दर दिवाळीत होणारी हंगामी भाडेवाढ रद्द

एसटी महामंडळाकडून प्रवाशांना मोठा दिलासा

    15-Oct-2024
Total Views |

ST corporation
 
मुंबई, दि. १४ : (ST Corporation)‘राज्य परिवहन महामंडळा’कडून दरवर्षी दिवाळीत दहा टक्के हंगामी भाडेवाढ केली जाते. दिवाळीतील प्रवाशांची गर्दी लक्षात घेता, तसेच एसटीचे महसूल वाढवण्यासाठी दरवर्षी ‘एसटी महामंडळा’कडून दिवाळीच्या कालावधीत दहा टक्के हंगामी भाडेवाढ केली जाते. मात्र, यंदा दिवाळीनिमित्त ‘एसटी महामंडळा’कडून दरवर्षी केली जाणारी हंगामी भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
यंदाच्या वर्षीदेखील दि. २५ ऑक्टोबर ते दि. २४ नोव्हेंबर रोजीदरम्यान तब्बल एका महिन्यासाठी दहा टक्के भाडेवाढ लागू करण्यात आली होती. मात्र, प्रवाशांना दिलासा देत ‘एसटी महामंडळा’ने ही भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील नियमित प्रवाशांसह दिवाळीच्या सुट्ट्यांनिमित्त प्रवास करणार्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दि. २५ ऑक्टोबर ते दि. २४ नोव्हेंबर रोजीदरम्यान दहा टक्के हंगामी भाडेवाढीसंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आले होते. एसटीची प्रस्तावित दहा टक्के भाडेवाढ विठाई, शिवशाही, निमआराम बसेससाठी लागू होती. मात्र, ती भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे. मुंबई-पुणे मार्गावर शिवनेरीसाठी हंगामी भाडेवाढ लागू नव्हती.