अभिजात पालीचा समृद्ध वारसा

14 Oct 2024 22:59:11
 
Vijay Mohite
 
 
पाली भाषा ही ‘ग्रंथभाषा’ म्हणून मर्यादित राहिली आहे. दि.३ ऑक्टोबर रोजी पाली भाषेला ग्रंथ भाषेचा दर्जा प्राप्त झाला. त्यानिमित्ताने पाली भाषेचा इथवरचा प्रवास आणि तिला होणारे फायदा या विषयावर सिद्धार्थ महाविद्यालयातील प्राध्यापक विजय मोहिते यांच्याशी साधलेला हा संवाद.
 
पाली भाषा ही ‘ग्रंथभाषा’ म्हणून मर्यादित राहिली आहे. दि.३ ऑक्टोबर रोजी पाली भाषेला ग्रंथ भाषेचा दर्जा प्राप्त झाला. त्यानिमित्ताने पाली भाषेचा इथवरचा प्रवास आणि तिला होणारे फायदा या विषयावर सिद्धार्थ महाविद्यालयातील प्राध्यापक विजय मोहिते यांच्याशी साधलेला हा संवाद.
 
तथागत गौतम बुद्धांनी जी पाली भाषा लोकांपर्यंत पोहोचवली, लोकांमध्ये रुजवली, त्या पाली भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, तिचा इथवर प्रवास कसा झाला?
 
पाली भाषा ही बुद्धांच्या आधीपासूनच अस्तित्वात होती. भारतीयांना ‘नालंदा’ आणि ‘तक्षशिला’ ही दोनच विद्यापीठे ठाऊक आहेत, परंतु आता उत्खननामध्ये ३० पेक्षा जास्त विद्यापीठे सापडली आहेत. या विद्यापीठांमध्ये त्या काळात पाली भाषा ही ज्ञानाची भाषा होती आणि म्हणून बुद्धांच्या ५०० वर्षे आधीपासून ती अस्तित्वात होती. ज्या प्रदेशात गौतमबुद्ध राहत होते, त्या ‘कोसल’ आणि ‘मगध’ प्रदेशाची ती भाषा होती. म्हणून तिचे त्याकाळचे नाव ‘मागधी’ होते. आचार्य बुद्धघोष यांनी तिला ‘पाली’ हे नाव दिले. पालीमध्ये फक्त बुद्धवचने आहेत. ‘जी बुद्धवचनाचे रक्षण आणि पालन करते ती पाली’ अशी त्यांनी तिची व्याख्या केली.
 
पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून, आजवर कोणते प्रयत्न केले गेले आहेत?
 
बाबासाहेबांनी जेव्हा घटना लिहिली तेव्हा, पाली भाषेला आठव्या परिशिष्टात टाकले. परंतु, ती संभावित भाषा म्हणून, आठव्या परिशिष्टातील मान्यताप्राप्त भाषांमध्ये त्यांना तिचा समावेश करता आला नाही. त्यानंतर अनेक लोकांनी पालीला अभिजात दर्जा मिळावा म्हणून, प्रयत्न केले. विशेषत: उत्तर भारतातून मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले. महाराष्ट्रातील नागपूर आणि मुंबई विद्यापीठातील अनेक लोकांनी पत्रव्यवहार करून आणि न्यायालयाचा आधार घेऊन पाली भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न केले. अभिजात भाषेचे जे निकष आहेत, त्यातील एक निकष भाषा १ हजार, ५०० ते २ हजार वर्षे जुनी असावी असा आहे. पाली भाषा तर तीन हजार वर्षे जुनी आहे. भारतात जे अशोकाचे शिलालेख लिहिले गेले आहेत, ते पाली भाषेत आणि ब्राह्मी लिपीत लिहिले गेले आहेत. त्यामुळे पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून अनेक प्रयत्न अव्याहत सुरू होते. या सरकारचे खूप खूप आभार. कारण, उशिरा का होईना, त्यांनी पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला.
 
पाली भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे तर, ती पुन्हा व्यवहारात रुजवण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत?
 
