स्वच्छ चारित्र्य म्हणून ज्याला पोलीस करावे, तोच खरा निघतो अशी अवस्था काँग्रेसची झाली आहे. स्वच्छ चारित्र्य असलेला एकनिष्ठ नेता म्हणून खरगेंच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली खरी पण, आता तेच काँग्रेसचे अवघड जागेचे दुखणे झाले आहे. खरगेंनी परत केलेल्या जमिनी हा एक घोटाळाच असल्याची शंका आता जनतेच्या मनात निर्माण झाली आहे.
काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे, सातत्याने आपण प्रामाणिक असल्याचा आणि आपल्या हातून कसलाही भ्रष्टाचार झाला नसल्याचे दाखवत होते. तसेच, काहीही करून भाजपला सत्तेवरून दूर करण्याच्या निर्धाराने भाषणबाजी करतानाही ते दिसून येत. मध्यंतरी एका कार्यक्रमात भाषण करताना खरगे यांना भोवळ आली. पण, त्यातून सावरल्यानंतर भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोंडसुख घेणे, त्यांनी बंद केले नाही. त्यानंतर, “भाजप आणि मोदी यांना सत्तेवरून घालविल्याशिवाय आपण मरणार नाही,” असे वक्तव्यही त्यांनी केले. खरगे यांना उदंड आयुष्य लाभो! पण, त्यांनी जो निर्धार व्यक्त केला, तो साध्य होणे हे काही त्यांना उभ्या आयुष्यात नक्कीच जमणार नाही. आपला किंवा आपल्या पक्षाचा व्यवहार हा पारदर्शी असेल, तरच जनता अशा नेत्यांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवते किंवा असे नेते जे काही वक्तव्य करतात ते प्रत्यक्षात उतरेल, असे जनतेला वाटते. पण, आतापर्यंत भारतीय राजकारणात सदैव भ्रष्टाचारात लडबडलेल्या काँग्रेस पक्षाच्या विद्यमान अध्यक्षाने असे काही वक्तव्य केल्यास , अशा वक्तव्याची सर्वत्र खिल्लीच उडविली जाते.
अलीकडेच खरगे कुटुंबियांच्या विषयी एक बातमी झळकली आहे. खरगे कुटुंबीयांनी मोक्याची जमीन लाटून, भूखंडाचे श्रीखंड ओरपण्याचा एक असफल प्रयत्न केल्याचे त्यावरून दिसून आले. खरगे कुटुंबियांचा एक विश्वस्त निधी असून, त्या ट्रस्टने ‘बहुविध कौशल्य विकास केंद्रा’साठी पाच एकराचा भूखंड मंजूर करून घेतला होता. बंगळुरू शहरातील ’एअरोस्पेस पार्क’मधील हा भूखंड आहे. पण, हा मंजूर झालेला भूखंड, कर्नाटक राज्य औद्योगिक क्षेत्र विकास मंडळास परत करण्याचे खरगे कुटुंबियांच्या ‘सिद्धार्थ विहार ट्रस्ट’ने ठरविले आणि तसे पत्रही संबंधित मंडळास लिहिले.या ‘सिद्धार्थ विहार ट्रस्ट’वर स्वत: मल्लिकार्जुन खरगे, त्यांच्या पत्नी राधाबाई, मंत्री असलेला ज्येष्ठ पुत्र प्रियांक आणि या ट्रस्टचा अध्यक्ष असलेला खरगे यांचा दुसरा पुत्र राहुल आणि जावई राधाकृष्ण दोड्डामणी यांचा समावेश आहे. ही सर्व नावे पाहिली की, खरगे कुटुंबियांचा ट्रस्ट निर्माण करण्यामागे काय हेतू होता? हे सूज्ञास सांगण्याची आवश्यकता नाही. पण, खरगे कुटुंबीयांस ही उपरती अचानक झाली नाही. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नीस, म्हैसूरु नागरी विकास प्राधिकरणाने 14 भूखंड बहाल केले होते. हे सर्व भूखंड परत करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या पत्नी पार्वती सिद्धरामय्या यांनी घेतला. या ‘मुदा’ घोटाळ्यावरून कर्नाटकात प्रचंड गदारोळ झाला होता. त्यामुळेच सिद्धरामय्या यांच्या पत्नीवर ते 14 भूखंड परत करण्याची नामुष्की ओढवली. