नवी दिल्ली: निवडणूक आयोगाने दिनांक १५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३:३० वाजता पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणूकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत.
महाराष्ट्राच्या विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर २०२४ रोजी आणि झारखंडच्या विधानसभेचा कार्यकाळ ५ जानेवारी २०२५ रोजी समाप्त होणार आहे.त्या अनुषंगाने नवीन विधानसभा गठीत होणे गरजेचे आहे, म्हणूनच, महाराष्ट्रामध्ये २० नोव्हेंबर रोजी मतदानाची प्रक्रीया पार पडणार असून, २३ नोव्हेंबर रोजी निवडणूकांचे निकाल जाहीर होणार आहेत. झारखंड मध्ये मात्र, विधानसभेच्या निवडणुका २ टप्प्यांमध्ये होणार आहे. १३ नोव्हेंबर आणि २० नोव्हेंबर रोजी मतदानची प्रक्रिया पार पडणार आहे. २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी आणि निकाल होणार आहे.
झारखंडमध्ये होणार 'परिवर्ताना'ची पहाट
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने २० सप्टेंबर रोजी झारखंड मध्ये परिवर्तन यात्रेला सुरुवात केली. या यात्रेची सांगता २ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदी यांच्या भाषनाने झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वात तब्बल ८१ मतदार संघांमध्ये प्रचार सभा घेण्यात आल्या. या वेळेस, केंद्रीय नेतृत्वाने सत्ताधारी पक्षाच्या भ्रष्टाचारी कारभारावर ताशेरे ओढले. झारखंड मधील काँग्रेस आणि आघाडी पक्षाच्या नेतृत्वाने असंवेदनशीलतेचा नवा उच्चांक गाठल्याचे भाजपने म्हटले आहे. राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन आरक्षण संपवण्याची भाषा केल्याबद्दल त्यांचा सुद्घा समाचार घेण्यात आला होता. परिवर्तन सभेला लोकांचा भरघोस प्रतिसाद असल्याचे निदर्शनास आले.