२०११ सालच्या जनगणनेनुसार, भारतातील २५ कोटी लोक हिंदी भाषा बोलतात, साडे सात कोटी लोक मराठी भाषा बोलतात, संस्कृत बोलणारे २८ हजार लोक आहेत. पण, पाली भाषा बोलणारा एकही व्यक्ती सध्या अस्तित्वात नाही. बौद्ध समाजतील लोक सर्व विधी पाली भाषेतून करतात. पण, जेव्हा जनगणना करणारे लोक येतात, तेव्हा ते सांगत नाहीत की, आम्हांला पाली भाषा बोलता येते. म्हणून पाली भाषेचे शिक्षक म्हणून आम्ही विद्यार्थ्यांना सांगतो की, पाली भाषेत बोला. मराठी ही तुमची मातृभाषा असूच शकते त्यात काही वाद नाही, पण पाली सुद्धा तुम्हाला अवगत असली पाहिजे. पाली भाषा ही ग्रंथभाषा म्हणून मर्यादित राहिलेली आहे, ती बोलीभाषा व्हावी म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत.
 
पाली भाषा ही ग्रंथभाषा म्हणून मर्यादित राहिलेली आहे, ती बोली भाषा व्हावी यासाठी शिक्षण क्षेत्रात काय पाऊले उचलली गेली पाहिजेत?
 
सध्या महाराष्ट्रातील ५ ते ६ विद्यापीठांमध्येच पाली भाषा शिकवली जाते. ती महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या सर्व विद्यापीठांमध्ये शिकवली जावी, अशी आमची शासनाला विनंती आहे. भारताचा प्रमाणबद्ध इतिहास आहे, तो जास्तीत जास्त पाली भाषेमध्ये लिहिला गेला आहे. भारतात ते विदेशी प्रवासी आले. त्यांनी पाहिलेल्या, अनुभवलेल्या भारताची प्रवासवर्णने पाली भाषेत लिहिली आहेत. त्यामुळे भारताचा इतिहास जाणून घेण्यासाठी, पाली भाषा शिकणे आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पाली भाषेला भारताच्या इतिहासाची गुपिते खोलणारी गुरुकिल्ली असे म्हटले आहे. जर आपण या गुरुकिल्लीचा वापर केला तर, भारतात दडलेली अनेक गुपिते लोकांसमोर येऊ शकतात. म्हणून इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत पाली भाषा, मराठीला किंवा इतर भाषेला स्वेच्छिक पर्याय म्हणून शिक्षणात आणली पाहिजे. पाली भाषेत सोबतच ब्राह्मी लिपीसुद्धा शिकवली गेली पाहिजे.
 
पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे काय फायदा येईल?
 
अभिजात भाषेसाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद आहे. २००५ साली जेव्हा संस्कृत भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा एक-दोन वर्षात नागपूरमध्ये संस्कृत विद्यापीठ स्थापन झाले. पाली भाषेसाठी सुद्धा असेच एक विद्यापीठ स्थापन होईल आणि यूपीएससीमधून वगळली गेलेली पाली भाषा यूपीएससीमध्ये पुन्हा समविष्ट केली जाईल अशी मला आशा आहे.
 
सिद्धार्थ महाविद्यालयात जो पाली भाषेचा जो अभ्यासक्रम चालतो, तो कशाप्रकारे चालतो आणि त्याला विद्यार्थ्यांचा कशा प्रकारे प्रतिसाद मिळतो?
 
सिद्धार्थ महाविद्यालयात दोन प्रकारचे पाली भाषेचे कोर्स चालतात. आमच्याकडे एक अकरावी ते पंधरावी पाली भाषेचा पदवी कोर्स शिकवला जातो. १९४५ साली बाबासाहेबांनी सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना केली आणि लगेचच १९४६ साली, पाली भाषेची या महाविद्यालयात तरतूद करून दिली. तेव्हापासून पाली सिद्धार्थ महाविद्यालयात पाली भाषा शिकवली जात आहे. त्यानंतर मुंबईचे पहिले बौद्ध महापौर डॉ. पी. टी. बोराळे यांनी, १९८२ साली मुंबई विद्यापीठाशी संलग्न पाली भाषेचा कोर्स इथे सुरू केला, तो सुद्धा आजपर्यंत सुरू आहे. दरवर्षी ५० ते ६० विद्यार्थी या कोर्ससाठी प्रवेश घेतात.
दिपाली कानसे
Powered By Sangraha 9.0