अरुणाचल प्रदेशमधून 'ड्रॅगन' सरड्याच्या नव्या प्रजाती शोध; ही आहेत वैशिष्ट्य

    15-Oct-2024
Total Views |
Calotes sinyik



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
हिमालयाच्या पर्वंतरांगांमधून वाहणार्‍या सुबानसिरी नदीच्या खोर्‍यामधून सरड्याच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे (Calotes sinyik). या प्रजातीचे नामकरण कॅलोटस सिनिक (Calotes sinyik), असे करण्यात आले असून ही प्रजात दिनचर आहे. (Calotes sinyik)
 
 
अरुणाचल प्रदेशमधील अप्पर सुबनसिरी जिल्ह्यामधून सरड्याच्या या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला. या संशोधनामध्ये ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे संशोधक हर्षिल पटेल, तेजस ठाकरे, अक्षय खांडेकर, ईशान अग्रवाल आणि 'वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन सोसायटी- बंगळूरू'चे संशोधक चिंतन शेठ यांचा सहभाग आहे. संशोधकांना ही प्रजात प्रजाती समुद्रसपाटीपासून १२०० मी. उंचीवरील पर्वतांवरील जंगलांमधे आढळून आली. नव्याने शोधलेल्या प्रजातीच समावेश 'कॅलोटस' या कुळात करण्यात आला आहे.
 
 
या प्रजातीचे नामकरण 'कॅलोटस सिनिक' असे करण्यात आले आहे. अरुणाचल प्रदेशातील 'टॅगिन' जमातीचे लोक सुबानसिरी नदीला 'सिनिक' असे संबोधतात. नव्याने शोधलेली सरड्याची प्रजाती सुबानसिरी नदीच्या खोर्‍यात सापडते. म्हणून संशोधकांनी तिचे नामकरण 'कॅलोटस सिनिक' असे केले आहे. आकार, अंगावरील खवल्यांची रचना, पोटावरील खवल्यांची संख्या आणि वैशिष्ट्यपूर्ण जनुकिय संचावरुन ही प्रजाती कॅलोटस कुळातील इतर प्रजातींपेक्षा वेगळी ठरते. सरड्याची ही प्रजात दिनचर असून मुख्यत्वे झाडांवर वावरते. रात्रीच्या वेळी हे सरडे झाडांच्या छोट्या फांद्यावर किंवा खोडांवर विश्रांती घेतात. या प्रजातीचा आकार साधारण ६५ मिलीमीटर आहे. छोटे किटक हे त्यांचे मुख्य खाद्य आहे.