डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे दि. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी विजयादशमीच्या दिवशी आयोजित धर्मांतर सोहळ्यात लाखो जनसमुदायासोबत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. त्यानंतर देशातील बौद्ध धर्मांतर सोहळा दिवस हा ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ म्हणून साजरा केला जातो.
जगात जे अनेक विद्वान होऊन गेले, त्या विद्वानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रथम दर्जाचे ठरले आणि ते विश्ववंदनीय झाले. त्यांचे व्यक्तिमत्त्व असामान्य होते. पाश्चात्य विचारवंत त्यांना आदर्श मानित.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या कोलंबिया विद्यापीठातून ‘डॉक्टरेट’ मिळवली, त्या विद्यापीठाच्या लायब्ररीमध्ये आणि इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये त्यांचा अर्ध पुतळा उभारला आहे. पाश्चात्य राष्ट्रात विद्यार्थीदशेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, न्यायशास्त्र, धर्मशास्त्र, प्रशासन, समाजशास्त्र, राजनीतिशास्त्र, कायदाशास्त्र, मानवशास्त्र, घटनाशास्त्र, भाषाशास्त्र, तर्कशास्त्र, इतिहास अशा शास्त्रांचा यशस्वी अभ्यास केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार आचार आणि कृती यांचा परस्पर समन्वय होता. त्यांची तळमळ होती, अस्मिता होती. या भारत देशासाठी विचाराने आणि कार्यकर्तृत्वाने ते दीपस्तंभासारखे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांचा उद्धार केला. त्यांनी समानतेचा मूलमंत्र तथागताच्या तत्त्वांपासून घेतले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पहिली राष्ट्राप्रती भूमिका ही एका देशभक्ताची होती, एका समाजसेवकाची होती व दुसरी भूमिका कायदेमंत्र्याची होती. ते एक महान कायदे पंडित होते. तिसरी भूमिका ही घटना शास्त्राची व राष्ट्रनिर्मात्या समाजचिंतकाची होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दोन महत्त्वपूर्ण बाबी दिल्या- १) भारतीय राज्यघटना २) धम्म. त्यामुळे त्यांचा जगात फार मोठा लौकिक निर्माण झाला व ते विश्ववंदनीय ठरले. ‘भारतीय राज्यघटना’ हे त्यांच्या अगाध ज्ञानाचे प्रतीक आहे. आधुनिक भारतीय बुद्ध धम्म चळवळीचे सर्व संदर्भ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासूनच जिवंत होतात. डॉ. बाबासाहेबांना बुद्ध धर्माचे नवयुगप्रवर्तक म्हटले जाते. बुद्ध धम्म हा जागतिक ऐक्य घडवणारा धम्म असून, हा धम्म म्हणून जगात श्रेष्ठ आहे, म्हणून त्यांनी गौतम बुद्धाला घटनात्मक पवित्र आहे बुद्ध धम्म हा जगाचा ‘मुक्तिदाता धम्म’ आहे.
“समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या मानवी मूल्यांची राजकीय व सामाजिक पातळीवर भारतात स्थापना व्हावी,” असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना १९२७ सालापासून उत्कंठेने वाटत होते. त्यांची बीजे त्यांना तथागत बुद्धाच्या तत्त्वज्ञानात सापडली होती. डॉ. बाबासाहेबांनी राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक अशा शास्त्रांबरोबरच, जलसंपदा आणि कुटुंब नियोजन, स्त्रीमुक्ती इत्यादी सर्व क्षेत्रांत भरीव योगदान दिले आहे.
डॉ. बाबासाहेबांची ज्ञानतपस्या फार मोठी होती. भारत ही तथागताची जन्मभूमी आहे. बुद्ध धम्माचा पूर्ण अभ्यास करून त्यांनी, १४ ऑक्टोबर १९५६ साली ‘न भुतो न भविष्यती’ अशा ‘धम्म क्रांती’ घडवून आणली. सात कोटी बांधवांना तथागताची दीक्षा दिली. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारत भूषण ठरले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, “मला बौद्ध धर्म आवडतो, कारण, जी तत्वे इतर कोणत्याही धर्मात सापडत नाही, ती मला बौद्ध धर्मात सापडतात. मला बौद्ध धर्मात प्रज्ञा, करुणा आणि समता ही तत्वे मिळतात. मनुष्याच्या चांगल्या व सुखी जीवनाला याची आवश्यकता आहे.”
१९५५ नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ’बुद्ध आणि त्याचा धम्म’ या पुस्तकाचे काम सुरू केले. आपण हयात असताना पुस्तक प्रकाशन करण्याची इच्छा होती. दि. २४ मे १९५६ रोजी, ऑक्टोबर महिन्यात बौद्ध धर्माची दीक्षा घेणार असल्याची घोषणा त्यांनी केली. यावर चर्चा सर्वत्र सुरू झाली, शेवटी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हे नागपूर स्थळ निवडले. ‘बुद्धधर्मीय नागलोक’ यांची ती पुण्यभूमी आहे. त्यामुळे धर्माचे चक्र गतिमान करण्यासाठी त्यांनी निवड केली. दि. २३ सप्टेंबर १९५६ साली धर्मांतर करत असल्याचे जाहीर केले. भिख्खू महास्थवीर चंद्रामनी यांना पाचारण केले व अनेक लाखोंच्या उपस्थितीत धर्मांतर केले. व्यासपीठावर एका टेबलावर गौतम बुद्धांची मूर्ती ठेवण्यात आली. समारंभाची सुरूवात ‘बुद्धं सरणम् गच्छामि, संघम सरणम् गच्छामि’ने झाली.
जीवहत्या, चोरी, असत्य भाषण, अनाचार आणि मद्य यापासून अलिप्त राहण्याची शपथ घेतली आणि लाखो लोकांचा समूह तन्मयतेने हे सर्व पाहत होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर बुद्धाच्या मूर्ती समोर नतमस्तक झाले, आणि भगवान बुद्धांना वंदन केले.
बौद्ध धर्म हा खरा धर्म आहे. ज्ञान, सुमार्ग, करूणा ही तत्त्व आहेत. बौद्ध धर्म स्वीकार करून त्यांनी लाखो जनसमुदायांना पाच प्रतिज्ञा पंचशील आणि २२ प्रतिज्ञा म्हणावयास सांगितले आणि सर्व लोकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला.
दलितांच्या उद्धारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले अवघे आयुष्य वेचलं. आयुष्याच्या अगदी शेवटच्या काळात त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला.
१९३५ साली बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याची घोषणा केली. मात्र, प्रत्यक्ष कृती करायला त्यांना २१ वर्षे जावे लागले. त्या काळात त्यांनी सर्व धर्मांचा तौलनिक अभ्यास केला आणि शेवटी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. या कृतीची आठवण म्हणून अजूनही दीक्षाभूमीवर बौद्ध धर्माची दीक्षा घेतात. दीक्षाभूमी ही नागपूरातील आणि भारतातील एक महत्त्वाचे स्थळ आहे. आज ६८ वर्षांनंतर ही बाबासाहेबांची कृती अनेकांना प्रेरणा देते आणि देत राहील.
सधम्म सामाजिक संस्था, नवी मुंबई
९५९४००२५४८