सांस्कृतिक पुनर्जागरणाचे अध्वर्यू कन्हैयालाल मुन्शी- एका मवाळाचे जहालपण

    15-Oct-2024   
Total Views |

Kanhaiya Lal Munshi




संघाच्या स्थापनेपूर्वी ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ हा गाभा मानून काम करणार्‍या देशभक्तांमध्ये, कन्हैयालाल मुन्शींचे नाव महत्त्वाचे आहे. दांभिक नेहरूंशी संघर्ष करत, त्यांनी केलेल्या कामावर ‘सांस्कृतिक पुनर्जागरणाचे अध्वर्यू कन्हैयालाल मुन्शी’ या पुस्तकात प्रकाश पडतो...
 
स्व. संघाची स्थापना १९२५ सालची. संघ आता शंभराव्या वर्षात प्रवेश करतो आहे. हिंदुत्वाचा स्वातंत्र्यानंतर अस्पृश्य झालेला विचार संघाने या देशाच्या सामाजिक, राजकीय अभिसरणाच्या केंद्रस्थानी आणून ठेवला. त्याचे दृश्यस्वरुप संघशताब्दीच्या निमित्ताने आपण पाहत आहोत. मात्र, रा. स्व. संघ आपली कार्यव्याप्ती वाढविण्यापूर्वी, आपल्या स्तरावरही काही माणसे ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ हा विचार मांडत होती, जोपासत होती आणि वर्तनातही आणत होती. कन्हैयालाल मुन्शी यांचे नाव त्यात अग्रक्रमाने घ्यावे लागेल. कृष्णासारखे हिंदुत्वाचे नायक महाभारतासारखे आपले सांस्कृतिक प्रवाह मुन्शींनी केवळ मांडले नाहीत, तर त्यांचे बदलत्या काळानुसार पुनर्लोकनही केले. हे कार्य केवळ साहित्याच्या स्तरावर राहिले नव्हते, तर ते संस्थागत कामाच्या रुपाने देखील समोर उभे राहताना भारताने पाहिले. भारतीय विद्या भवनच्या निर्मितीपासून, या संस्थेच्या माध्यमातून चाललेल्या संशोधन व साहित्य निर्मितीतून मुन्शींनी, आपल्या सांस्कृतिक प्रवाहाची कालसुसंगता सिद्ध केली. गांधी-नेहरूंचे देव्हारे माजविणार्‍यांनी भारतमातेची अशी अनेक नररत्ने झाकोळून टाकली. ‘भारतीय विचार साधना’ व ‘महाएमटीबी’चे स्तंभलेखक प्रसाद फाटक यांचे, या पुस्तकासाठी पहिल्यांदा अभिनंदन केले पाहिजे. हे पहिल्यांदा का? तर दुसर्‍यांदा परीक्षणाच्या अखेरीस अभिनंदनही करावे लागणार आहे म्हणून!
 
लखनौ कराराबद्दल मुन्शी लिहितात, “लखनौ कराराचे कौतुक झाले खरे, परंतु यामुळे हिंदू-मुस्लीम ऐक्य मात्र झाले नाही. आज ते विषारीपणाचे उगमस्थान बनले आहे. हिंदूंना स्वातंत्र्य प्रिय आहे आणि मुसलमानांना धर्म. इ.स. १९०९ मध्ये लॉर्ड मिंटो यांनी काँग्रेसमधील राष्ट्रीय एकजुटीला सुरुंग लावण्यासाठी, मुसलमानांसाठी जातीय मतदार संघ देण्याचा अधिकार स्वीकारला होता. जिनांनी तेव्हा त्याला विरोध केला होता, परंतु त्यांनीच नंतर काँग्रेसकडून त्याचा पुन्हा स्वीकार करायला लावला. “आमची मागणी पूर्ण केल्यास मी सात कोटी मुसलमान तुमच्यामागे उभे करेन,” हे त्यांचे आवाहन काँग्रेसने स्वीकारले. तेव्हा काँग्रेसला असे वाटले की, आता हिंदू-मुस्लीम ऐक्य कायमस्वरुपी झालेच, परंतु या कराराचा पायाच कच्चा होता. जेव्हा स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये मुस्लीम लीगची आवश्यकता असते किंवा किंमत मोजावी लागते, तेव्हा हिंदू-मुस्लीम एकता मात्र दूरच राहते. परंतु, त्यावेळी तर आम्ही जिनांना हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रेषित समजून त्यांची कीर्ती सर्वदूर पसरवत राहिलो. हिंदूच्या भोळसटपणाला सीमा नाही.”
 
