भजनसम्राट संजय शिंदे

    15-Oct-2024
Total Views |
bhajansamrat sanjay shinde
 
भजन म्हटले की सण उत्सवांची आठवण होतेच आणि कोकणात तर गणपतीत प्रत्येकाच्या घरी भजनांचे आयोजन केले जातेच. याच भजनकलेचा वारसा सांभाळणार्‍या संजय शिंदे यांच्याविषयी...

कोकण म्हटले की, त्या मातीला सांस्कृतिक समृद्धतेचा वारसा नैसर्गिकपणे लाभला आहे. कोकणी माणूस आणि श्रद्धा यांचा संबंध हा नाळ तुटल्यावर जो जोडला गेला आहे, तो आयुष्यभर तसाच राहतो हे खरे. आता सण म्हटले की, लोककला या आपसूकच आल्या.गणपतीच्या सणा तर वाडीवाडीत होणारी भजने यांचा मान वरचा.

असेच एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, मालवण तालुक्यातील गोठणे सडेवाडी गावचे संजय शिंदे बुवा. आपल्या वाडीत आपण उमदे तरुण असताना, गेली दोन वर्ष बुवा बाहेरून का आणावे लागतात? असा प्रश्न संजय शिंदे यांना पडला. घरी आई-वडील दोन भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार त्यामळे संजय शिंदे यांनी वाडीतच भजन मंडळ निर्माण करण्याचे ठरवले. संजय शिंदे यांचे वडील बृह्नमुंबई महानगरपालिकेत कामाला होते. त्यांनाही भजनाची आवड होतीच. मात्र, कामामुळे ही आवड जोपासणे शक्य झाले नाही. त्यातच वडील राहण्यासाठी मुंबई तर संपूर्ण परिवार गावाकडे शेती करत असे. त्यामुळे,संजय यांना सुद्धा काही काळ भजन शिकण्यासाठी कष्ट घ्यावे लागले.

आपल्या वाडीचे भजन मंडळ उभे करण्यासाठी संजय शिंदे यांनी कंबर कसली. स्वत:चे गावचे भजनी मंडळ असावे असा मनोदय त्यांनी गावकर्‍यांना बोलूनही दाखवला. त्यावेळी गावकर्‍यांनी तू तयारी कर, पुढच्या वर्षी तुला संधी देऊ, असे आश्वासन दिले. आता हुरुप आलेल्या संजय यांनी अधिक ताकदीने सराव करत, 2001 सालच्या गणेशोत्सवात संजय यांनी त्यांचे पहिले भजन गावातच सादर केले. इथूनच त्यांचा ‘भजनीबुवा’ होण्याचा प्रवास सुरू झाला. भजन करण्यातील आनंद हा त्यांना परिचित होताच. मात्र, आता त्या आनंदाची प्रत्यक्ष अनुभुती संजय यांनी अनुभवली. त्यामुळे यापुढे भजनाची कास न सोडता, त्याचे यथोचित शिक्षण घेण्याचे निश्चित केले.

दरम्यान, चरितार्थासाठी संजय यांनी गावाचा निरोप घेऊन, मुंबईची वाट धरली. त्यामुळे साहाजिकच जन्मभूमी आणि कर्मभूमीतील अंतर वाढले. असे असले तरी, संजय यांचे अंतर मात्र गावाकडेच ओढ घेत असे. पण शहरात काही नवीन शिकायला मिळेल, याची सहज शक्यता वाटल्याने त्यांनी मनावर आवर घतला. मुंबईत मालाड इथे वास्तव्यास आलेल्या संजय यांनी गुरूंचा शोध सुरु केला. अनेक ठिकाणी चौकशी केल्यावर मित्राकडूनच त्यांना, सावंतबुवा यांचे नाव समजले.

