खोट्या धमक्यांचा सुळसुळाट कायम !

एअर इंडियानंतर इंडिगोची विमाने निशाण्यावर.

    14-Oct-2024
Total Views |

bomb threat
 
 
मुंबई : एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब असल्याची खोटी धमकी दिल्यानंतर, आता इंडिगोच्या २ विमानांना उड्डाणाच्या काही मिनीटांआधी, विमानात बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली. ऑपरेटिंग प्रोसीजरनुसार, तपासणीसाठी विमानांना सुरक्षित घटनास्थळी दाखल करण्यात आले आहे.

मुंबईहून मसकतला जाणारे, आणि मुंबईहून जेद्दाह साठी रवाणा झालेल्या विमानांमध्ये बॉम्ब असल्याची माहिती सोमवारी सकाळी मुंबई विमानतळाच्या कंट्रोल रुमला देण्यात आली. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, X हँडल वरुन या बाबतची माहिती देण्यात आल्याचे म्हटले जात आहे. या संदर्भात, दिल्लीच्या सुरक्षा एजन्सीला कळवण्यात आले. यानंतर तत्काळ, दोन्ही विमाने दिल्लीच्या दिशाने वळवण्यात आली. दिल्ली पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आताच्या घडीला आयजीआय विमानतळावर दोन्ही विमाने सुरक्षित आहेत. सर्व प्रवाशांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची योग्य ती काळजी घेतली जात आहे.

नजीकच्या काळात काही विमानतळांना धमक्यांचे खोटे फोन करण्यात आले होते. ५ ऑक्टोबर रोजी मध्य प्रदेश मधील इंदूर इथल्या अहिल्याबाई होळकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्ब असल्याचा ईमेल पाठवण्यात आला होता. त्याच सोबत, सदर व्यक्तीने देशातील इतर विमानतळांवर बॉम्ब स्फोट घडवून आणण्याची सुद्धा धमकी दिली होती. पोलिसांनी या संदर्भात, गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध सुरु आहे. त्याच दिवशी वडोदरा विमानतळावर सुद्धा बॉम्ब असल्याची माहिती ईमेल द्वारे अधिकाऱ्यांना पाठवण्यात आली. या प्रकरणानंतर, विमानतळाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून संबंधित अधिकारी, या प्रकरणाचा तपास करत आहेत.