हा पृष्ठ क्रमांक १८ वरील शेवटून दुसरा परिच्छेद या पुस्तकाची संपूर्ण झलक देतो. त्यावेळच्या काँग्रेस किंवा गांधींच्या नेतृत्वाला त्यांनी विरोध केला नाही. मात्र, आपल्या मवाळ वृत्तीची पुरती जाण त्यांना होती. आपल्या मर्यादेत राहून त्यांनी जो परिघविस्तार केला, तो मात्र अचाट करणारा होता. आपण मुस्लिमांशी चांगले वागलो, तर त्यांचे नेते धर्मांधपणा सोडून भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात प्रामाणिकपणे सहभागी होतील, हा महात्मा गांधींचा भाबडेपणा पुढे फाळणीला कारणीभूत ठरला. हिंदूंच्या भोळसटपणाचे हे नेमके आकलन कन्हैयालाल मुन्शींना झाले आणि त्यावर त्यांच्या विचारांचा आणि कामाचा पाया रचला गेला. मुन्शींच्या प्रारंभिक जीवनापासून ते त्यांच्या वार्धक्यापर्यंत २२ प्रकरणांत हे पुस्तक मुन्शींचा प्रवास मांडते.
 
मुंबईत सर्वसामान्यांसाठी शैक्षणिक क्षेत्रात मोठे काम करणार्‍या दोन महाविद्यालयांचे संस्थापक कन्हैयालाल मुन्शी आहेत, याचा विसर मुंबईकरांना पडला आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने ती उजळणी झाली आहे. स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात, स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाल्यानंतर, अपरिहार्यपणे अनेक तरुणांची जहाल-मवाळ अशा गटात विभागणी झाली. या दोन्ही गटात रुढ अर्थाने विभागलेले लोक त्या त्या गटात कार्यरत असले, तरी भारताला स्वातंत्र्य मिळविण्याची उर्मी त्यांना काही एकाच गटात स्वस्थ बसू देत नव्हती, मुन्शींचेही तसेच होते. प्रारंभी योगी अरविंदांचे त्यांना घडलेले दर्शन, दोन्ही गटांचा विचार समजवून देणारे ठरले. क्रांतिकार्यापासून ते तत्वज्ञापर्यंत सर्वव्यापी असलेले योगी अरविंदांचे जीवन मुन्शींना आदर्श वाटले. त्यांनी अरविंदांना प्रश्न विचारला, राष्ट्रभाव कसा निर्माण होऊ शकतो?
 
अरविंदांनी त्याचे विस्ताराने उत्तर दिले. त्यात एक वाक्य आहे ‘इथली सांस्कृतिक भावना म्हणजे तिचा प्राण आहे’. कन्हैयालाल मुन्शींना इथेच त्यांचा ‘कामातला राम’ सापडला. चिकित्सक वृत्तीच्या मुन्शींचे समाधान यातून झाले नव्हते. पण, अरविंदांचा सल्ला मानून त्यांनी विवेकानंदांपासून ते पातंजलींपर्यंत ज्ञानसागरात मोठी डुबकी लावली. इथे त्यांना क्रांतीपुरता मर्यादित असलेला पाश्चात्त्य विचार सोडावा लागला व पुस्तकाच्या शीर्षकाप्रमाणे ‘सांस्कृतिक पुनर्जागरणाचे अध्वर्यू’ होण्याचा प्रवास सुरु झाला.
 
