स्त्रीशक्तीचा अविष्कार : चेंबूर महिला समाज

    15-Oct-2024
Total Views |
chembur mahila samaj
 

महिलांनी, महिलांच्या उत्कर्षासाठी चालविलेली ‘चेंबूर महिला समाज’ ही संस्था चेंबूरमध्ये गेली 62 वर्षे महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. स्त्रियांच्या उन्नतीचे व उत्कर्षाचे व्रत घेतलेला ‘चेंबूर महिला समाज’ अनेक उपक्रम राबवत असतो. ‘चेंबूर महिला समाज’ या सस्थेची कार्यकर्ता आणि पदाधिकारी म्हणून संस्थेचा आलेख या लेखात मांडला आहे.

दि. 6 फेब्रुवारी 1962 रोजी कमल तासकर व मीरा दाभोळकर (पु. ल. देशपांडे यांच्या भगिनी) यांच्या अथक प्रयत्नांनी ‘चेंबूर महिला समाजा’ची स्थापना झाली. नंतर शरयू पूणतांबेकरही त्यात सामील झाल्या. सुरुवातीला सभासद भगिनींच्या घरी भरणारे हे मंडळ 1980 सालापासून स्वतःच्या भव्य अशा इमारतीत भरू लागले. पण, दरम्यानच्या कालावधीत महिलांनी रिकामा प्लॉट मिळविण्यासाठी खूप धडपड केली. महत्प्रयासाने रिकामा प्लॉट मिळविला व दि. 28 फेब्रुवारी 1979 रोजी वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर रेवा तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखाली कमल तासकर यांच्या हस्ते भूमीपूजन केले. त्यावेळी बांधकाम प्रमुख रेवा तेंडुलकर यांची नियुक्ती केली गेली. त्यांनी अत्यंत मेहनतीने व चिकाटीने बांधकामासाठी आवश्यक असणार्‍या सर्व परवानग्या मिळविल्या. इतर सर्व भगिनींनी त्यांना खूप सहकार्य केले. 1979 सालापासून ते 1986 सालापर्यंत सतत सात वर्षे डॉ. विनोदिनी प्रधान यांनी बांधकामासंदर्भात मुख्य जबाबदारी निभावली. या महिलांच्या जवळ पुरेसा पैसाही नव्हता. पण त्यांची मेहनत, जिद्द व तळमळ पाहून सुधा मुंडले यांच्या प्रयत्नाने चेंबूरच्या दानशूर महिला जानकीबाई रानडे यांनी त्यांच्या पतीच्या स्मरणार्थ 50 हजार रुपये देणगी दिली. त्यामुळे महिलांचा उत्साह दुणावला.

बांधकामात येणार्‍या सर्व अडचणीवर मात करीत दि. 6 फेब्रुवारी 1980 रोजी नलिनी चाफेकर यांच्या अध्यक्षतेखाली नव्या वास्तूत पदार्पण केले. तळमजल्यावरील हॉलला ‘श्री बापूसाहेब रानडे हॉल’ असे नाव देण्यात आले.त्याचवेळी सरकारतर्फे जाहीर झालेली ‘वर्किंग वूमन्स होस्टेल योजना’ हाती घ्यावी अशी कमल तासकर यांची मनस्वी इच्छा होती. दूरदर्शीपणाने हाती घेतलेल्या या योजनेतला सर्व भगिनींनी प्रचंड प्रतिसाद दिला व लागेल ती मेहनत घ्यायची तयारी दर्शवली.प्रकल्पाला मान्यता तर मिळाली, पण PWD, सचिवालय, सोशल वेल्फेअर पुणे अशा ठिकाणी वारंवार फेर्‍या मारणे, प्रचंड पत्रव्यवहार करणे यांसाठी महिलांनी वेळेची पर्वा न करता खूप मेहनत घेतली. 1982 साली ‘सोशल वेल्फेअर डिपार्टमेंट’कडून वसतिगृहाचा पहिला हप्ता प्राप्त झाला व बांधकाम सुरू झाले. सरकारी नियमाप्रमाणे सरकारी ग्रँटचा हप्ता मिळवताना 25 टक्के रक्कम म्हणजेच 50 हजार रुपये इतका निधी जमा करावा लागे. (दोन लाख) हा निधी नाट्यमहोत्सव, स्मरणिका, देणग्या यांतून उभा करावा लागे. यासाठी संकटावर मात करीत सर्व विश्वस्त मंडळाने न थकता अविरत मेहनत घेतली व ही वास्तू पूर्ण केली. आणि पुढील पिढीतील भगिनींना प्रेरणादायी ठरेल असे कार्य केले. या कामात मुख्यत्वे वृंदा राज व डॉ. विनोदिनी प्रधान यांचा सिंहाचा वाटा आहे. शिवाय, समाजकार्य हेच सेवाकार्य मानून या सर्वांनी काम केले. त्यात आर्किटेक्ट निसार यांनी विनामोबदला सर्व काम केले म्हणून महिला समाज त्यांचा कायम ऋणी राहील. मंगला नारायणगावकर यांनीही समाजासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या प्रयत्नाने समाजात अनेक प्रथितयश गायक-गायिकांनी हजेरी लावली आहे. तसेच, हिरा कुलकर्णी या सभासद महिलांची उत्कृष्ट अशी दर्जेदार नाटके बसवित असत व ही नाटके शारदोत्सवात सादर केली जात. त्यांचेही महिला समाजासाठी बरेच योगदान आहे. तसेच, महिला समाजास मान्यवर व. पु. काळे, शेरीफ उषा किरण, अभिनेत्री जयश्री गडकर, शरद पोंक्षे, विजया वाड, धनश्री लेले, दा. कृ. सोमण या सर्वांनी आपली उपस्थिती लावून महिला समाजाला संपन्न केले आहे.