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याच्या पत्नीवर भूखंड परत करण्याची वेळ आल्याने, खरगे परिवारही सतर्क झाला. आपल्या ट्रस्टवरून निर्माण झालेल्या वादळाने रौद्र रूप धारण करण्याच्या आधीच, हा भूखंड परत करण्याचा निर्णय खरगे परिवाराने घेतला. एवढा किमती भूखंड कोण्या सर्वसामान्य नागरिकाला मिळाला असता का? खारगे हे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत. कर्नाटकमध्ये त्यांच्याच पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे त्यांच्या ट्रस्टला हा भूखंड मंजूर करण्यात आला हे उघड आहे. आता आणखी वाद निर्माण होऊन, आपली आणि आपल्या ट्रस्ट आणि पक्षाची बदनामी होऊ नये, म्हणूनच भूखंड परत करण्याचे ठरविण्यात आले ना? काँग्रेस पक्षाने आणि त्यांच्या नेत्यांनी आपण कितीही स्वच्छ असल्याचा आव आणला तरी, त्यांनी केलेली ही पापे कधी न कधी तरी डोके वर काढतातच. खरगे यांचे प्रकरणही असेच आहे. राजकीय जीवनामध्ये अशा लबाड्या करणारे नेते, भाजप सरकार आणि नरेंद्र मोदी यांना सत्तेवरून घालविण्याच्या बाष्कळ घोषणा करतात. मोदी सत्तेवरून दूर होईपर्यंत आपण मरणार नाही, अशा राणा भीमदेवी घोषणा करतात. खरगे यांना उदंड आयुष्य लाभो आणि भाजप सरकार सत्तेवर प्रदीर्घ काळ राहणार असल्याचे त्यांना पाहण्यास मिळो! अशा बाष्कळ नेत्याबद्दल आपण दुसरे काय म्हणू शकणार!
मुकुटचोरीचा भारताकडून निषेध
बांगलादेशमध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर तेथे राहणार्या हिंदू समाजावर हल्ले होण्याच्या घटना वाढल्या आहेत. तसेच, हिंदू मंदिरांची नासधूस करण्याचे, मूर्तींची विटंबना करण्याचा घटना वाढल्या आहेत. नुकत्याच संपन्न झालेल्या दुर्गापूजेच्या दरम्यान, पूजा मंडपांच्या वर हल्लेही झाले आहेत. असे सर्व घडत असताना, बांगलादेश सरकार फारशी कारवाई करताना दिसत नाही. हिंदू समाजावर आणि त्यांच्या पूजा मंडपांवर होत असलेल्या हल्ल्यांचा, भारताने तीव्र निषेध केला आहे. अशा घटना घडत असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या बांगलादेश भेटीच्या दरम्यान साथखीरा येथील जेशोरेश्वरी काली मंदिरातील कालीमातेस जो मुकुट अर्पण केला होता, त्या मुकुटाची चोरी होण्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनांबद्दल आणि पूजा मंडपासारख्या ठिकाणांवर होत असलेले हल्ले तसेच, देवीच्या मुकुटाची झालेली चोरी अशा घटनांची भारताच्या परराष्ट्र खात्याने गंभीर दखल घेतली आहे. तसेच याबद्दल बांगलादेश सरकारकडे निषेधही नोंदविला आहे. मंदिरे आणि देवदेवतांची विटंबना करण्याचा पद्धतशीर प्रयत्न काही दिवसांपासून सुरू असल्याकडे, परराष्ट्र खात्याने बांगलादेश सरकारचे लक्ष वेधले आहे. जुन्या ढाक्यामधील एका पूजा मंडपावर जो गावठी बॉम्ब टाकण्यात आला होता, त्या घटनेकडेही बांगलादेश सरकारचे लक्ष वेधण्यात आले आहे. बांगलादेशमधील हिंदू आणि अन्य अल्पसंख्याक समाज यांच्या सुरक्षेकडे सरकारने लक्ष द्यावे, असेही त्या सरकारच्या लक्षात आणून देण्यात आले आहे. कालीमातेस जो मुकुट पंतप्रधान मोदी यांनी अर्पण केला होता, त्या मुकुटाचा तातडीने शोध घेण्यात यावा आणि या प्रकरणी दोषी असलेल्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही परराष्ट्र खात्याने बांगलादेशकडे केली आहे. धर्मांध मुस्लीम समाज, बांगलादेशमधील हिंदू आणि अल्पसंख्याक समाजावर करीत असलेल्या अत्याचारांचा, जगभरातील सर्व हिंदू समाजाकडून निषेध केला जात आहे. हा जागतिक दबावच तेथील हिंदू समाजावर होणारा अन्याय रोखू शकेल!
