'फुलवंती'साठी हास्यजत्रेच्या कलाकारांना किती मानधन मिळालं? प्राजक्ता माळीनेच केला खुलासा

    15-Oct-2024
Total Views |
 
phullwanti
 
 
मुंबई : पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून साकारलेली फुलवंती ही कादंबरी आता रुपेरी पडद्यावर आली आहे. प्राजक्ता माळी निर्मित आणि स्नेहल तरडे दिग्दर्शित फुलवंती हा चित्रपट ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रभरात प्रदर्शित झाला. या चित्रपटात प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी प्रमुख भूमिकेत असून महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील काही कलाकार देखील यात झळकले आहेत. दरम्यान, त्यांना किती मानधन दिलं त्याबद्दल आता प्राजक्तानेच खुलासा केला आहे.
 
'फुलवंती' या चित्रपटात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधील कलाकारही पाहायला मिळत आहेत. या चित्रपटात प्रसाद ओक, समीर चौघुले,चेतना भट्ट,रोहित माने, वनिता खरात, गौरव मोरे, पृथ्वीक प्रताप इत्यादी कलाकार पाहायला मिळत आहेत. 'फुलवंती' चित्रपटासाठी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कलाकारांनी किती मानधन घेतलंय याबद्दल आता प्राजक्ताने खुलासा केला आहे.
एका मुलाखतीत प्राजक्ताने महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील कलाकारांनी किती रुपये मानधन घेतलं हे सांगितलं आहे. ती म्हणाली की, "मी शोसोबत काम करते तर माझ्या पहिल्या निर्मित सिनेमात माझे आवडीचे कलाकार असावेत. त्यामुळे मी ठरवून त्यांना या चित्रपटात कास्ट केलं आहे. मी त्यांना प्रेमाने विनंती केली आणि महाराष्ट्राची हास्यजत्रेच्या एकाही सदस्याने मानधन न घेता चित्रपटात काम करायला होकार दिला".
 
मिळालेल्या माहितीनुसार 'फुलवंती' चित्रपटाने पहिल्या दिवशी ८ लाख, दुसऱ्या दिवशी ३६ लाख आणि तिसऱ्या दिवशी ७५ लाखांची कमाई करत एकूण१ कोटी १९ लाखांची कमाई चित्रपटाने केली आहे.