मतदान हे शस्त्र, त्याचा विवेकाने वापर करावा

दिलीप क्षीरसागर यांचे आवाहन

    14-Oct-2024
Total Views |

dilip kshirsagar 
 
सटाणा : (Dilip Kshirsagar) “शस्त्रपूजन म्हणजे शस्त्र, संकल्प, संघटन व विवेक या चतुर्विद शक्तीची साधना होय. वर्तमान लोकशाहीमध्ये निवडणूक प्रक्रियेत मतदारांना मिळालेला मतदान अधिकार हे देखील एक शस्त्र आहे. या शस्त्राचा राष्ट्रप्रेमी समाजाने विवेकाने वापर करावा,” असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणी सदस्य दिलीप क्षीरसागर यांनी सटाणा तालुका विजयादशमीनिमित्त आयोजित शस्त्रपूजन कार्यक्रमात बोलताना केले. संघटित हिंदूशक्तिने राष्ट्रहित लक्षात घेऊन मतदान करण्यासाठी प्रबोधन करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
 
व्यासपीठावर प्रमुख पाहुणे प्रगती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामकृष्ण वामन येवला तथा दादा वाणी, जिल्हा सह कार्यवाह बाबासाहेब गांगुर्डे व सटाणा तालुका कार्यवाह विकास बत्तीसे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी शंखपूजन होऊन तालुक्यातील विविध गावांतून आलेले पूर्ण गणवेशातील स्वयंसेवकांचे सटाणा शहरात प्रमुख मार्गांवर सघोष पथ संचलन पार पडले. संचलन मार्गावर नागरिक बंधू-भगिनींनी आकर्षक रांगोळ्या काढून व फुले उधळून संचलनाचे उत्स्फूर्त स्वागत केले.
 
“रणभूमी तसेच, राष्ट्रजीवनातील सामाजिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक, क्रीडा इत्यादी सर्व क्षेत्रातील विजयी कामगिरीचे स्मरण विजयादशमीच्या निमित्ताने करायचे असते. विजयी वीरांचा इतिहास जसा लक्षात ठेवायचा असतो तसाच पराकोटीचा संघर्ष करून विजयी होऊ न शकलेल्यांचा इतिहासदेखील तेवढाच प्रेरणादायी असतो,” असे त्यांनी सांगितले. तसेच, देश व समाज संघटित ठेवण्यासाठी संघकार्य वाढण्याची अपेक्षा यावेळी दादा वाणी यांनी व्यक्त केली.
 
धर्म म्हणजे कर्तव्यबोध....
 
परमवैभवामध्ये समाजातील शेवटच्या घटकाचा विकास ही संकल्पना संघाची असल्याचे सांगत, धर्म म्हणजे कर्मकांड नसून कर्तव्यबोध आहे. आजच्या काळात समूहधर्म आवश्यक असून सोमनाथ मंदिर ते अयोध्या राम मंदिर पुनर्निर्माण हे सामूहिक शक्तीच्या विजयाचे जागरण आहे. सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण रक्षण, स्वबोध व नागरी कर्तव्य या पंचपरिवर्तनाचा रा. स्व. संघाने आग्रह धरला असून सर्व समाजाच्या सहकार्याने हे परिवर्तन यशस्वी होणार असल्याचेही यावेळी दिलीप क्षीरसागर यांनी सांगितले.