‘चेंबूर महिला समाज’ हा 1981 सालापासून खर्‍या अर्थाने अनेक क्षेत्रांत कार्यरत आहे. इथे गरजू स्त्रियांना स्वतःच्या पायावर मानाने उभे राहण्यासाठी मदत व मार्गदर्शन केले जाते. सभासद भगिनींसाठी व नागरिकांसाठी अनेक आरोग्य शिबिरे व प्रदर्शने भरविली जातात. अनेक गरजू संस्थांना मदत दिली जाते. दरवर्षी एका समाजसेवी संस्थेची निवड करून त्यांना मदत केली जाते. उदा. अपंगांसाठी चालवलेली बदलापूरची सुजाता सुगवेकर यांची ‘संगोपिता’ ही संस्था ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणार्‍या संस्थांनाही मदतीचा हात देते. घर सांभाळून समाजासाठी काम करणार्‍या महिलांसाठी भगिनी गौरव पुरस्कार देऊन तिचा विशेष सन्मान केला जातो.

मुलींच्या शिक्षणासाठी भरघोस आर्थिक मदत दिली जाते. उदा. ‘स्वाधार’ या संस्थेच्या मुलींना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणासाठी दरवर्षी रु. 25 हजार मदत केली जाते. दर मंगळवारी सभासद भगिनींसाठी विविध विषयांवर मान्यवरांची व्याख्याने आयोजित करून महिलांचे सक्षमीकरण केले जाते. त्याचबरोबर करमणुकीचे कार्यक्रम व सभासद महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. दरवर्षी दहावी व बारावीच्या परीक्षा उत्तमरितीने उत्तीर्ण होणार्‍या सभासद भगिनींच्या मुलांमुलींचा व नातवंडाचा गुणगौरव समारंभ करण्यात येतो. उद्योगगृहातील महिलांच्या उत्तीर्ण पाल्यांचाही गौरव करण्यात येतो. बाहेरगावाहून मुंबईत नोकरीसाठी येणार्‍या मुलींसाठी उत्तम अशी वसतिगृहाची सोय आहे. त्यांना स्वच्छ व सकस जेवण कसे मिळेल आणि त्या मुलींची सुरक्षितता कशी राहील याकडे कटाक्षाने लक्ष दिले जाते.

इथे गृहउद्योग, पोळी भाजी केंद्र, वाचनालय, मधुमिलन विवाह संस्था, वर्किंग वूमन्स होस्टेल या सर्व सुविधा आहेत. खास करून महिलांसाठी भजनवर्ग, सुगम संगीतवर्ग, चालतात. शिवाय, शिवणवर्ग, ब्युटीपार्लर कोर्स, पेपरबॅग कोर्स असे विविध वर्ग चालवून महिलांना स्वावलंबी बनविले जाते.

संस्थेमार्फत तिळगुळ समारंभ, मंगळागौरीचे खेळ, कोजागिरी पौर्णिमा, वासंतिक उत्सव यांसारखे अनेक उत्सव साजरे केले जातात. शारदोत्सवात पाच दिवस देवीच्या मूर्तीची स्थापना करून रोज आरती केली जाते. या पाच दिवसांत अतिशय दर्जेदार व सुंदर असे कार्यक्रम 4 ते 6 या वेळेत आयोजित केले जातात. हे कार्यक्रम साजरे करताना भगिनींचा दांडगा उत्साह व सहभाग पाहायला मिळतो. त्यांचा सहभाग एकमेकींना प्रेरणा देणारा असतो. हे कार्यक्रम भगिनींना घरातील ताणतणाव विसरायला लावतात व कार्य करण्यास ऊर्जा देणारे असतात.

