महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची पुनर्रचना! डॉ. रवींद्र शोभणे यांची अध्यक्षपदी निवड

15 Oct 2024 19:41:58

Ravindra Shobhane  
 
मुंबई : महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची काल १५ ऑक्टोबर रोजी पुनर्रचना करण्यात आली. विविध क्षेत्रांशी संबंधित अध्यक्ष आणि २४ सदस्य अशा एकूण २५ सदस्यांची नवनियुक्ती करून या मंडळाची पुनर्रचना करण्यात आली आहे. डॉ. रवींद्र शोभणे यांची मंडळाच्या अध्यक्षपदी आणि केशव उपाध्ये यांची मंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. प्रा. डॉ. नरसिंग कदम, डॉ. आदित्य अभ्यंकर, डॉ. हेमचंद्र प्रधान, डॉ. विनयकुमार आचार्य, डॉ. रोहित होळकर, डॉ. रणधीर शिंदे, डॉ, अनंत देशमुख, श्रीकांत बोजेवार, डॉ. मुकुंद कुळे, विश्वास पाटील, प्राजक्त देशमुख, प्रा. बी. एन. पाटील, डॉ. केशवचैतन्य कुंटे, डॉ. मिलिंद वाटवे, महेश केळूसकर, वामन मधुसूदन पंडित, नमिता कीर, अशोक राणे, प्रा. डॉ. सुरेश व्यंकटराव कदम, महादेव लक्ष्मण देसाई, वृंदा कांबळी आणि डॉ. शरयू आसोलकर यांची या मंडळाच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
 
या मंडळाची स्थापना १ डिसेंबर १९८० रोजी झाली आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे या मंडळाचे पहिले अध्यक्ष होते. दर तीन वर्षांनी मंडळाचे अध्यक्ष व सदस्य यांची नेमणूक राज्यशासनातर्फे करण्यात येते.
 
“मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची परंपरा ही फार जुनी आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी हे रोप लावून त्याचा वटवृक्ष केला. सर्वसामान्य माणसांना ज्ञानशाखांच्या जवळ घेऊन जाण्याचे काम हे मंडळ करत आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नंतर अनेक दिग्गज मंडळांनी या मंडळाचे अध्यक्षपद गौरवलेले आहे. अशा या मोठी परंपरा असलेल्या मंडळाचा अध्यक्ष होण्याचा मान मला मिळाला आहे यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो. त्यांनी आखून दिलेल्या मार्गावरून पुढील काम करण्याची प्रेरणा मला मिळेल असा मला विश्वास आहे. माझ्या सोबत या मंडळात निवडले गेलेले इतर जे सदस्य आहेत, ते त्यांच्या क्षेत्रातील तज्ञ आहेत आणि अत्यंत महत्वाचं काम करत आहेत. त्या सगळ्यांच्या सहाय्याने मंडळासाठी वेगळं काय करता येईल याचा आम्ही विचार करू.” अशी प्रतिक्रिया डॉ. रवींद्र शोभणे यांनी दै. मुंबई तरुण भारतशी बोलताना दिली. 
Powered By Sangraha 9.0