नावाजलेली अभिनेत्री सई ताम्हणकर या दोन सशक्त अभिनेत्रीही या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
 
याशिवाय, या चित्रपटाचे अजुन एक आकर्षण म्हणजे दिग्दर्शक म्हणून आजवर ’प्रेमाची गोष्ट, ‘मुंबई पुणे मुंबई’ चित्रपट श्रुंखला, ‘ती सध्या काय करते’ सारखे यशस्वी प्रेमपट, अलिकडेच गाजलेली ’समांतर’साऱखी थरारक वेबमालिका देणारे सतीश राजवाडे बऱ्याच काळानंतर अभिनय करताना दिसणार आहेत.
 
इतक्या ताकदवर कलाकारांना एकत्र आणणारा ‘असंभव’ हा चित्रपट रहस्यपट आहे की थरारपट? ही पूर्णतः नवीन विषयावरची कलाकृतीं आहे की एखाद्या जुन्याच विषयाशी याचे धागेदोरे जुळतायेत? या सगळया प्रश्नांच्या उत्तरांसह या चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
Powered By Sangraha 9.0