मुंबई : (Mukhyamantri Vayoshri Yojana) मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या यशानंतर महायुती सरकारने राज्यातील वयोवृद्धांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेल्या 'मुख्यमंत्री वयोश्री योजने' अंतर्गत १४ ऑक्टोबर पर्यंत राज्यातील आधार प्रमाणीकरण झालेल्या ४ लाख १२ हजार ११३ पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर डीबीटी प्रणालीद्वारे प्रति लाभार्थी ३ हजार प्रमाणे १२३.६३ कोटी रुपये अनुदान वर्ग करण्यात आले आहे.
या योजनेअंतर्गत ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सर्वसामान्य परिस्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा आणि असाहाय्यता यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक ते साहित्य दिले जाणार असून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात ३००० रुपये जमा केले जातात.
या योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ९ ऑक्टोबर २०२४ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील ४० हजार २२० पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर डीबीटी प्रणालीद्वारे निधी वर्ग करुन करण्यात आला होता. या योजनेअंतर्गत राज्यात १७ लाख ८३ हजार १७५ ज्येष्ठ नागरिकांचे अर्ज प्राप्त आहेत. या अर्जाची छाननी व आधार प्रमाणीकरणाचे काम सुरु आहे.
‘