दरवर्षी वयाची 75 वर्षे यशस्वीपणे पूर्ण करणार्‍या भगिनींचा सत्कार करण्यात येतो. सभासद भगिनींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी पाककला स्पर्धा, खेळ स्पर्धा व बौद्धिक स्पर्धांचेही आयोजन केले जाते.

कोरोनाच्या महामारीच्या काळात लोकांची परिस्थिती अत्यंत बिकट होती. अशावेळी ‘लायन्स क्लब’च्या सहकार्याने महिला समाजाच्या गृहउद्योगात रोज जेवणाचे जवळ जवळ हजार पाकिटांचे वाटप होत असे.

2022 मध्ये भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली. त्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘देशाभिमान जागृती’ म्हणून मोठी शोभायात्रा काढण्यात आली. 2011 साली संस्थेचा सुवर्ण महोत्सव पुष्पा सराफ यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या दिमाखात साजरा केला, तर 2023 मध्ये ‘चेंबूर महिला समाजा’चा हीरक महोत्सव शोभा कलबाग यांच्या अध्यक्षतेखाली अगदी दणक्यात साजरा झाला. या कार्यक्रमाला समाजातील अनेक मान्यवर नागरिक संस्थेला शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित होते.

‘चेंबूर महिला समाजा’ची लिखित घटना व नियमावलीपण आहे. अगदी त्याप्रमाणेच सर्व काम चालते. दर दोन वर्षांनी कार्यकारी मंडळाची व दर चार वर्षांनी विश्वस्त मंडळाची निवडणूक होते. कार्यकारी मंडळातील सभासद भगिनी निवडून आल्यावर समिती प्रमुख म्हणून काम करतात. पुढे अनेक समित्यांवर काम करीत करीत अखेरीस खजिनदार, उपाध्यक्ष, अध्यक्ष ही पदे भूषवितात. समाजात एक सल्लागार मंडळही असते. हे सल्लागार मंडळ विश्वस्त मंडळाला वेळोवेळी सल्ला देते. त्यामुळे समाजाचे कार्य चोखपणे पुढे चालत राहते. समाजाच्या सर्व सभासद महिला या महिला समाजावर असलेल्या प्रेमामुळे व आपुलकीच्या भावनेने समाजासाठी कार्य करतात व आनंदाने मोलाचा वाटा उचलतात. अशी संस्था चेंबूरमध्ये कार्यरत आहे, हे आम्हा चेंबूरच्या महिलांचे नक्कीच भाग्य आहे, अशी आमची भावना आहे व अशा संस्थेचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

सध्या कार्यरत असलेल्या समाजाच्या अध्यक्षा मेधा केतकर याही खूप हिरिरीने प्रत्येक काम करतात. त्यामुळे त्यांच्या कामातून इतरांना प्रेरणा मिळते. तसेच विश्वस्त अध्यक्षा विभावरी पुरंदरे गेली 40 वर्षे समाजासाठी झटत आहेत. 2024 ते 2026 या कालावधीसाठी जनरल बॉडी मिटींगच्या अध्यक्षा म्हणून स्वाती वैद्य यांची निवड झाली आहे. असो.

‘एकमेकां साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ या उक्तीप्रमाणे व अविरत परिश्रम हे व्रत अंगीकारून गेली 62 वर्षे ‘चेंबूर महिला समाजा’ची प्रगतीची घोडदौड चालू आहे. अशाप्रकारे सामाजिक शैक्षणिक, अध्यात्मिक, आरोग्य मनोरंजन व साहित्य अशा विविध विषयांवर सातत्याने कार्य करून काही अंशी का होईना, समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न ही संस्था करीत आहे. नवीन नवीन भगिनी या कार्यात सामील होत आहेत व नव्या उत्साहाने व नव्या दमाने हा महिला समाजाचा रथ पुढे नेण्यात योगदान देत आहेत. या संस्थेच्या कार्याचा रथ असाच दौडत राहो व पुढील वाटचाल आनंददायी, प्रेरणादायी व स्फूर्तिदायी होवो, हीच सदिच्छा व त्यांच्या या महान कार्याला हार्दिक शुभेच्छा.

स्वाती वैद्य
9323892946