दुर्गा विसर्जन मिरवणुकीवरून तणाव
देशात दुर्गामातेच्या मूर्तींचे विसर्जन बहुतांश ठिकाणी वाजतगाजत झाले असताना, देशाच्या काही भागात या विसर्जन सोहळ्यांना गालबोट लावण्याचे प्रयत्न काही समाजकंटकांकडून करण्यात आले. देशाच्या विविध भागांमध्ये अशाप्रकारच्या 15 घटना घडल्याचे वृत्त आहे. झारखंड राज्यात गढवा जिल्ह्यामध्ये देवी विसर्जन मिरवणुकीवरून तणाव निर्माण झाला. त्यातून विसर्जन सोहळ्यावर शनिवार दि. 12 ऑक्टोबर आणि रविवार दि. 13 ऑक्तोबर असे दोन दिवस दगडफेक करण्याचे प्रकारही घडले. गढवा या जिल्ह्यातील लाखना गावामध्ये दुर्गा विसर्जनाची मिरवणूक काढण्यात आली असता, ती गावातील मुस्लीम वस्तीमध्ये अडविण्यात आली. त्यातून दोन समाजामध्ये तणाव निर्माण झाला. मिरवणूक नेहमीच्या मार्गाने न नेता वेगळ्या मार्गाने नेली जात असल्याबद्दल, मुस्लीम समाजाने त्यास आक्षेप घेतला होता. त्यातून मिरवणुकीवर दगडफेक झाली. त्यामध्ये काही लोक जखमी झाले. दुर्गा विसर्जन मिरवणूक रोखून धरण्याच्या घटनेचा निषेध, झारखंड भाजपचे अध्यक्ष बाबूलाल मरांडी यांनी केला. त्या घटनेसंदर्भात राज्य पोलीस महासंचालकांना पत्र लिहून, मिरवणुकीत बाधा आणणार्या समाजकंटकावर कारवाई कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही केली आहे. माजी आ. सत्येंद्रनाथ तिवारी यांनी, झारखंड सरकार आणि मिथिलेश ठाकूर यांच्या इशार्यावरून विसर्जन मिरवणूक रोखण्यात आली, असा स्पष्ट आरोप केला. असे करून झारखंड सरकार हिंदूंच्या भावनांचा अपमान करीत आहे, असेही सत्येंद्रनाथ तिवारी यांनी म्हटले आहे. लाखना गावातील घटनेच्या पाठोपाठ, मादागडी गावात विसर्जन मिरवणुकीच्या वेळी दगडफेक होण्याची घटना घडली. विशिष्ट मार्गाने मिरवणूक नेण्यास पोलिसांनी अनुमती नाकारल्याने, संतप्त झालेल्या लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूर सोडला. तरीही जमाव नियंत्रणात येत नसल्याचे पाहून, पोलिसांनी हवेत गोळीबार केला. आता तेथील परिस्थिती नियंत्रणात असली, तरी तणावग्रस्त आहे. हिंदू समाजाच्या सणांच्या दरम्यान विरोध करण्याचे वाढत चाललेले प्रकार लक्षात घेता, अशा घटनांच्या मागे बोलविता धनी कोण आहे, हे सहजपणे लक्षात येते.
9869020732