स्तनाचा कर्करोग पूर्ण बरा होतो : डॉ. अनिल हेरूर

15 Oct 2024 13:32:24

Dr. anil heroor 
 
भारतामध्ये स्तनांच्या कर्करोगाचे दरवर्षी नव्याने सुमारे अडीच लाख रुग्ण आढळतात. दरवर्षी ऑक्टोबर महिना हा ‘स्तन कर्करोग जनजागृती’ महिना म्हणून पाळला जातो. त्यानिमित्ताने स्तनाच्या कर्करोगामागची कारणे काय आहेत? त्याची लक्षणे कशी ओळखावी? या आजारावर कोणकोणत्या उपचार पद्धती आहेत? ‘स्तन कर्करोग जनजागृती महिना’ म्हणजे काय? २०२४च्या स्तन कर्करोग जनजागृतीची संकल्पना काय आहे? याविषयी इत्थंभूत माहिती जाणून घेण्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने डोंबिवलीतील ‘अनिल कॅन्सर क्लिनिक’चे संस्थापक अणि कॅन्सरच्या सुमारे २५ हजारांहून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया करण्याचा अनुभव गाठीशी असणारे डॉ. अनिल हेरूर यांच्याशी केलेली ही खास बातचीत...
 
  • सर्वप्रथम आम्हाला ‘स्तन कर्करोग जनजागृती महिना’ या संकल्पनेबाबत थोडक्यात माहिती सांगा. त्यात कोणत्या कार्यक्रमांचा समावेश होतो?
 
स्तनाच्या कर्करोगाबद्दल जनजागृतीसाठी दरवर्षी ऑक्टोबर महिना हा ‘जागतिक स्तन कर्करोग जनजागृती महिना’ म्हणून साजरा केला जातो. ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या (थकज) पुढाकाराने हा उपक्रम चालविला जातो. आपल्याकडे २०२१ साली या उपक्रमाची सुरुवात झाली. आपल्याला माहिती असेल की, गेल्या काही वर्षांत भारतामध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. दरवर्षी दोन ते अडीच लाख महिला नव्याने स्तन कर्करोगाने ग्रस्त होतात. त्यातील ३० ते ४० टक्के महिलांना अंतिम टप्प्यात या आजाराची माहिती होते. त्यामुळे पुरेसा उपचार न मिळाल्याने अशा महिला मृत्युमुखी पडतात. या आजाराबद्दल जनजागृती करणे, संशोधनाच्या संधी आणि उपचार आणि शक्य झाल्यास त्याचा प्रतिबंध कसा करावा, यासाठी ऑक्टोबर महिना ‘स्तन कर्करोग महिना’ म्हणून साजरा होतो. गुलाबी रंग हा स्तन कर्करोगाचा रंग आहे म्हणूनच हा पूर्ण महिना ‘पिंक ऑक्टोबर’ म्हणून साजरा होतो.
  • यंदाच्या स्तन कर्करोग जनजागृती महिन्याची संकल्पना काय आहे?
 
‘कोणीही एकट्याने स्तन कर्करोगाला सामोरे जाणार नाही’ ही २०२४च्या स्तन कर्करोग जनजागृती महिन्यांची संकल्पना आहे. स्तनाचा कर्करोग हा कोणा एका व्यक्तीचा आजार नसतो, तर तो त्या पूर्ण कुटुंबाचा आजार असतो. रुग्णाला अशावेळी समर्थनाची, पाठिंब्याची गरज असते. या आजाराच्या उपचाराला आणि निदान होण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे रुग्णाच्या मानसिकतेमध्ये बदल होतो. एकट्याने सामोरे गेल्याने रुग्ण नैराश्यामध्ये जातो. म्हणूनच यंदाची संकल्पना ‘कोणीही एकट्याने स्तनाच्या कर्करोगाला सामोरे जाणार नाही,’ अशी ठेवली आहे.
  • स्तनाच्या कर्करोगाची चिन्हे अणि लक्षणे कशी ओळखावी?
 
