मुंबई, दि.१४ : सिडकोच्या बहुप्रतिक्षित 'माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या योजनेसाठी केवळ चोवीस तासात बारा हजार अर्ज प्राप्त झाले आहे. दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.०० वाजता सुरू झालेल्या या योजनेच्या पहिल्या २४ तासांतच १२,४०० ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दि. ११ ऑक्टोबर रोजी वाशी, नवी मुंबई येथील सिडको प्रदर्शन केंद्रात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) व अल्प उत्पन्न गटासाठीच्या या या योजनेचे उदघाटन करण्यात आले.
नवी मुंबईच्या विविध नोड्समध्ये ही ६७००० घरांची महायोजना साकारली जात आहे. या गृहनिर्माण योजनेतील पहिल्या टप्प्यांतील २६००० घरे ग्राहकांना उपलब्ध करण्यात आली आहेत. या योजनेतील प्रकल्पांचा विकास सिडकोच्या परिवहनकेंद्रित विकास तथा ट्रान्झिट ओरिएन्टेड डेव्हलपमेंट या संकल्पनेवर केंद्रित असून, या योजनेत साकारली जाणारी सर्व घरे ही संबंधित नोड्समधील रेल्वे स्थानके, बस स्थानके व मेट्रो स्थानकांच्या जवळच बांधण्यात आली आहेत. या शिवाय अतिशय अत्याधुनिक बांधकाम तंत्राचा वापर करून विकसित केलेल्या या योजनतील गृहसंकुले सर्व प्रकारच्या पायाभूत व सामाजिक सोयी-सुविधांनी युक्त आहेत.
या सोडतीची वैशिष्ट्ये
* अर्जदारांना या सोडतीसाठी ११ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार
* ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटासाठी असून, प्रधानमंत्री आवास योजनेच्या अनुदानाचा लाभ घेता येईल.
* या सोडतीशी संबंधित सर्वप्रकारच्या अर्जप्रक्रिया या सोप्या सुलभ ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत.
* योजनेविषयी सर्वप्रकारची माहिती सिडकोच्या https:\\.cidcohomes.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
* अर्जदारांना याजनेशी संबंधित सर्वप्रकारची माहितीसाठी सिडकोच्या वरील संकेतस्थळावरील योजना पुस्तिकेत मिळणार आहे.