वक्फच्या जमिनीवर खरगेंचा ताबा? जेपीसीच्या बैठकीत मोठी पोलखोल

    15-Oct-2024
Total Views |

Mallikarjun Kharge Waqf Board

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Mallikarjun Kharge Waqf Board) 
वक्फ दुरुस्ती विधेयकावर नुकतीच संयुक्त संसदीय समितीची म्हणजेच जेपीसीची बैठक संपन्न झाली. यात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर कर्नाटक वक्फ बोर्डाच्या जमिनीवर ताबा असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कर्नाटक अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष अन्वर मणिपदी यांनी हा आरोप केला असून; या आरोपानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी जेपीसीच्या बैठकीवर बहिष्कार टाकल्याची माहिती मिळत आहे.

हे वाचलंत का? : रामायण, महाभारत यांचे मूर्तिमंत स्वरूप म्हणजे 'शिवचरित्र'

मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी जेपीसीसमोर हजर असताना अन्वर यांनी सांगितले की, खर्गे यांनी कर्नाटकातील वक्फ जमिनीचा ताबा घेतला आहे. अन्वर मणिपदी यांनी बरीच माहिती जेपीसीसमोर मांडत खरगेंची पोलखोल केली आहे. यानंतर जेपीसीमध्ये समाविष्ट असलेले विरोधी खासदार संतप्त झाले. त्यांच्या मते खरगे हे जेपीसीचा भाग नसल्याने त्यांच्या विरोधात असे आरोप होत आहेत.

वक्फ जमीन बळकावल्याप्रकरणी खरगे यांचे नाव आल्याने विरोधी पक्षाच्या खासदारांनी जेपीसीवर बहिष्कार टाकला. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी, आपचे खासदार संजय सिंह, समाजवादी पक्षाचे खासदार मौलाना मोहिबुल्ला आणि इतर विरोधी खासदारांनी जेपीसीची बैठक सोडून वॉकआउट केले. वक्फ विधेयकाच्या बाबतीत जेपीसी मुस्लिमांव्यतिरिक्त इतर लोकांना बोलावत आहे, जे योग्य नाही, असा आरोप विरोधकांनी केला आहे. मुस्लिमांच्या मुद्द्यावर इतरांना बोलावणे योग्य नसल्याचे विरोधी पक्षाच्या खासदारांनी म्हटले आहे. जेपीसीचे प्रमुख जगदंबिका पाल देखील याबाबत कारवाई करत नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

गंभीर बाब म्हणजे खरगे यांच्यावरील आरोपांवरून विरोधी पक्षाच्या खासदारांनी जेपीसीच्या बैठकीवर बहिष्कार घातला. असे असले तरी काँग्रेस किंवा खरगे यांनी याबाबत अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही तसेच जमीन बळकावल्याच्या आरोपांचे अद्याप खंडनही केलेले नाही. खरगे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर वक्फ व्यतिरिक्त इतर जमिनीदेखील चुकीच्या पद्धतीने संपादित केल्याचा आरोप आहे. अलीकडेच मल्लिकार्जुन खरगे यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या सिद्धार्थ विहार ट्रस्टने सरकारला जमीन परत करण्याचा निर्णय घेतला आहे. ही जमीन सार्वजनिक सुविधा निर्माण करण्यासाठी देण्यात आली होती. गेल्या ५० वर्षांपासून खर्गे कुटुंब कर्नाटकला लुटत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. MUDAच्या भूखंडावरून सुरू झालेल्या वादानंतर आधी मुख्यमंत्री सिद्धरामय्या त्यानंतर आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांच्या सिद्धार्थ ट्रस्टची ५ एकर जमीन सरकारला परत केली आहे.