स्तनाच्या कर्करोगाचे सर्वसामान्य लक्षण म्हणजे गाठ येणे. एक साधी गाठ जी दुखत-खुपत नाही, जिच्यामुळे ताप येत नाही, परंतु, त्या गाठीचे निदान करून घेणे अतिशय गरजेचे असते. न दुखणारी गाठ स्तनात झाली, तर ती फार धोकादायक असते. जर ही गाठ वाढत गेली, तर स्तनाग्रातून लाल किंवा काळ्या रंगाचा स्राव पाझरतो. स्तनाचा आकार वाढतो, त्याचा रंग लाल होतो, स्तन कडक होतात, काखेमध्ये गाठी होतात. जर हे प्रमाण खूप वाढले, तर जखमदेखील होते. हा कॅन्सर इतर अवयवांमध्ये पसरण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ, जर हा रोग यकृतामध्ये पसरला, तर भूक न लागणे, फुप्फुसात पसरला, तर श्वास घेण्यास त्रास होणे, सतत खोकला येणे, हाडांमध्ये पसरला, तर हाडे दुखणे अशी लक्षणे दिसून येतात.
  • स्तनाचा कर्करोग कुठल्या ठराविक वयोगटातील महिलांना होतो का?
 
स्तनाच्या कर्करोगाला अशी कुठलीही वयोमर्यादा नसते. हा रोग कोणालाही कधीही होऊ शकतो. मी स्वतः २१ वर्षांच्या मुलीवर स्तनाच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया केली आहे, तर सर्वाधिक ९३ वर्षांच्या रुग्णाचीदेखील शस्त्रक्रिया केली आहे. साधारणतः स्तनाच्या कर्करोगाचे रुग्ण हे ४० ते ५० वर्षे वयोगटाखालचे असतात. हा फार चिंताजनक विषय आहे. जसे जसे वय वाढत जाते, तसे या प्रकारच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत जाते.
  • स्तनाचे शास्त्रीय महत्त्व अणि स्तनांचा कर्करोग यावर चर्चा किती महत्त्वाची आहे?
 
स्तन म्हणजे सुधारित त्वचाग्रंथी आहेत. त्यांचे प्राथमिक काम हे शिशुसाठी दूध तयार करणे आणि शिशुचे पालनपोषण हे असते. अर्थातच, स्त्रीत्वाचा हा महत्त्वाचा भाग असल्याने या अवयवाचा आजार झाल्यास अनेक सामाजिक अणि भावनिक परिणाम होतात.
  • स्तनाच्या कर्करोगावर कोणकोणत्या उपचारपद्धती आहेत? या उपचारपद्धती काळानुरूप कशा विकसित झाल्या?
 
कर्करोगाच्या कोणत्याही प्रकारावर जर सर्वाधिक संशोधन झाले आहे, तर ते स्तनांच्या कर्करोगावर झाले आहे. हा रोग पाश्चिमात्य आहे. यावर अनेक प्रकारचे संशोधन झाले आहे. गेल्या ५० वर्षांत यामध्ये खूप मूलभूत बदल झाले आहेत. त्यामुळे या रोगाची उपचारपद्धती अतिशय सुधारलेली आहे. बहुतेक रुग्ण या आजारातून बरे होतात. कुठल्याही प्रकारच्या कर्करोगावर उपचार हा शस्त्रक्रिया, केमोथेरपी आणि रेडिओ थेरपी या तीन प्रकारे केला जातो.
 
स्तनाच्या कर्करोगाच्या शस्त्रक्रियेमध्ये आता मोठा बदल झाला आहे. पूर्वी गाठ कितीही मोठी असली, तरी पूर्ण स्तन काढण्यात येत असे. काही वेळा हाताचे स्नायूदेखील काढावे लागत असत. त्यामुळे रुग्णाला एकप्रकारचे अपंगत्व यायचे. हाताला खूप सुज यायची, ज्याचा रुग्णाला फार त्रास व्हायचा. शारीरिक आत्मविश्वास गमावणे, शरीराच्या प्रतिमेबद्दल लाज वाटणे, असे प्रकार घडायचे. पण, आता आम्ही स्तन संवर्धन शस्त्रक्रिया करतो. ‘ओन्कॉप्लास्टी’ शस्त्रक्रिया करतो, ज्यामध्ये स्तनाच्याच टिश्यूचा वापर करून त्याचा आकार बदलणार नाही, दिसायला वाईट दिसणार नाही, रुग्णाला कोणत्याही प्रकारची लाज वाटणार नाही, असा प्रयत्न या शस्त्रक्रियेमध्ये करण्यात येतो. रुग्णाला रोगातून बरे करतोच, पण समाजात आत्मविश्वासाने जगण्याचा प्रयत्न करण्यापर्यंत या शस्त्रक्रियेचा दृष्टिकोन बदलला आहे.
 
