नवी दिल्ली, दि. १४ : (India-Canada Diplomatic Row)हरदीप सिंग निज्जर या खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येमागे पुन्हा भारतावर बिनबुडाचे आरोप करत, भारताच्या कॅनडामधील राजदूतांना त्यात गोवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल भारताने कॅनडातील उच्चायुक्त आणि सर्व अधिकार्यांना पुन्हा मायदेशी बोलावले आहे.
खलिस्तानी दहशतवाद्यांचे कॅनडा हे नंदनवन आहे. अनेक खलिस्तानी दहशतवादी इथे मान उंचावून आयुष्य जगत असतात. यांपैकी एक दहशतवादी असलेल्या हरदीप सिंग निज्जर या दहशतवाद्याची कॅनडामध्ये हत्या झाली होती. त्यानंतर अनेकवेळा या हत्येमागे भारत सरकारचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी केला होता. वारंवार समज देऊन, पुरावे मागूनदेखील, आरोपाचे समर्थन करणारे पुरावे जस्टीन ट्रुडो यांचे सरकार भारताला देऊ शकले नाही. मात्र, त्यांनी सातत्याने भारताला या हत्येच्या कटाचे सूत्रधार म्हणून, आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनाम करण्याचे षड्यंत्र सुरुच ठेवले होते.
हरदीप सिंग निज्जरच्या हत्येच्या तपासात कॅनडातील भारतीय उच्चायुक्त हे ‘पर्सन ऑफ इंटरेस्ट’ असल्याचे विधान पंतप्रधान जस्टीन टुड्रो यांनी केले होते. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला. रविवारी पंतप्रधान जस्टीन टुड्रो यांच्या विधानाबाबत भारताने कॅनडाकडे तीव्र आक्षेप नोंदवला होता. मात्र, कॅनडाने त्याकडे कानाडोळा केल्याने, सोमवारी परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडाच्या उच्चायुक्तांना बोलावले होते. त्यानंतर भारताने त्यांना कठोर शब्दांत परिस्थिती समजावत कॅनडातील सर्व भारतीय अधिकारी आणि उच्चायुक्तांना पुन्हा भारतात बोलावले आहे.
भारतीय अधिकार्यांना परत बोलावण्याचा निर्णय घेताना, पंतप्रधान टुड्रो यांच्या वक्तव्यांमुळे भारतीय अधिकार्यांची सुरक्षा धोक्यात आली असून, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतलेल्या जस्टीन टुड्रो सरकारवर आमचा विश्वास नसल्याचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडाला सांगितले. भारतानेदेखील कॅनडा उच्चायुक्तालयातील सहा अधिकार्यांची हकालपट्टी केली असून, दि. १९ ऑक्टोबर रोजीच्या रात्री ११.५९ वाजेपर्यंत भारत सोडण्याचे फर्मान काढले आहे.