मुंबई : (Baba Siddique Murder Case)“मला असे वाटते की, शरद पवार यांना केवळ सत्ताच पाहिजे आहे. इतकी गंभीर घटना झाल्यानंतरही त्यांच्या नजरेसमोर फक्त खुर्ची आहे. आमच्या नजरेसमोर महाराष्ट्र आहे. आम्हाला महाराष्ट्राकडे पाहायचे आहे. महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. प्रगती साधायची आहे आणि महाराष्ट्र सुरक्षित ठेवायचा आहे. त्यामुळे त्यांना जर खुर्चीकडे पाहायचे असेल आणि बोलायचे असेल तर त्यांनी ते बोलावे, असे प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर लिलावती रुग्णालयात त्यांनी तातडीने धाव घेतली होती. या प्रकरणावरुन शरद पवारांनी राजीनामा मागितला, यावर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.
मुंबईतील वांद्रे येथे शनिवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी रात्री माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली. बाबा सिद्दिकी हे वांद्रे येथील खेरवाडी सिग्नलजवळ झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयामध्ये चालले होते. त्यावेळी तीन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. हल्ला करणार्यांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी धागेदोरे हाती लागल्याचेही सांगितले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “बाबा सिद्दिकी आणि माझी चांगली मैत्री होती. त्यांच्या निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी आहे. या प्रकरणातले दोन आरोपी पकडण्यात आले आहेत. काही धागेदोरे मिळाले आहेत. त्यातले काही दृष्टिकोनही आम्ही तपासात आहोत. पोलीस याबाबतची योग्य ती माहिती माध्यमांना देतील,” असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सलमान खानची सुरक्षा वाढवली
अभिनेता सलमान खानच्या जवळचे मित्र आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खान याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या हत्येमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. बॉलिवूडमध्ये यामुळे दहशत निर्माण झाली आहे. तसेच, सलमान खानच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्याच्या घराबाहेर बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. कोणत्याही वाहनाला सलमान खान यांच्या घराच्या परिसरात थांबण्यास पोलिसांकडून मनाई करण्यात येत आहे.
सलमानला घरातच राहण्याचा सल्ला
सलमान खानला लिलावती रुग्णालयात जाण्यासही मनाई करण्यात आली होती. मात्र, बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची बातमी समजताच, तो स्वतःला रोखू शकला नाही आणि बाबा सिद्दिकींना पाहण्यासाठी रात्री उशिरा रुग्णालयात पोहोचला. सलमान खान यांच्यासोबत सुरक्षारक्षक होते. पोलिसांनी अभिनेता सलमान खान यांना घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे.
भ्याड हल्ल्याचा निषेध करतो : अजित पवार
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर अजित पवारांनी आज त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केले होते. दरम्यान, त्यांनी नेमकी घटना काय झाली, याबद्दल झिशान सिद्दिकीकडे विचारपूस केली. अजित पवारांनी कूपर रुग्णालयाबाहेर प्रसारमाध्यामांशी संवाद साधला. “बाबा आपल्यात नाहीत, यावर विश्वास बसत नाही. आम्ही सर्व सहकारी झिशान आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहोत. बाबा हे सर्वांशी मिळून मिसळून राहायचे. मधल्या काळात ते राष्ट्रवादीत आले. ते आमचे स्टार प्रचारक म्हणून महाराष्ट्रात फिरणार होते. आमच्या चर्चा झाल्या होत्या. पण काल त्यांच्यावर भ्याड हल्ला झाला. आम्ही त्याचा निषेध करत आहोत. पोलीस तपास करत आहेत. पाच ठिकाणी पोलिसांचे पथक गेले आहे. या घटनेने आम्ही अतिशय शोकाकूल अवस्थेत आहोत,” असे अजित पवार यांनी दुःख व्यक्त केले.
पंजाब तुरुंगामध्ये हत्येचा कट, अडीच लाखांची सुपारी
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमागे ‘लॉरेन्स बिश्नोई गँग’चा सहभाग निश्चित झाला आहे. आरोपींनी चौकशीदरम्यान गुन्हे शाखेला सांगितले की, “ते पंजाबमधील तुरुंगात होते, तेव्हा त्यांची ‘बिश्नोई गँग’मधील सदस्याशी ओळख झाली. चार आरोपींपैकी तीन आरोपी हे पंजाबमधील तुरुंगात होते. तिथे आधीपासून तुरुंगात असलेल्या ‘बिश्नोई टोळी’च्या सदस्याशी या शूटर्सची ओळख झाली. त्यामुळे त्यानंतर तिन्ही आरोपीदेखील ‘लॉरेन्स बिश्नोई गँग’मध्ये सामील झाले. आरोपींनी बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यासाठी अडीच लाख रुपयांची सुपारी घेतली.
शूटर्सनी कुर्ला परिसरात भाड्याने घेतले घर
हत्येनंतर शूटर प्रत्येकी ५०-५० हजार रुपये वाटून घेणार होते. मात्र, मुंबई पोलिसांनी त्यांना त्याआधीच पकडले. चौकशीदरम्यान शूटर्सनी असेही सांगितले की, “एक महिन्यापूर्वी दि. २ सप्टेंबर रोजी शूटर्सनी मुंबईतील कुर्ला परिसरात भाड्याने घर घेतले होते. त्यासाठी दरमहा १४ हजार रुपये भाडे दिले जात होते. आता या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके उज्जैन, दिल्ली आणि हरियाणा येथे रवाना झाली आहेत.”
‘लॉरेन्स बिश्नोई गँग’ने घेतली हत्येची जबाबदारी
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाची जबाबदारी ‘लॉरेन्स बिश्नोई टोळी’ने स्वीकारली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. आम्हाला सलमान खानसोबत कोणतेही युद्ध नको होते, पण बाबा सिद्दीकींच्या हत्येचे कारण त्यांचे दाऊद इब्राहिम यांच्याशी असलेले संबंध होते. बाबा सिद्दीकी यांची कथित शालीनता हा निव्वळ भ्रम आहे. यापूर्वी दाऊद इब्राहिमसोबत मकोका कायद्यातही त्याचा सहभाग असल्याचे पुरावे आहेत. सलमान खान आणि दाऊदच्या टोळीला जो कोणी मदत करेल त्याला त्याची किंमत मोजावी लागेल,” असा दावाही ‘बिश्नोई गँग’ने केला आहे.
बाबा सिद्दिकींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली. त्यांच्या मृतदेहावर कूपर रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे आदेश दिल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना दिल्या. २००४ ते २००८ या काळात बाबा सिद्दिकी यांनी विविध खात्यांचे राज्यमंत्री आणि ‘म्हाडा’चे अध्यक्ष म्हणून कार्य केल्याचेदेखील त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यांना रविवार, दि. १३ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता बडा मरीन लाईन येथील कब्रस्तानमध्ये दफन करण्यात आले.