बाकी सारे काही पुस्तकात प्रवाहीपणे आलेच आहे. मात्र, स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे, सोमनाथ मंदिराची पुनर्निर्मिती, तो इथे विस्ताराने आला आहे. आपण सरदार पटेलांना त्याचे श्रेय देतो, ते आवश्यक आहेच. पण काकासाहेब गाडगीळांसह, मुन्शींनी या मंदिराच्या पुनर्निर्माणाबरोबरच आपल्या संस्कृतीची ध्वजपताका पुन्हा डौलाने फडकण्यासाठी केलेल्या सूचना, आजही विचार करायला लावणार्‍या आहेत. यात मंदिराच्या ट्रस्टने इंडोलॉजी व धार्मिक शिक्षणाचे एक विद्यापीठ, ग्रंथाचे प्रकाशन श्रीकृष्णाने ज्या ठिकाणी देह त्याग केला, त्या ‘देहोत्सर्ग’ या पवित्र स्थळाचा जीर्णोध्दार, गायी व इतर जनावरांच्या चांगल्या जाती विकसित करण्यासाठी गोशाळांची देखभाल व विकास करणे, व त्यासाठी शेत विकसित करणे असे उद्देश समोर ठेवले होते. हिंदूंमधील सर्व जात-पंथांना या मंदिराचा उपयोग प्रार्थनास्थळाप्रमाणेच करण्यासाठी आग्रह धरला. याच प्रकरणात त्यावेळी सत्ता आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असलेला व मंदिर निर्माणाला ’हिंदू पुनरुत्थानवाद’ म्हणून आक्षेप घेणार्‍या नेहरूंशी, मुन्शींनी घेतलेले तर्कशुद्ध वैर हा देखील या पुस्तकातला प्रमुख वाचनीय भाग ठरावा. कितीतरी धार्मिक विधींना सोमनाथ मंदिराच्या निर्मितीच्या वेळी कात्री लावली गेली. नेहरूंचा भ्रमिष्ट सेक्युलरिस्ट इथे उघडा पडतो.
 
पुढे काँग्रेसशी फारकत, स्वतंत्र पक्षाची स्थापना, या विषयावर पुस्तकात विस्तृत विवेचन करण्यात आले आहे. ‘विश्व हिंदू परिषदे’च्या स्थापनेतली त्यांची भूमिका व हिंदुत्ववादी चळवळीप्रती असलेली अनुकूलता पुस्तकात मांडली आहे. अशाप्रकारे संशोधनात्मक काम करून चरित्र साकारणे अत्यंत अवघड बाब. खूप सातत्य व भरपूर ग्रंथसंग्रहाचे वाचन केल्यानंतरच असे चरित्र साकारता येऊ शकते. लेखक प्रसाद फाटक यांना ते उत्तम जमले आहे. सुनील देवधर यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना हे देखील या पुस्तकाचे अजून एक वैशिष्ट्य ठरावे. 
 
‘भारतीय विचार साधना’च्या प्रकाशन विभागाच्या संपादिका विभावरी बिडवे यांचे विशेष अभिनंदन! कारण, भाविसाच्या ग्रंथ मालिकेत हे अनोखे पुस्तक त्यांनी आणले. यापूर्वी आलेले ‘भारत मार्ग’ हे पुस्तकही असेच वेगळे पुस्तक. संघाला पत्रकारिता, साहित्य व प्रकाशन व्यवस्थेत स्थान न मिळू देण्याची अहमहमिका लागणार्‍या काळात, विचारशील स्वयंसेवकांनी एकत्र येऊन संघ स्वयंसेवकांनी दैनिके, साप्ताहिके व प्रकाशन गृहे चालविली. संघ स्वयंसेवकांचे बौद्धिक भरणपोषणही केले. आता संघ अग्रक्रमाने मांडत असलेल्या हिंदूहिताच्या प्रश्नांची उकल झालेली असताना, प्रकाशनगृहांसमोर मोठा पेच आहे. संघविचारांचे पोषण करत असतानाच संघ व समाजातील पूर्व ग्रहविरहीत समाजगटांना, संघपरिचय करून देण्याचे शिवधनुष्य आता या माध्यमांसमोर आहे. कन्हैयालाल मुन्शींवरील पुस्तक हा त्यातला एक सेतू असू शकतो. भाविसाकडून आता अशाच राष्ट्रवादी, कसदार प्रकाशनांची अपेक्षा असेल. 

पुस्तकाचे नाव : सांस्कृतिक पुनर्जागरणाचे अध्वर्यू कन्हैयालाल मुन्शी
लेखक : प्रसाद फाटक
प्रकाशक : भारतीय विचार साधना, पुणे प्रकाशन
पृष्ठ संख्या :
मूल्य : २०० रु.

किरण शेलार

एम सी जे पर्यंत शिक्षण. सध्या मुंबई तरुण भारतचे संपादक. मूळ मुंबईकर आणि बालपणापासून रा. स्व. संघाशी संबंधित. सा. विवेक व तरुण भारत समूहात विपुल लिखाण. वन्यजीव बचावाच्या कामात सक्रिय. महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य. राष्ट्रीय प्रश्न, राजकीय, सामाजिक व धोरणविषयक अभ्यास व लिखाण.