कॅनडा अन् भारतात काय वाद सुरू झालायं? - वाचा सविस्तर

    15-Oct-2024
Total Views |

india canada
 
 
नवी दिल्ली: भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंधांमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण तयार झाल्याचे दिसून आले आहे. भारताने कॅनडामधील राजदूतांना आणि उच्चपदस्थ अधिकारी यांना मायदेशी बोलवण्यात आले आहे. वर्षभर सुरु असलेल्या दोन देशांमधल्या खडाजंगीला अद्याप तरी पूर्णविराम मिळाल्याचे दिसून आले नाही.

खलिस्तानी दहशतवाद्याचा मृत्यू आणि वादाची ठिणगी
हरदीप सिंग निज्जर हा खालिस्तानी टायगर फोर्सचा म्होरक्या होता, ज्याच्या नावावर भारतात अनेक गुन्हा दाखल होते. पंजाबच्या जलंधरमध्ये एका हिंदू पुजाऱ्याची त्याने हत्या केली होती. फुटीरतावादी खालिस्तानांच्या कळपात सामील होऊन निज्जर कॅनडाला पळून गेला. गेली दोन दशके निज्जर भारतविरोधी कारवया करण्यात अग्रेसर होता.२०२३च्या जून महिन्यात, दोन अज्ञात मारेकऱ्यांनी निज्जरची हत्या केली. या हत्येनंतर, जस्टिन त्रूदो यांनी देशाच्या संसदेत भाषेत करत असताना, या हत्येमागे भारताचा हात असल्याचे जाहीर केले. कॅनडाच्या धरतीवर बाहेरच्या देशाने अशा पद्धतीच्या कारवाया होणे हे चुकीचे असल्याचे मत त्रूदो यांनी व्यक्त केले. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या संदर्भातील आरोप फेटाळून लावले. यासोबत, कॅनडा मध्ये सुरु असलेल्या भारतविरोधी कारवायांवर चिंता व्यक्त केली. कॅनडाने यानंतर, भारतासोबतच्या व्यावसायिक वाटाघाटी रद्द करण्याचा निर्णय घेतला. या घटनेचा परिणाम म्हणजे भारताने जी २० समीटच्या अंतर्गत कॅनडासोबतची बैठक रद्द केली. पंतप्रधान मोदी यांनी सुद्धा कॅनडामध्ये सुरु असलेल्या भारतविरोधी कारवायांबद्दल चिंता व्यक्त केली. जस्टिन त्रूदो यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर कॅनडा मध्ये सुरु असलेल्या परदेशी हस्तक्षेपावर भाष्य केले आणि भारताकडे पुन्हा एकदा संशयाची सुई वळवली. यानंतर कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री मेलेनी जोली यांनी भारताच्या वरिष्ठ राजदूतांना पदच्युत केले. त्यानंतर भारताने सुद्धा कॅनडाच्या राजदूतांची हकालपट्टी केली. यामुळे दोन्ही देशांमध्ये वादाची ठिणगी पडली.

संसदेत श्रद्धांजली अन् गदरोळ
निज्जर या खालिस्तानी दहशतवादाच्या मृत्यूची वर्षपूर्ती झाल्यानंतर, कॅनडाच्या संसदेत दोन मिनीटं मौन पाळून, शोक व्यक्त करण्यात आला. भारतासाठी हा सगळा प्रकार अत्यंत घृणास्पद होता. कॅनडातील राज्यकर्त्यांच्या या कृतीवर भारताने कठोर टिका केली. भारताच्या सार्वभौमत्वाला धक्का लावणारे, भारतात फुटीरतावादी कारवाया करुन, परदेशात पळून जाणाऱ्या लोकांच्या समर्थनात जर कॅनडा उभी राहत असेल, तर ही चिंतेची बाब म्हणावी लागेल. आम्ही या घटनेचा निषेध करतो असे सुद्धा भारताने म्हटले.

सद्यस्थिती आणि पुढे
२०२४ च्या ऑक्टोबर महिन्यात, जस्टिन त्रूदो यांनी थेट भारत सराकारवर आरोपांची तोफ डागायाला सुरुवात केली. त्रूदो यांनी जाहीरपणे भारताच्या विरोधात भूमिका घेत म्हटले की, भारतीय दूतांच्या साह्याने भारत सरकार कॅनडातील नागिरकांच्या विरोधात षडयंत्र रचण्याचे काम करत आहेत. पोलिसांच्या दाखल्याचा हवाला देत त्रूदो यांनी म्हटले की भारत सरकारच्या या वर्तवणुकी मुळे कॅनडा मधील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. भारताने या संदर्भात वारंवार पुरावे मागितले असता, कॅनडा सरकारने मात्र कोणतेही पुरावे भारत सरकारकडे सुपूर्द केले नाही. भारतीय राजदूतांना मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीचा भारताने निषेध नोंदवला व आपल्या दूतवासांना भारतात परतण्याची सूचना केली. या संदर्भात भारताने १४ ऑक्टोबर रोजी निवेदन जारी केली असून कॅनडा सरकारचा निषेध नोंदवला आहे.