महाराष्ट्रात पुन्हा एकदा विकासाभिमुख महायुती सरकार येणार; बावनकुळेंचा विश्वास

    15-Oct-2024
Total Views |
 
Bawankule
 
मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा विकासाभिमुख महायुती सरकार येणार, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केला. विधानसभा निवडणूकीची तारीख जाहीर झाली असून २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागेल. यावर आता बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली.
 
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "बहुप्रतिक्षित महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला. निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली असून आचारसंहितेला सुरुवात देखील झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीने २०१४ आणि २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये अभिमानास्पद कामगिरी केली होती. यंदादेखील भारतीय जनता पार्टीसह महायुती न भूतो न भविष्यती अशी कामगिरी या विधानसभा निवडणुकांमध्ये करेल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
हे वाचलंत का? -  पिपाणीमुळे होणार पवारांची अडचण! तुतारी चिन्ह विरुद्ध पिपाणी संभ्रम कायम
 
"आम्ही महायुती सरकारची विकास कामे जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवून महाविकास आघाडीचा खोटा नॅरेटिव्ह खोडून काढणार आहोत. या विधानसभा निवडणुकीच्या प्रचार कार्यात भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता जीवाचं रान करून पक्षाचा विचार व सरकारची कामे जनतेपर्यंत पोहोचवेल आणि पुन्हा एकदा विकासाभिमुख महायुती सरकार महाराष्ट्रात आणण्यास आपले योगदान देईल. लोकशाहीच्या या पर्वात जनेतेनेदेखील उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे," असे आवाहन त्यांनी केले.