मराठी मनोरंजनविश्वातून 'मोहन प्यारे'ची एक्झिट, अतुल परचुरेंच्या निधनाने कलाकारांना अश्रू अनावर

15 Oct 2024 14:27:14

atul parchure  
 
 
मुंबई : मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकाविश्वात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचे वयाच्या ५७व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर १५ ऑक्टोबर रोजी दादर याठिकाणी असणाऱ्या स्मशान अंत्यसंस्कार करण्यात आले. काही महिन्यांपूर्वी त्यांनी कॅन्सरवर मात करत पुन्हा एकदा नव्या इनिंगला सुरुवात केली होती.
 
मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या अतुल परचुरे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आज अवघी मराठी मनोरंजनसृष्टी अवतरली होती. दादर याठिकाणी असणाऱ्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी त्यांचे सहकलाकार आणि जीवाला जीव देणारे मित्र उपस्थित होते. भाजप नेते आशिष शेलार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, रोहिणी हट्टंगडी, निवेदिता सराफ, महेश मांजरेकर, संजय मोने, सुकन्या मोने, सुप्रिया पिळगांवकर, सचिन खेडेकर, अशोक शिंदे, सोनाली खरे, प्रसाद ओक, मंजिरी ओक, संजय नार्वेकर, चिन्मयी सुमीत, सुमीत राघवन, सुचित्रा बांदेकर, मधुरा वेलणकर, प्रदीप वेलणकर, राजन भिसे, सुनील बर्वे, असे अनेक कलाकार उपस्थित होते.
 
अतुल परचुरे यांना २०२२ मध्ये कॅन्सरचे निदान झाले होते. पण जिद्दीने कर्करोगाला तोंड देत त्यांनी पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात दमदार कमबॅक केले. या पुनरागमनानंतर 'खरं खरं सांग'सारख्या नाटकाचे प्रयोग, 'अलीबाबा आणि चाळीशीतले चोर' हा चित्रपटयाशिवाय झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळ्यातील त्यांचा परफॉर्मन्स आजही नाट्यरसिकांच्या स्मरणात राहणारा आहे. शिवाय नुकतीच 'सूर्याची पिल्ले' या नाटकाच कलाकारांच्या नवीन संचासह घोषणा करण्यात आली होती. २२ सप्टेंबर रोजी शुभारंभाचा प्रयोग होणार होता आणि त्यात अतुल 'पांडुअण्णा' ही भूमिका साकारणार होते. मात्र या प्रयोगाच्या ४-५ दिवस आधी त्यांची प्रकृती खालावली आणि त्यामुळे ही भूमिका सुनील बर्वेने यांनी साकारली. अतुल बरे झाल्यानंतर या नाटकाद्वारे पुन्हा कामाला सुरुवात करणार असे ठरले असताना त्यांची अकाली एक्झिट मनाला चटका लावून गेली.
 
 
Powered By Sangraha 9.0