छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात उघडले ‘मुंबई दालन’

15 Oct 2024 19:53:39
मुंबई दालन  
 
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात मुंबई शहर, शहराचा इतिहास आणि शहराची संस्कृती या विषयाला वाहिलेले एक दालन तयार करण्यात आले आहे. ‘मुंबई दालन’ या नावाने ते दालन ओळखले जाणार आहे. १५ ऑक्टोबरपासून हे दालन प्रेक्षकांसाठी खुले करण्यात आले आहे. हे दालन दोन भागात विभागले गेले आहे. बाहेरील भागात मुंबई शहराशी संबंधित काही चित्रे आणि या शहराचा इतिहास सांगणारे शिलालेख ठेवण्यात आलेले आहेत. आतल्या विभागात मुंबई शहराचा उल्लेख केल्यावर ज्यांची आठवण सर्वप्रथम होते तो कोळी समाज, मुंबईतील कष्टकरी वर्ग, मुंबईत मोठया प्रमाणात आढळणारा बोंबिल मासा, मुंबई शहरातील अनेक महत्वाच्या वस्तू आणि वास्तू या सर्वांचे दर्शन घडते. मुंबईतील एक महत्वाचा भाग म्हणजे गिरणगाव. या गिरणगावाची ओळख असणाऱ्या अनेक वस्तू या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत. मुंबईत अनेक कारणांसाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतर करत असतात. ही स्थलांतर करणारी माणसे सोबत येताना आठवणींचे, स्वप्नांचे गाठोडे सोबत घेऊन येतात. ते ते गाठोडे दाखवण्याचा एक सुंदर प्रयत्न या प्रदर्शनात केला गेला आहे. मुंबईत राहणाऱ्यांची आणि या शहरात येणाऱ्यांची एक भाषा असते. या भाषांमध्ये देवाणघेवाण होते आणि त्यातून मुंबई शहराचे स्वत:चे असे काही शब्द तयार होतात. हे शब्द सुद्धा या प्रदर्शनाच्या भिंतीवर चितारण्यात आले आहेत. काळाच्या ओघात मुंबई शहरातून कंदील, पाटा-वरवंटा, जुनी बसची तिकिटे अशा अनेक गोष्टी लुप्त होत गेल्या. या लुप्त झालेल्या गोष्टी सुद्धा या प्रदर्शनात पाहायला मिळतात. मुंबईत तयार झालेल्या आणि मुंबईकरांना सिनेमाचे वेड लावणाऱ्या अनेक सिनेमांची आठवण सुद्धा या प्रदर्शनातून करून देण्यात आली आहे. मुंबई शहराच्या जडणघडणीत आणि विकासात योगदान देणाऱ्या अनेक व्यक्तींना प्रदर्शनात मानवंदना देण्यात आली आहे. सोबतच मुंबई शहरावर लिहिली गेलेली अनेक पुस्तके सुद्धा प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयातील हे प्रदर्शन म्हणजे प्रत्येक मुंबईकरासाठी एक पर्वणी आहे.
Powered By Sangraha 9.0