केमोथेरपीमध्ये आता आमूलाग्र बदल झाला आहे. या उपचारपद्धतीत जे दुष्परिणाम होतात, जसे उलट्या होणे, प्रतिकारशक्ती कमी होणे हे आता बर्‍यापैकी नियंत्रित केले जातात. रुग्णाला एक प्रकारची समर्थन प्रणाली दिली जाते. केस गळू नयेत म्हणून आता नवीन यंत्रे आली आहेत. अर्थात, आपल्याकडे ती अद्याप म्हणावी तेवढी विकसित झालेली नाहीत.
रेडिओ थेरपी म्हणजे क्ष-किरणांची उपचारपद्धती. आता या पद्धतीतदेखील नवीन यंत्रसामग्री आणि सॉफ्टवेअरमध्ये सुधारणा झालेल्या आहेत. रेडिएशनमुळे पूर्वी जसे दुष्परिणाम होत असत, तसे आता होत नाहीत.
  • स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होण्यासाठी जीवनशैलीत काय बदल करावेत?
 
स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी आपली जीवनशैली ही एक मोठी गोष्ट आहे. स्थूलता आणि शारीरिक हालचालींचा अभाव हे त्यातील महत्त्वाचे घटक आहेत. आपली जीवनशैली सक्रिय ठेवण्याची काळजी आपणच घेतली पाहिजे. खाणे-पिणे नियंत्रित ठेवणे, वजनावर लक्ष ठेवणे आदि गोष्टी पाळल्या गेल्या पाहिजेत. धूम्रपान आणि मद्यपानाच्या सवयी आता स्त्रियांमध्येदेखील वाढत आहेत, ज्यांमुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. तसेच, कौटुंबिक इतिहासदेखील एक महत्त्वाची बाब आहे. ज्यांच्या कुटुंबात मागील दोन ते तीन पिढ्यांमध्ये कोणाला स्तन कर्करोग झाला असेल, अशा स्त्रियांसाठी अनुवंशिक चाचण्या उपलब्ध आहेत. त्या चाचण्या त्यांनी करुन घेतल्या पाहिजेत.
  • पुरुषांनाही स्तनाचा कर्करोग होतो का? त्याची प्राथमिक लक्षणे कोणती?
 
पुरुषांनादेखील स्तनांचा कर्करोग होतो. परंतु, एकूण कर्करोग रुग्णसंख्येच्या तो एक टक्का एवढा आढळतो. कौटुंबिक इतिहासात ज्यांच्या घरात तोंडाचा, आतड्यांचा कर्करोग झाला असेल, अशा पुरुषांनी काळजी घ्यावी. एखादी गाठ आढळल्यास त्वरित डॉक्टरांना निदर्शनास आणावी.
  • नियमित तपासणी आणि मेमोग्राफीबद्दल विस्तृत काय माहिती सांगाल?
 
‘मेमोग्राफी’ म्हणजे स्तनाचा एक्स-रे आणि सोनोग्राफी केली जाते. या निदानप्रक्रियेत ९० टक्के गाठी दिसून येतात. ‘मेमोग्राफी स्क्रिनिंग’ ही पद्धती बहुतांश ठिकाणी स्वीकारली जाते. ही स्क्रिनिंग वयाच्या चाळिशीनंतर वर्षातून एकदा, तर ५०व्या वर्षापासून ६५व्या वर्षापर्यंत वर्षातून दोनवेळा करावी असा नियम आहे. यामुळे गाठी झाल्या असतील, तर ते लवकर समजते आणि वेळेत उपचार सुरू करता येतो.
  • स्तनाचा कर्करोग झालेल्या रुग्णांना काय सल्ला द्याल?
 
स्तनाचा कर्करोग झालेल्या व्यक्तीला मला एकच सांगायचे आहे की, आजार लवकर ओळखणे हे त्या आजाराला लवकर बरे करण्यासमान आहे. कॅन्सर म्हणजे ‘कॅन्सल’ नाही!
 
(अधिक माहितीसाठी संपर्क - ९९३०८१७९०१)
(मुलाखत : जान्हवी मोर्ये)
Powered By Sangraha 9.0