वन्य प्राण्यांना खायला देणे किती धोकादायक ठरू शकते, हे अमेरिकेच्या वॉशिंग्टनमधील पॉलस्बोजवळ घडलेल्या एका अनोख्या घटनेने दाखवून दिले आहे. एका महिलेने ३० वर्षांहून अधिक काळ ‘रॅकून’ या सस्तन प्राण्याला खायला घातले.
वन्य प्राण्यांना खायला देणे किती धोकादायक ठरू शकते, हे अमेरिकेच्या वॉशिंग्टनमधील पॉलस्बोजवळ घडलेल्या एका अनोख्या घटनेने दाखवून दिले आहे. एका महिलेने ३० वर्षांहून अधिक काळ ‘रॅकून’ या सस्तन प्राण्याला खायला घातले. सुरूवातीला त्यांना हा अनुभव निरुपद्रवी वाटत होता. मात्र, काही आठवड्यांपूर्वी परिस्थिती अचानक बदलली. या महिलेच्या घराभोवती गेल्या आठवड्यात सुमारे शंभर रॅकून जमले आणि ते आक्रमकपणे अन्नाची मागणी करू लागले. या घटनेने वन्य प्राण्यांना खायला देण्याचे संभाव्य परिणाम दिसून आले आहेत. वन्य प्राण्यांना अन्न पुरवणे हे प्रथमदर्शनी भूतदयेची कृती वाटू शकते. काही लोकांना असे वाटते की, ते प्राण्यांना मदत करत आहेत. परंतु, प्रत्यक्षात त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. वन्य प्राण्यांना खायला दिल्याने, त्यांच्या नैसर्गिक वर्तणुकीत बदल होतो आणि ते माणसांवर अवलंबून राहतात. यामुळे प्राणी माणसांकडून अन्नाची अपेक्षा करू लागतात आणि त्यांच्या नैसर्गिक अन्न शोधण्याच्या सवयी कमी होतात. तसेच, अन्नाच्या कमतरतेमुळे हे प्राणी आक्रमक होऊ शकतात व अशावेळी त्यांचा माणसांशी संघर्ष होऊ शकतो. वॉशिंग्टनच्या या घटनेतही हे स्पष्ट दिसून आले.
वन्य प्राण्यांना अन्न दिल्याने, त्यांच्या संख्येत अनियंत्रित वाढ होऊ शकते. नैसर्गिक परिस्थितीत, प्राण्यांची लोकसंख्या अन्नाच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. मात्र, जेव्हा माणूस अतिरिक्त अन्न पुरवतो, तेव्हा या संतुलनात बिघाड होतो. वॉशिंग्टनमध्येही असेच काहीसे घडले. सहज उपलब्ध अन्नामुळे रॅकूनच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. या वाढीव संख्येमुळे परिसरातील शेजार्यांनाही त्रास होऊ लागला. काहींनी सांगितले की, त्यांचे पाळीव प्राणी या ‘रॅकून’शी भांडताना जखमी झाले होते. तसेच, रस्त्यांवर अधिक ‘रॅकून’ अपघातात सापडले होते. याशिवाय, वन्य प्राण्यांना खायला दिल्याने, पर्यावरणात असंतुलन निर्माण होते. माणसांकडून मिळणार्या अतिरिक्त अन्नामुळे प्राण्यांच्या नैसर्गिक अन्न साखळीत बिघाड होतो आणि त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो. वन्य प्राण्यांच्या लोकसंख्येत वाढ होण्याने, इतर प्रजातींवर देखील परिणाम होऊ शकतो. शिवाय, प्राण्यांमधील आजारांचा प्रसारही वेगाने होऊ शकतो, ज्यामुळे स्थानिक वन्यजीव आरोग्य धोक्यात येऊ शकते. मानवी अन्न अनेकदा प्राण्यांसाठी पोषक नसते, ज्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येते. तसेच, माणसांच्या अन्नाच्या सवयींमुळे त्यांचा नैसर्गिक शिकार करण्याचा स्वभाव कमी होतो. या घटनेत ‘रॅकून’ची आक्रमकता वाढल्याने, त्या महिलेच्या सुरक्षिततेला देखील धोका निर्माण झाला होता. तिला तिच्या घरात बंदिस्त झाल्यासारखे वाटू लागले.
वन्य प्राण्यांना खायला देण्यामुळे माणसांना आणि प्राण्यांना, एकमेकांशी संघर्ष करावा लागतो. ‘रॅकून’सारखे प्राणी जेव्हा मानवावर अवलंबून होतात, तेव्हा त्यांचे नैसर्गिक वर्तन बिघडते आणि ते अधिक आक्रमक बनतात. या प्रकरणात, ‘रॅकून’ने महिलेच्या घराभोवती गर्दी केली. ज्यामुळे तिला तिच्या घरात बंदिस्त होण्याची वेळ आली. सुरूवातीला केलेली दयाळूपणाची कृती आता धोकादायक ठरली होती. वन्य प्राण्यांना मदत करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे,त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण करणे. त्यांना खायला देण्याऐवजी, त्यांच्या नैसर्गिक अन्नसाखळीचे रक्षण करणे, अधिक प्रभावी आहे. वन्य प्राण्यांना दुरूनच कौतुकाने पाहणे सुरक्षित आणि योग्य आहे. त्यांच्याशी संपर्क टाळणे आणि त्यांना त्यांच्या नैसर्गिक वातावरणात राहू देणे आवश्यक आहे.
वॉशिंग्टनमध्ये घडलेली ‘रॅकून’ची घटना हे दर्शवते की, वन्य प्राण्यांना खायला देणे हे त्यांच्या आणि माणसांसाठीही धोकादायक ठरू शकते. वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक वर्तनात हस्तक्षेप केल्याने त्यांच्या जीवनमानावर आणि पर्यावरणावर विपरीत परिणाम होतो. त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि माणसांशी होणार्या संघर्षांना टाळण्यासाठी, योग्य अंतर राखणे महत्त्वाचे आहे. या घटनेतून शिकून आपण वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे रक्षण करण्यावर भर दिला पाहिजे आणि मानवी हस्तक्षेप टाळला पाहिजे. वन्यजीवनाच्या रक्षणासाठी संतुलन राखणे आवश्यक आहे. दुरूनच प्राण्यांचे कौतुक करणे आणि त्यांना त्यांच्या नैसर्गिक वातावरणात राहू देणे, हेच त्यांच्या कल्याणासाठी योग्य ठरते. वन्य प्राण्यांचे संरक्षण आणि त्यांच्याशी योग्य अंतर राखणे, हीच आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.