त्यामुळे संजय यांनी लगेचच सावंतबुवा यांच्याकडे भजनाचे शास्त्रोक्त शिक्षण घेण्यास सुरूवात केली. भजनात अभंग सांगताना, संवादिनी देखील वाजवणे आपल्याला जमले पाहिजे, या विचाराने ते संवादिनी शिकले. त्यानंतर दीर्घकाळ सराव आणि ज्ञान अर्जित केल्यावर, आज संजय एक प्रथितयश बुवा म्हणून लौकिक प्राप्त करते झाले आहेत.

फक्त गावाकडेच नव्हे तर, अनेक ठिकाणी संजय यांना भजनासाठी आमंत्रण असते. गणपतीत तर एकाच दिवशी चार-पाच पेक्षा जास्त भजनांचे आमंत्रण मुंबईत संजय यांना येतेच. मात्र, या सगळ्यावर निस्वार्थ भावनेने पाणी सोडून, गणरायाच्या सेवेसाठी संजय गावची वाट धरतात. ’मी हे सग़ळे शिकलो, सराव केला ते सगळे काही गावाकडे स्वत:च्या वाडीचे भजन असावे, बाहेरून बुवा आणायला लागू नये, हाच विचार होता त्यामागे. जेव्हा आता काही चांगली सेवा करता येणे शक्य होत असेल, तर पैशासाठी मुंबईमध्ये राहायचे मनाला पटत नाही’, असे संजय नम्रतेने सांगतात. त्यामुळे गौरी गणपतीच्या काळात संजय गावातच गणरायाच्या चरणी भजनसेवा अर्पण करतात. पण पितृपक्ष असो किंवा नवरात्रातही मुंबईतून अनेक जण त्यांना सादरीकरणासाठी बोलवतात.

गेली 24 वर्षे संजय यांनी भजन संस्कृतीच्या जोपासना आणि वृद्धीसाठी दिली आहेत. मात्र, 24 वर्षांपूर्वीचे भजन आणि सध्याचे भजन यात खूप फरक असल्याचे देखील संजय अधोरेखित करतात. पूर्वीचे भजन हे पारंपरिक होते. त्याच्या चाली देखील पारंपरिक होत्या. मात्र, सध्या समाजावार चित्रपट संगीताचे गारुड आहे, त्यामुळे साहाजिकच त्याचे प्रतिबिंब आपल्याला भजनात दिसून येत असल्याचे संजय सांगतात. पण, संजय यांचा जीव मात्र आजही, पारंपरिक भजनातच रमत असल्याचे देखील ते प्रांजळपणाने सांगतात. मात्र, मागणी असल्याने काही वेळा चित्रपट संगीताच्या चालीवर सुद्धा गाणी म्हणावी लागतात. मात्र, त्यातही एक वेगळा आनंद आहे असे संजय सांगतात.

भजन हा खरे तर लोककलेचा प्रकार होय! मात्र, आजकाल पूर्वीएवढी मागणी राहिली नसल्याची खंत देखील संजय व्यक्त करतात. “ज्यांना भजनाची गोडी लागली आहे, ते भजनावीण उत्सव साजारा करत नाहीतच, मात्र तरुण पिढीने सुद्धा हा समृद्ध वारसा जपण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे,” असे देखील संजय सांगतात. “अनेक संताचे विचार लिलया या भजनाच्या माध्यमातूनच समाजापर्यंत पोहचवणे शक्य होते. तसेच, भजन ऐकण्यासाठी समाजातील विविध स्तरावरची माणसे एकाच ठायी बसतात आणि त्यातून निर्माण होणार्‍या आनंदाचा एकत्र अनुभवही घेतात. त्यामुळे साहाजिकच समाजात एकताही निर्माण होते. त्यामुळेच भजनाची कला टिकली पाहिजे” असे संजय म्हणतात. गेली 24 वर्षे भजनाचा ध्यास घेत, ही लोककला जपण्याचा आटोकाट प्रयत्न करणार्‍या संजय शिंदे यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

कौस्तुभ वीरकर